यशवंतराव चव्हाण (43)

जळगावच्या अखिल भारतीय साहित्य सम्मेलनाच्या वेळी फक्त सम्मेलन दोन दिवसांवर आलं तेव्हा मी साहित्य महामंडळाचा अध्यक्ष झालो असं मुंबईहून जाहीर झालं. श्री. बाळासाहेब (मधुकरराव) चौधरी सम्मेलनाचे स्वागताध्यक्ष होते. यशवंतरावांनी जळगावच्या साहित्य सम्मेलनाला यावं म्हणून त्यांनी त्यांना बोलविलेलं होतं. यशवतंराव येणार होते. ऐनवेळी साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदाचा वाद इतका विकोपास गेला की कोर्ट कचेरी भानगडी सगळ्यांनाच नामुष्कीच्या झाल्या. मी एकटा काय करणार व किती करणार? माझं जळगाव हे कार्यक्षेत्र व जवळच्या संबंधातलं गाव असलं तरीही साहित्य महामंडळाचे सदस्य, ज्येष्ठ साहित्यिक, विशेषत: जळगावच्या सर्वच साहित्यिक, राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी सामंजस्य दाखवून खूप सहकार्य केलं म्हणून जळगावचं साहित्य सम्मेलन यशस्वी झालं. ती फार मोठी जबाबदारी, कसरत होती. खूप अडचणी होत्या. नंतर खूप अभिनंदनाच्या तारा आल्या. सम्मेलन यशस्वी केल्यानं पुढल्या साहित्य सम्मेलनासाठी खूप निमंत्रणं आली. यशवंतरावांचं वृत्तपत्रातले मजकूर वाचून खास अभिमनंदनाचं पत्र आलं. पद्मश्री शामराव कदम यांचा खूप आग्रह होता म्हणून पुढचं साहित्य सम्मेलन नांदेडला घ्यावं असं मी साहित्य महामंडळाचा अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब केलं. सगळ्यांनीच होकार दिला. काकासाहेब गाडगीळ, सयाजीराव महाराज गायकवाड हे साहित्य प्रेमी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष झालेले आहेत. नांदेडच्या साहित्य सम्मेलनाचं अध्यक्षपद यशवतंराव चव्हाण यांना द्यावं. त्यांना भेटून समजावून हे करता येईल म्हणून माझ्याकडे पद्मश्री शामराव कदम व महाराष्ट्रातल्या काही साहित्यिकांनी आग्रह धरला. बिनविरोध व निवडणूक न होता हे होत असलं तरच करा नाही तर शब्दही काढू नका असं या मुख्य मंडळींना चर्चेत सांगितलं. महाराष्ट्राला साहित्य, कला, संस्कृतीचा मोठा वारसा स्वातंत्र्योत्तर काळात देणा-या एका राजकारणी साहित्यिकाचा भव्य सत्कार ह्या निमित्तानं नांदेडला करायचा महाराष्ट्रातल्या लेखक रसिकांचा विचार होता. सर्व घटक संस्था व साहित्य परिषदेच्या सदस्यांशी मी बोलणं सुरू केलेलं होतं. त्यात काहीच अडचण येणार नव्हती हे स्पष्ट झालेलं होतं उलट सगळ्यांना हे नाव येत असल्याचा अपार आनंद होता. ‘सह्याद्रीचे वारे’ ‘ऋणानुबंध’ ‘कृष्णाकाठ’च्या लेखकाला या निमित्तानं अधिक लिहिण्याचीसुद्धा प्रेरणा सहज होईल असंही सगळ्यांना वाटत होतं म्हणून आग्रह होता. यशवंतराव तयार होणार नाहीत हे मला ठाऊक होतं. पण सगळ्यांची खूप इच्छा म्हणून मी प्रयत्न करायचं ठरविलं. मी नोव्हेंबरच्या दुस-या आठवड्यात यशवंतरावांना पत्र लिहिलं. तुमच्याशी लवकर काही बोलायंच आहे. भेटीत सगळं सांगतो, कुठे भेटावं ते सांगा. मी येतो. यशवंतरावांचं दोन-दीन ओळींचं पत्र आलं. २५ नोव्हेंबरला मी पुण्यात आहे. एसेम् जोशी यांचा ८१ व्या वाढदिवसानिमित्त मोठा गौरवसमारंभ आहे. २६ ला मी पुण्याहून क-हाडला जाणार आहे. तुम्ही तिकडे या. बोलता येईल. यशवतंराव २७ ला क-हाडला लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार होते. पुण्यात भेटून मी सोबत क-हाडला येतो, असं मी त्यांना पुन्हा कळवलं.

२५ नोव्हेंबरला न्यू इंग्लिश स्कूलच्या सुंदर साधेपणानं सजवलेल्या पटांगणावर एसेम् जोशी यांचा ८१वा वाढदिवस साजरा झाला. देशातली एसेम् प्रेमी मंडळी फार मोठ्या संख्येनं आलेली होती. यशवंतराव चव्हाण संध्याकाळपर्यंत निश्चित येताहेत. सकाळी त्यांची प्रकृती थोडी बरी नव्हती एवढंच. पण ते अजूनही निश्चित वेळेवर येऊन पोहोचतील असं तिथले सगळे बोलत होते. स्वत: एसेम् जोशींचीसुद्धा यशवतंरावांनी यावं व या समारंभात भेटावं- बोलावं अशी खूप इच्छा होती. त्याप्रमाणे ठरलेलं होतं. सगळे त्यांची वाट पाहत होते. सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी त्या सुंदर आयोजित केलेल्या गौरवसमारंभाची सांगता झाली. मी व्यासपीठाच्या समोरच बसलो होता. सात वाजून पन्नास मिनिटाला माझ्याकडे खूप धावपळीनं शरदराव आले. मला गाडीत घेतलं. कितीतरी भेटणार-यांनी गाडीजवळ त्यांना कामानिमित अडवलं तरी त्यांना भरभर लोटून ते गाडीत बसले. एक शब्दही न बोलता शरदराव मला गाडीत टाकून सर्किट हाऊसवर घेऊन गेले. झटपट उतरून दुस-या माळ्यावरल्या खोलीत घेऊन गेले. दरवाजा लोटला. शरदराव म्हणाले,
‘साहेब गेले.’