यशवंतराव चव्हाण (24)

दुर्दैवानं ‘क-हाड पुरस्कारा’ बाबत त्यांनी ज्यांच्यावर काम सोपवलेलं होतं त्यांनी ते नीट केलं नाही. पुढे एकदा माझा एक मित्र श्याम मनोहर याला कथेसाठी ‘क-हाड पुरस्कार’ मिळाला. अनेक महिने लोटले, श्यामला पुरस्कार मिळाल्याच्या एका पत्रानंतर पुढे काही आलंच नाही. समारंभही झाला नाही. श्यामच्या नावाला तशी प्रतिष्ठा त्या वेळी कमीच होती, म्हणून परीक्षकांनीही नंतर त्याकडे दुर्लक्ष केलं असावं. पण जेव्हा ही गोष्ट भालचंद्र नेमाडेला कळली तेव्हा त्यानं तात्काळ यशवंतरावांना हे सगळं लिहिलं. यशवंतरावांना या प्रकाराचं फारच दु:ख झाल्याचं त्यांनी अनेकदा बोलून दाखविलं होतं. अर्थात श्यामच्या वाट्याला फक्त चेक आला, समारंभ झालाच नाही, ही गोष्ट यशवंतरांसकट आम्हां सगळ्यांना अस्वस्थ करून गेली होती.

कथा, कादंबरी, ललितगद्य, चरित्र अशा वाड्मयप्रकारांना पारितोषिकं देता येतील, परंतु नाटक त्यात घेऊ नये असं यशवंतरावांचं पारितोषिक समिती व साहित्यिकांमध्ये चर्चेतलं मत होतं. त्याविषयी त्यांची मतं त्यांनी जाणत्या साहित्यिकात मांडली. नाटकप्रयोगाच्या रूपानं किंवा अनेक माध्यमांतून येतं तेव्हा ते प्रभावी ठरतं किंवा ख-या अर्थानं त्याचं रूप प्रगट होत असतं. नाटकाच्या पुस्तकाच्या छापील संहितेत ते कधीच पूर्णपणानं दिसणार नाही. त्यामुळे ख-या अर्थानं कलाकृतीला न्याय दिलेला नसणार. एखादं नाटक लिखित संहितेत चांगलं असू शकतं, परंतु प्रयोगात ते फारच सामान्यसुद्धा झाल्याची उदाहरणं आहेत म्हणून नाटक हा वाड्मयप्रकार पारितोषिकासाठी घेऊ नये असं त्यांचं मत होतं. चंद्रकांतशी मुद्दाम या विषयावर चर्चा करूनच त्यांनी ‘क-हाड पुरस्कारा’ तून नाटक हा वाड्मयप्रकार गाळून टाकण्याचा निर्णय घेतला होता.

दिल्लीला अनेकदा बोलावूनही मी दिल्लीला गेलोच नाही. यशवंतरावांना ते मुंबईत आल्यावर आता भेटता येत होतं. एकदा त्यांनी निरोप देऊन मला बोलविलं होतं. ‘रिव्हिएरा’ वर ते थांबले होते. मुंबईत अधिवेशन चाललेलं होतं, तेव्हा मी मुंबईत अधिवेशनासाठी नव्हतो. त्यांचा निरोप मिळाल्यावरही कित्येक दिवस त्यांना भेटलो नाही. यशवंतरावांचं पत्र आलं :

“... विरंगुळा’ हे लहानसं घर मी क-हाडला बांधलं आहे. वेणूताई मी पाच दिवस क-हाडला तिथे आहोत. ५ ते १० सप्टेंबर. तुम्ही या नव्या घरी यावं अशी आमची इच्छा आहे. मनमोकळं बोलता येईल....”

मी सहा सप्टेंबरला क-हाडला गेलो. बस-स्टँडसमोरच्या हॉटेलात बॅग टाकली. सातारचे कार्यक्रम आटोपून यशवंतराव सायंकाळी ‘विरंगुळा’वर आले. यशवंतराव, वेणूताई व मी रात्री दहा वाजेपर्यंत बोलत बसलो. ते म्हणाले, “आता काय नवीन अडचणी आहेत? तुम्ही मुंबईत अधिवेशनात आलाच नाहीत असं कळलं. सहसा अधिवेशन टाळू नये असं माझं मत आहे.” तसे शरदराव मला वयानं जवळचे होते. तशी जवळीकही नंतर वाढलेली होती. अनेक विषयांवर मी शरदरावांजवळ आडपडदा न ठेवता मोकळेपणी बोलत असायचो. पण मी काही फार व्यक्तिगत प्रश्न त्यांच्याकडे मांडलेच नाहीत. संकोच व अंतर राहिलेलं होतं. यशवंतरावांचं-माझं वयाचं अंतर, त्यांचं मोठेपण व माझ्या मर्यादा सगळं लक्षात घेऊनही सगळे घरगुती व्यक्तिगत प्रश्न मी त्या काळात त्यांच्याजवळ मोकळेपणानं सांगत होतो. दोघांतलं असं जे अंतर असावं ते  मिटूनच गेलेलं होतं. बाबांच्याच जागी मला यशवंतराव सदैव वाटत राहिले.

“धाकट्या बहिणीचं लग्न झालं. दोघा भावांचे विवाह राहिलेले होते तेही गेल्या वर्षी झाले. खूप आर्थिक अडचणी असल्या तरी पैसे वाचवून काही बँकेचं कर्ज काढून नवीन मिळेल अशी थोडी ब-यापैकी जमीन विकत घेतली. नवीन विहीर, झाडं. परिश्रमानं सगळे करातहेत. मी कोणासाठीही काही कमी केलेलं नाही. सगळे खूप कष्ट करतात. दोन्ही आयांचं चांगलं चाललेलं आहे. तसं चांगलं आहे.” माझ्या डोळ्यांतून पाणी ओघळत होतं. वेणूताई, यशवंतराव माझ्याशी बोलत राहिले. हळूहळू मी पुन्हा बोलत गेलो, “साहेब, मी आता सांगितलं तसं सगळं चांगलं आहे. भावंडांची लग्नं केली. चांगल्या सुंदर गुणी मुली. माणसंही संबंधातली चांगली आहेत. एक भाऊ जुगार पत्त्याच्या नादी लागला. घरातलं पुष्कळ काही त्यानं विकलं. त्याच्या बायकोचे दागिने सगळे मोडून टाकले. तिला त्रास दिला. गावातूनही कुठून उसने पैसे घेतले. फारच वेड्यासारखं वागतो. त्याला बोललो, दटावलं तेव्हा तो घरातून कुठेतरी दूर निघून गेला. खूप धुंडत फिरलो. लाज वाटते. धाकटी आई अंथरूणावर त्याच्यासाठी रोज रडते. सगळी धडपड उभं राहणं चाललं आहे. मुख्यत: त्यांच्यासाठी.