यशवंत चिंतनिका १९

संध्या-छाया

चाळिशी म्हणजे जीवनाची माध्यान्ह. बालपण केव्हाच संपलेलं असतं. तारूण्य संपत आलेलं असतं. एकीकडे म्हातारपणाची चाहूल लागत असते, तर दुतरीकडे तारूण्याची गोड, आनंदी, जिद्दीची, उमेदीची वर्षं अजूनही सकाळीच खुडलेल्या फुलांसारखी ताजी असतात. त्याचबरोबर आता सुकून जाण्याची वेळ आली आहे, ही खंतही मनात जन्म घेत असतेच. एकीकडे जीवनाबद्दल प्रचंड अभिलाषा, तर एकीकडे संपत चाललेल्या प्रवासाचं टोक  नजरेसमोर येऊ लागलेलं!

आयुष्याची संध्याकाळ सुखासमाधानानं ख-या अर्थानं निवांतपणात, निरोगी मनानं घालवायची असेल, तर त्याची तयारी चाळिशीतच करायला हवी. कडलट आठवणी, कटू अनूभव, दु:खद प्रसंग-सगळं बाजूला ठेवून, नव्या उमेदीनं पुढच्या प्रवासाच्या तयारी करायला हवी.