यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ८५

संवेदनक्षम ललित लेखक

साहित्यास्वादकाची भूमिका हीच आपली प्राथमिक भूमिका आहे, असे यशवंतराव म्हणत असले, तरी, आणि ललित लेखन त्यांनी आयुष्यात फार पूर्वीच सोडून दिले असले, तरीही त्यांचे मन मात्र अखेरपर्यंत कलावंताचेच होते.  निसर्गात रमणे, मनःपूर्वक एखादा अनुभव घेणे, भूतकाळातल्या कडूगोड आठवणींची प्रसंगोपात्त उजळणी करणे, लोकजीवनाच्या संजीवक संपर्काला प्रयत्नपूर्वक जोपासणे, बुद्धीइतकेच भावनेलाही तीक्ष्ण राखणे ही सारी त्यांच्यांतल्या जिवंत कलावंताचीच लक्षणे होती. 

बालपणाचे कृष्णाकाठाशी एक अतूट समीकरण त्यांच्या मनात आयुष्यभर ठाण देऊन बसले होते.  ''श्रावण कोसळू लागला, की ''कृष्णामाईची याद मनात हटकून येते'', ''कृष्णाकाठावर उभे राहिल्यानंतर स्वच्छ जीवनाचा तो प्रशांत प्रवाह आणि तीरांवरील हिरवागार सुंदर निसर्ग पाहत राहणे याचा अनंद काही वेगळाच असतो.  अंतःकरणात तो बसून राहतो आणि स्मरणमात्रे अंतःचक्षूंसमोर उभा राहतो.'' (ॠणानुबंध, ९९-१००).  ही त्यांची विधाने कृष्णा-कोयनेचे त्यांच्या भावसृष्टीतील अनन्य नाते सांगून जातात, या नद्यांच्या उगमापासून मुखापर्यंत परिक्रमा करावी, बदलत्या पात्रांची भव्यता, भोवतालची निसर्गशोभा पहावी, गावोगावच्या लोकांना भेटावे व त्यांच्या चालीरीती अभ्यासाव्यात, पिकांनी भरलेली शेते बघावीत.  हे स्वप्न त्यांनी जन्मभर उरात बाळगले होते.  

परिसर-प्रेम

या परिसराचे अत्यंत हृदयंगम वर्णन यशवंतरावांनी अनेक प्रसंगी केले आहे.  देवराष्ट्र हे गाव तर त्यांना विशेष भावलेले दिसते.  सातारा जिल्ह्याच्या टोकावरील डोंगराच्या कुशीत वसलेले ते एक लहानसे गाव.  गावाचा आसमंत ऐतिहासिक अवशेषांनी व लेणी, देवळे यांनी भरलेला.  सर्वांत जुने देऊळ समुद्रेश्वराचे- गाव त्याला 'सागरोबा' म्हणते.  गावचे हे दैवत.  डोंगरही सागरोबाचा. ('कृष्णाकाठ' : ९).

''सागरोबाचे शिवार हे देवदेवेंद्राला पडलेले एक स्वप्न आहे.... स्वतःला एखादे घरकुल असावे; म्हणून जणू शोधाशोध करीत आलेली देवमंडळी या शिवारात पोचताच कायमची स्थिरावली असावीत आणि या शिवाराचेच त्यांनी 'देवराष्ट्र' बनवून टाकले.''  ('ॠणानुबंध, ३३) अशी एक उपपत्तीही यशवंतरावांनी दिली आहे.  त्यांच्या मनात देवराष्ट्र व भारत एकरूपच आहेत, कारण शेवटी भारत हेसुद्धा तेहतीस कोटी देवांनी घडवलेले देवराष्ट्रच आहे.