संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर शे. का. पक्ष व प्रजासमाजवादी पक्षातले काहीजण काँग्रेसमध्ये आले. मग विरोधी पक्षांचे झाले काय? असा एक प्रश्न जयंत लेले यांनी घेतलेल्या मुलाखतीत होता. यशवंतराव यांनी सांगितले की, संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांबरोबर आपली अनेकदा बोलणी होत असत. प्रतापगडच्या मोर्चाच्या वेळी काही गोंधळ होऊ नये म्हणून आपण दत्ता देशमुख यांच्यातर्फे प्रथम बोलणी केली होती, अशी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर इतर विरोधी पक्षांची ताकद कमी झाली तशी ती शे. का. पक्षाचीही झाली. या प्रकारे वेगळा पक्ष काढण्याची गरज नाही; काँग्रेसमध्ये जाऊन तीत बदल करणे शक्य आहे. राष्ट्रीय प्रवाहात राहिले पाहिजे ही भूमिका आपण घेतली होती. शे. का. पक्ष फार काळ एक प्रबळ पक्ष म्हणून राहू शकणार नाही, असे आपले मत होते. शिवाय पूर्वीच्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीचा पगडा या पक्षावर काही प्रमाणात राहिला होता. शंकरराव मोरे हे बुद्धिमान होते, त्यांची लेखणी व वाणी धारदार होती. पण पक्ष चालवायचा तर लोकांशी जमवून घेऊन वागावे लागते, मोरे यांचा स्वभाव याविरुद्ध होता. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नामुळे या पक्षाचा प्रसार झाला, पण महाराष्ट्राचे राज्य स्थापन झाल्यावर पक्षातून अनेकजण बाहेर आले. नंतर सीमाप्रश्नावर या पक्षाने बरेच दिवस राजकारण केले. मग काहीजण लोकसभेत आले. त्यांनी लोकसभेच्या कामात लक्ष घालून नाव मिळवले नाही. महाराष्ट्राचे प्रश्न त्यांनी लोकसभेत मांडावे, देशापुढील प्रश्नांची चर्चा करावी असे आपण सुचवत होतो, पण त्यांचे मन विशेष लागत नव्हते. तुम्ही एका संकुचित प्रश्नावरच सर्व लक्ष केंद्रित केले तर लोकसभेत करण्यासारखे काही राहत नाही, असा अभिप्राय यशवंतरावांनी दिला.
निवडणुकीनंतर नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ९ मार्च १९६२ रोजी झाला. प्रारंभीच्या दिवसांतच अगोदर संमत झालेले सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होऊन, पंचायती व जिल्हा परिषदा स्थापन झाल्या. त्यांच्या निवडणुका घेण्यात आल्या तेव्हा काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे बहुतेक ठिकाणी बहुमत मिळाले. नव्या विधानसभेचे उद्घाटन करताना राज्यपालांचे भाषण झाले व त्यावर चर्चा झाली. या चर्चेत भाग घेताना आमदार फाटक यांनी केलेल्या काही विधानांचा प्रतिवाद करताना विकासाची दृष्टी, समाजवाद व सहकार यांसंबंधी यशवंतरावांनी केलेले विवेचन उल्लेखनीय आहे. ते म्हणाले, ‘सन्माननीय सभासद श्री. फाटक यांनी सैद्धान्तिक समाजवादाचा उल्लेख करून सरकारच्या धोरणावर टीका केली – सरकार ज्या मार्गाने समाजवाद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे तोच मार्ग योग्य आहे, असा सरकारचा विश्वास आहे. त्यांनी आपल्या भाषणात ‘सधन शेतकरी’ असा शब्दप्रयोग केला आणि म्हटले की, सहकारी चळवळीचा प्रमुख ‘सधन शेतकरी’ आहे. कोणत्या अर्थाने त्यांनी हा शब्दप्रयोग केला हे मला समजत नाही. पाच-दहा एकर जमिनीचा जो शेतकरी मालक आहे त्याला कोणी सधन शेतकरी म्हणणार नाही – महाराष्ट्राच्या शेतकरी समाजाबद्दल त्यांच्या काही चुकीच्या कल्पना आहेत. महाराष्ट्रात सधन शेतकरी नाहीत- सहकारी चळवळीमध्ये महाराष्ट्र पुढे आहे असे जेव्हा आम्ही म्हणतो, तेव्हा केवळ साखर कारखान्याच्या दृष्टीने म्हणतो असे नाही. महाराष्ट्रात सहकारी चळवळीने अनेक क्षेत्रांत प्रवेश केला आहे.’
मुख्यमंत्री या नात्याने यशवंतराव निरनिराळ्या योजना व उपक्रम राबवत असताना, भारताच्या उत्तर सीमेवर कम्युनिस्ट चीनने आक्रमण केले आणि आपल्या सैन्याची त्याच्याशी गाठ पडली. या सीमावादाच्या तपशिलात जाण्याचे इथे प्रयोजन नाही. हा वाद काही वर्षे चालू होता आणि त्यात तडजोड न होऊन चीनने आक्रमणाचा मार्ग स्वीकारला. सर्व देश यामुळे खडबडून जागा झाला. सीमेवर आपल्या सैन्याला माघार घ्यायला लागल्यावर लोकसभेत एकच गदारोळ झाला आणि काँग्रेस पक्षानेही तेव्हाचे संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांचा राजीनामा मागितला. पंतप्रधान पंडित नेहरूंनी मेनन यांना संरक्षण देण्याचा बराच प्रयत्न केला, पण तो अयशस्वी होऊन मेनन यांना राजीनामा देण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. नोव्हेंबरच्या तीनचार तारखांना विकास मंडळाची बैठक होती व मुख्यमंत्री त्या बैठकीसाठी हजर होते. यात यशवंतरावही होते. त्यांनी डॉ. जयंत लेले यांना या बैठकीसंबंधात अशी माहिती दिलेली दिसेल की, बैठकीस जमलेल्या मुख्यमंत्र्यांत कृष्ण मेनन यांच्या भवितव्याची अनौपचारिक चर्चा होणे साहजिक होते. तशी ती झाली, तेव्हा आपापल्या राज्यात मेननविरोधी वातावरण तापलेले असल्याचा सर्वसाधारण सूर होता. यानंतर पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना याची कल्पना देण्याची सूचना केली गेली. इंदिरा गांधी यांनी आपल्याला निरोप पाठवून मुख्यमंत्र्यांना घेऊन पंतप्रधानांना भेटणे अगत्याचे आहे असे सांगितले. या कठीण काळात आपल्या पिताजींनी मेनन यांना त्वरित दूर करण्याचा निर्णय घ्यावा व मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे हे सुलभ होईल, असे इंदिरा गांधी यांना वाटत असावे. पंतप्रधानांना भेटण्यास इंदिरा गांधींनी सांगितले. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांची व नेहरूंची भेट झाली. प्रतापसिंग केराँ, कामराज, संजीव रेड्डी, यशवंतराव व बिजू पटनाईक हे त्या वेळी हजर होते.