वैचारिक भूमिका
यशवंतरावांच्या या अपयशाचे कारण त्यांच्या वैचारिक संदिग्धतेतच शोधावे लागते. त्यांनी शास्त्रीय सिद्धांताच्या स्वरूपात समाजवाद कधीच स्वीकारला नव्हता. ते राजकारणात 'मध्यबिंदूच्या डाव्या बाजूकडे' झुकलेले होते. समाजवादाच्या संभाव्य परिणामांचे त्यांना आकर्षण होते; पण समाजवादाची काटेकोर मांडणी करून त्या विचारसरणीच्या आधारावर आपली प्रत्येक कृती व निर्णय तपासून पाहण्याची मात्र त्यांची तयारी नव्हती. आपला समाजवाद पाश्चात्यांच्या समाजवादापेक्षा निराळा आहे, मार्क्सवादाला तो अचूक व त्रिकालाबाधित मानीत नाही. हिंदुस्थानातला समाजवाद इथल्या अनुभवावरच अधिष्ठित असावा लागेल, मार्क्सप्रणीत तराजूवर तो मोजून भागणार नाही, माझा समाजवाद व्यावहारिक व फलितदर्शी आहे, तो महावाक्यांपेक्षा प्रत्यक्ष वैधानिक व प्रशासकीय उपायांच्या रूपाने व्यक्त होत असतो. शब्दांपेक्षा कृतीवर त्याची भिस्त असते, वगैरे शब्दांत त्यांनी समाजवादाचे सिद्धांत उडवून लावले होते.
पण त्याचबरोबर जो वेगळा समाजवाद असेल, त्याचे नेमके स्वरूप कसे असेल आणि कोणत्या मार्गाने तो आणता येईल, याची मांडणी मात्र त्यांनी कुठेही केलेली नव्हती. आपण सांगितलेली समाजवादाची गमके मोघम असल्याचे त्यांना मान्य होते. पण त्या संदर्भात ''ही गोष्टच अशी आहे, की ती शब्दांत उभी करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ती अस्पष्टच राहते'' ('सह्याद्रीचे वारे', २४१), असे म्हणून ते मोकळे होतात. आणि त्याच वेळी 'निश्चित अशा समाजवादाकडे जाण्याची आमची इच्छा आहे', असेही म्हणतात. 'खाजगी नफ्याच्या जागी सामाजिक नफ्याचा पाया अधिक घट्ट करणे', त्यासाठी एकतर आर्थिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न करणे आणि दुसरे म्हणजे सर्वांना समान संधी मिळेल, अशी परिस्थिती निर्माण करणे व व्यक्तित्वविकासाला वाव देणे एवढाच स्थूल अर्थ ते समाजवादाचा सांगतात (कित्ता, २३९). सर्वांना समान संधी असावी, उत्पादनामागची प्रेरणा वैयक्तिक नफेबाजीपेक्षा समाजाच्या सुखाची व हिताची असावी, लोकांच्या गरजा व विकासाच्या शक्याशक्यता विचारात घेऊन मालमत्तेची विभागणी व्हावी अशा समाजवादाच्या तीन कसोट्यांही त्यांनी दुस-या एका भाषणात नोंदवल्या होत्या ('युगांतर', २२८).