‘कोण साहेब?’
‘चव्हाणसाहेब गेले. दिलीप पाटलानं फोन घेतला. राजीव गांधींचा दिल्लीहून फोन होता.’ दोघंही शब्दही न बोलता घळाघळा रडत राहिलो.
सतत फोन.
दिलीपला फोनवर बोलता येत नव्हतं.
तो फोन घेत होता.
दिलीप पाटील त्या वेळी शरदरावांचा पी. ए. होता. (आता तो आमदार झाला आहे.)
दिलीपला फोनवर बोलणं कठीण झालं.
महाराष्ट्रातून देशातून रात्रभर माणसांच्या झुंबडी येऊ लागल्या.
शरदराव रात्रभर फोनवर बोलत राहिले.
मी त्यांच्याजवळ नुसता न बोलता रात्रभर ऐकत होतो.
दुस-या दिवशी दुपारी मुंबईच्या विमानतळावर यशवंतराव चव्हाणांचा मृतदेह घेऊन येणार होते. किर्लोस्करांच्या छोट्या विमानात शरदराव पवार, सर्जेराव घोरपडे, आबासाहेब कुलकर्णी व मी असे चौघे सरळ विमानतळावर गेलो. त्याआधी मुंबईत जायची इच्छा नव्हती. पुण्यातही गेलो नाही. विमानतळ काठोकाठ, माणसांनी गच्च भरलेलं होतं. दिल्लीहून येणा-या विमानाची लोक आतुरतेनं आणि जड अंत:करानं वाट पाहत होते. एक सुजाण, सुसंस्कृत, जनसामान्यांसाठी झिजणारं व्यक्तिमत्त्व विझलं होतं. सगळीकडे अंधार दाटलेला होता.
यशवंतरावांनी माझ्यासारख्या दूरवरच्या सामान्य मुलासाठी खूप प्रेम दिलं. मला मोठं केलं. एका कवितेतून हे झालं. त्यांनी व्यक्तिगत जीवनात मला फार मोठा आधार दिला म्हणून मी उभा राहिलो. माझ्या आयुष्यात त्यांचा वाटा फार मोठा व मोलाचा होता. अकरा वर्षांचा सहवास मला आयुष्यव्यापी झाला होता. त्यांनीच सांगितलेलं काम मी निष्ठापूर्वक, जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रत्येक सुखाच्या व दु:खाच्या महत्त्वाच्या क्षणाला माझ्यासोबत आजही यशवंतराव असतात. माझ्या मनाचं तळघर त्यांनी व्यापून टाकलेलं आहे.
यशवंतरावांशिवाय महाराष्ट्राचा विचारच होऊ शकत नाही. कुठलीही अस्वस्थ करणारी घटना घडली, किंवा महराष्ट्राच्या सामाजिक – सांस्कृतिक जगात महत्त्वाची घटना घडली की मला यशवंतरावांची तीव्र आठवण येते. यशवंतरावांच्या संदर्भातलं माझ्या वाट्याला आलेलं सगळं काही सांगणं इथं शक्यच नाही. अनेक व्यक्ती, अनेक घटना, अनेक अनुभव आणि त्यावरची त्यांची मतं मी खोल जपून ठेवली आहेत, आणि ती सर्वांसमोर मांडावीत असं मला आज तरी वाटत नाही. यशवंतरावांबद्दलच्या या आठवणी, हे अनुभव यांना माझ्याजवळ वेगळं महत्त्व आहे. माझं जगणं समृद्ध करण्यात त्यांची विशेष जागा आहे. म्हणून हे एवढं लिहिलं-त्यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्तची ही एक विनम्र श्रद्धांजली म्हणूनही!