यशवंतराव पळसखेडला माझं दु:ख हलकं करायला मुख्यमंत्र्यांना घेऊन आले. ज्या पद्धतीनं त्यांनी संपूर्ण दिवस पळसखेडला आमच्या कुटुंबीयांना दिला, कुठेच सापडणार नाही अशी जिव्हाळ्याची आपलेपणाची वागणूक लोकांसमक्ष दिली त्याचा वृत्तांत महाराष्ट्रभर अनेक वृत्तपत्रांनी दिला. अनेकांनी समक्ष पाहिलं. या गोष्टीची आश्चर्यकारक चर्चा त्या वेळी सर्वत्र होती. ते सगळ्यांना नवलाईचं वाटलं. या सगळ्या दिवसांपासून गावातील, तालुक्यातील व इतरत्रसुद्धा काही मोठे लोक, विशेषत: राजकारणाशी संबंध असलेले लोक मला हस्ते-परहस्ते इतका त्रास देऊ लागले की मला जगणं कठीण झालं. मला, माझ्या कुटुंबीयांना खुनाची राजरोस धमकी दिली गेली. मी त्यांचा कोणताही स्पर्धक नाही हे त्यांना खूप समजावून सांगूनही समजत नव्हतं. बाबा वारल्यानंतर त्यांच्या मृत्यूचा दाखला सहीनिशी द्यायचा ग्रामपंचायतीच्या सरपंच व पंचांनी टाळला. माझे सर्व शेतीबाडीचे व कर्जाचे व्यवहार त्यामुळे अलग करता येत नव्हते. गोठवणूक झाली. महिना-दोन महिने मला साधा ग्रामपंचायत दाखला मिळाला नाही. कोणीतरी प्रेसवाल्यानं बहुधा गोपाळ साक्रीकरनंच हे छापल्यावर मला आणखीनच त्रास झाला. यशवंतरावांनी पळसखेडला येण्यामुळे किती शत्रुत्व झालं होतं, हे मलाच माहीत. तेही अकारणी. काही संबंध नाही. वृत्तपत्रातून मृत्यूच्या दाखल्याचं व त्रास देण्याच्या संदर्भातलं छापून आल्यावर कोणीतरी दादांना व चव्हाणसाहंबांना सांगितलं. आपलीच माणसं मला त्रास देत आहेत हे त्यांना कळलं. यशवंतरावांनी वसंतदादांशी चर्चा केली. पूर्ण माहिती मिळविली. खरंखोटं काय ते मला न समजू देता जिल्हा पोलिसप्रमुखाच्या मार्फत मिळविलं. मला काहीच कळविलं नाही. नंतर मला हे समजलेलं होतं.
जिल्हा पोलिसप्रमुख फारच शिस्तीतले. त्यांचा जिल्हाभर दबदबा व खूप धाक. त्यांनी मला काहीएक समजू न देता उलटसुलट विचारलं. नको ते प्रश्न केले. मी खरं ते सांगितलं. तरीही ते करडे होते. साध्या वेशात त्यांनी काही लोकांना दोन-तीनदा गावात पाठविलं होतं, असं नंतर कळलं. माझी उलटतपासणी करणारे ते पोलिसप्रमुख माझ्या शत्रूंनीच पाठवले असावेत, असंच मला स्पर्शून गेलं. मात्र ते माझ्या पाठीशी भक्कमपणानं उभे राहिले. माझ्याकडून रीतसर अर्ज लिहून घेतला व अशा पद्धतीनं भारी काम केलं की माझे विरोधक व त्रास देणारे पार हबकून मेटाकुटीस आले होते. कायमचा बंदोबस्त होईल असं काही त्यांनी केलं. नंतर हे पोलिसप्रमुख साहित्य कवितेच्या त्यांच्या प्रेमामुळं माझ्या आयुष्यभराच्या ऋणानुबंधात आले. बकबक करणारी मंडळी वठणीवर आणण्याचं काम त्यांनी केलं. नंतर समजलं. यशवंतराव व वसंतदादा सातत्यानं त्यांच्याशी संपर्क साधून होते. माझी काळजी घेत होते.
एवढा प्रचंड व्याप यशवंतरावांच्या जवळ असताना त्यांनी दोन तीन महिने सातत्यानं यात विचारीत राहावं, काळजी घ्यावी ही सामान्य गोष्ट नाही. कुठेही असं आढळत नाही. माझा तसा त्यांना कुठेही फार उपयोग नव्हता. कविता हे एकच माध्यम होतं की ज्यासाठी ते माझ्यात रसिक म्हणून अडकले व नंतरच्या माणूसपणातल्या थोर भावनेनं सगळ्या सुखदु:खांत उभे राहिले. आज कुठेही असल्या गोष्टींचा थोडाही मागमूस सापडत नाही.
यशवंतरावांना एकदा मी एक पत्र पाठविलं. बीडचं बंकटस्वामी महाविद्यालय बंद पडलं होतं. त्या महाविद्यालयातला समाजशास्त्राचा प्राध्यापक असलेला माझा मित्र नरेश परळीकर. पुढे बंकटस्वामी महाविद्यालय सुरू झाल्यानंतर तिथल्या प्राचार्याच्या कृष्णलीलांना कंटाळून निषेध म्हणून राजीनामा देऊन नरेश घरी बसला होता. तो बेकार झाला होता. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती फारच हलाखीची होती. केवळ नरेशवर सगळं कुटुंब होतं. काहीतरी करून नरेशच्या नोकरीचं झालं पाहिजे म्हणून मी अस्वस्थ होतो. मी यशवंतरावांना कळविलं. तेव्हाचे शिक्षणमंत्री शरदराव यांची भेट घ्यायला त्यांनी मला सांगितलं. ते बोलणार होते. जवळपास त्याच सुमारास औरंगाबादला शरदराव आलेले होते. मी सुभेदारी विश्रामगृहात त्यांना भेटायला गेलो. रात्रीचे दहा वाजले होते. त्यांची-माझी कधीच समक्ष ओळख झालेली नव्हती.