त्यांचे पी. ए. श्री. दळवी म्हणाले, आता भेटता येणार नाही. मी माझं नाव लिहून देऊन निघालो. गेटपर्यंत गेलो होतो तेवढ्यात दळवी धावत आले व पवारसाहेबांनी तुम्हांला तात्काळ बोलविलंआहे असं सांगितलं.
काळा मातकट चौकडीचा कोट व टोपी अशा वेशात मी आत गेल्यावर त्यांनी माझं स्वागत केलं.
“मोसंबी पिवळी पडून डायबॅकनं बागा नष्ट होत आहेत. तुमची मोसंबी तुम्ही कशी चांगली ठेवलीत?”
-अशी सुरूवात त्यांनी केली. मी माहिती दिली. माझ्या एक-दोन पुस्तकांसंबंधी त्यांनी विचारलं. ती त्यांनी वाचलेली होती. नंतर शेतीचं व खेड्यातलं बोलणं निघालं. माझ्या लक्षात आलं की त्यांना माझी इत्थंभूत अशी बरीच माहिती आहे. बंकटस्वामी महाविद्यालयाचा व नरेशचा विषय मी काढला.
“मी बाहेर एका ठिकाणी जेवायला जाणार आहे. माझ्यासोबत चला. मी तुम्हांला रस्त्यात पाहिजे तिथे सोडतो. गाडीत बोलता येईल.”
“तुम्ही श्री. बापूसाहेब काळदातेंच्या बरोबर जेवणार आहात. कुठे ते मलाही ठाऊक आहे. ते माझेही मित्र आहे.” मी म्हणालो. दोघंही यावर मनमोकळं हसलो व निघालो. यशवंतराव माझ्याशी बरंच बोलले आहेत. तुमच्याजवळ शेतीबाडी, खेडं, साहित्य खूप काही आहे. जे प्रश्न तुमचे आहेत ते उभ्या महाराष्ट्राचे आहेत. तुमच्यावर काही काम सोपविता येईल. नंतर कधीतरी बोलू.
यशवंतराव, शरदराव, मुख्यमंत्री वसंतदादांनी जे काही शक्य होतं ते केलं असेल. पण त्यामुळे वसंतदादांनी नरेशला साहित्य-संस्कृती मंडळात श्री. लक्ष्मणशास्त्रींकडे सरळ संपादनासाठी नोकरीत पाठविलं. नंतर यशवंतरावांमुळेच नरेश दिल्लीला नॅशनल बुक ट्रस्टमध्ये संपादक म्हणून गेला. फार काही खुलासा किंवा चर्चा न करता काम करण्याची ही पद्धत मला नवी होती. औरंगाबादेला काही महिन्यांनी शरदराव आले व मला घेऊन बीडच्या जयभवानी कारखान्याचा गळीत हंगाम समारंभ करून आष्टी मार्गे पुण्याला घेऊन गेले. पुण्याला अखिल भारतीय साहित्य संमेलन पु. भा. भावे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होणार होतं. पूर्णवेळ शरदराव साहित्याच्या प्रवाहांचं, नव्या पुस्तकांचं समजावून घेत होते व यशवंतरावांच्या साहित्याच्या वाचनाबाबत, संर्पकांबाबत फार कुतूहलानं बोलत होते.
मी कुठेही विचलित होऊ नये, खचून जाऊ नये, मला आधार व संरक्षण द्यावं, कुठे प्रतिष्ठाही द्यावी ज्यामुळे मला कोणी त्रास देणार नाही, माझा सर्वत्र उपयोग होईल अशा आशयाचं काही यशवंतरावांनी शरदरावांना नीटपणानं सांगितलेलं असावं. शरदराव यां नि माझा जास्त परिचय नव्हता. संबंधच आलेला नव्हता. म्हणून त्यांच्या स्वभावाची नीट ओळख नव्हती. ते कधीच अशा गोष्टी समक्ष बोलत नाहीत. काय ते कृतीनंच करतात. हे नंतर सहवासानं लक्षात आलं.
मी परळी वैजिनाथला, त्या महाविद्यालयाच्या गॅदरिंगसाठी पाहुणा म्हणून गेलो होतो. सायंकाळी मी माझ्या भाषणाचा समारोप करीत असतानाच दोन-चार पुढारीमंडळी धावत आल व त्यांनी मला पुष्पहार घातले. मी राज्यपाल नियुक्त आमदार झाल्याची बातमी सायंकाळच्या आकाशवाणीवर होती.