यशवंत चिंतनिका २०

स्त्री व समाज

जेव्हा स्त्रीत बदल होत जातो, तेव्हा समाजातही बदल होणं अटळ असतं. समाजबदलाची प्रक्रिया ही स्त्रीच्या बदलात प्रतिबिंबित होत असते. समाजाबदलाची ती इंडेक्स असते. कोणत्याही समाजात बदल होत आहे की नाही, होत असेल, तो किती, कसा होतो आहे, हे जर अभ्यासायचं असेल, तर स्त्रीमधील बदल लक्षात घेतला, तरी कळू शकतं.

म्हणून म्हणावंसं वाटतं, भारतीय समाजात निश्चितपणे बदल घडू पाहताहेत, कारण भारतीय स्त्री बदलते आहे. हुंडाविरोधी, बलात्काराविरोधी आंदोलन करायला घरातील स्त्री आता रस्त्यावर येत आहे. समाजात बदल घडवायला, समाजातील दीनदुबळ्यांना प्रेम द्यायला ती हिरिरीनं पुढं सरसावली आहे. स्त्रीनं पुरूषाला संसारात सुखदु:खांत साथ दिली. आता पुरूषानं तिलाही साथ देण्यासाठी आपणहून पुढं यायला हवं.