विदर्भ असो, मराठवाडा असो, कोंकण असो किंवा इतर दुसरा कोणता विभाग असो, तेथील सर्व प्रश्नांकडे आईच्या अंतःकरणानें पाहिलें पाहिजे. त्यांचे जे भिन्न भिन्न प्रश्न असतील ते नीट समजावून घेतले पाहिजेत, आणि ते आईच्या ममतेनें सोडविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. मी ही परीक्षा जरूर देत आहें. सर्व मागासलेल्या लोकांच्या विकासाचा प्रश्न ह्याच माध्यमांतून सोडवितां आला पाहिजे. त्यांचेहि अनेक प्रश्न आहेत. शेतीचा प्रश्न, सहकाराचा प्रश्न, विणकरांचा प्रश्न आपुलकीनें सोडवितांना मी नापास होणार नाहीं असा माझा दावा आहे. हे प्रश्न सोडवीत असतांना माझी दृष्टि निरपेक्ष आहे. यामागील चढउताराच्या घटनांमुळें आपल्यापैकीं कांहींची मनें दुखावलीं, पण त्यामुळें राज्याची परीक्षा होत नाहीं. राज्याचे प्रश्न सोडविण्याच्या कांहीं कसोट्या असतात. त्या मूळ कसोट्या आपण लक्षांत घ्या व नंतर बोला, आपल्याकडून मी एवढीच अपेक्षा करतों.
माझ्या पूर्वीच्या मित्रांना आज विरुद्ध बाजूला पाहून मला दुःख होतें. त्यांनीं महाराष्ट्र राज्याचा हा जगन्नाथाचा रथ पुढें नेण्यासाठीं मदत करावी. जगन्नाथाचा हा रथ पुढे नेण्यासाठीं रक्तामांसाची मानवी शक्ति पणास लावावी लागेल. जनतेच्या संघटित शक्तीवरच तो पुढें जाईल. ह्या प्रयत्नांत मी मागें पडणार नाहीं. परंतु माझी दृष्टि आपण समजावून घेतली पाहिजे. मी लोकशाहीचा पुरस्कर्ता आहें. लोकशाहीच्या आड येईल असें कांहींहि माझ्याकडून होणार नाहीं. माझ्या या विरोधी मित्रांनीं माझा मार्ग समजावून घ्यावा व आपलाहि मार्ग समजावून सांगावा. हाच लोकशाहीचा मार्ग आहे.
आज इकडे पूर्वेकडे आणि हिमालयाच्या उत्तरेकडे युद्धस्थिति निर्माण झाली आहे. चीनचें संकट समोर उभें आहे. त्याला तोंड देण्यासाठीं आपण आपली शक्ति एकवटली पाहिजे. त्यासाठीं समर्थ म्हणून आम्हांला जगतां आलें पाहिजे. आम्ही समर्थ झालों तर कुणीं कितीहि भीति दाखविली, तरी त्याला आम्ही भीक घालणार नाहीं. पण त्याकरितां शक्ति वाढविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. ती शक्ति शेतीचा, उद्योगधंद्यांचा आणि शिक्षणाचा विकास केल्यानेंच वाढणार आहे. ह्या सर्व प्रगति घडवून आणण्यासाठीं नवीन क्रांतिकारक दृष्टि ठेवून प्रयत्न झाले पाहिजेत. आपण म्हणतों आपल्याला देश बदलावयाचा आहे. पण देश बदलावयाचा म्हणजे त्यांतील विंध्य, सातपुडा, सह्याद्रि हे पर्वत बदलावयाचे आणि त्यांतील नद्या बदलावयाच्या असा त्याचा अर्थ नव्हे. देश बदलणें म्हणजे देशांतील माणसें बदलणें, त्यांच्या विचारांत बदल होणें. हें सर्व त्यांच्यांत नव्या शक्तीचा संचार झाल्यानेंच घडून येणार आहे. त्याकरितां नवीन वातावरण निर्माण करण्याची जरुरी आहे. आपण छोटेसेंच क्षेत्र जबाबदारीने अंगावर घेऊन त्यांतील प्रश्न आपसांत वाटून घ्या. त्याशिवाय हें वातावरण निर्माण होणार नाहीं.
नागपूर शहर व विदर्भांतील जनता स्वातंत्र्यसंग्रामांत नेहमींच आघाडीवर राहिली आहे. नागपूर काँग्रेसला इतिहास आहे. ह्या ठिकाणीं काँग्रेसच्या विचारांना ऐतिहासिक कलाटणी मिळालेली आहे. अशा या व्यापक परंपरेंत वाढलेल्या येथील काँग्रेस कार्यकर्त्यांत राष्ट्रव्यापी प्रेम, श्रद्धा, त्याग आणि एकजिनसीपणा हे गुण प्रकर्षानें वास करीत असतील याबद्दल मला खात्री आहे. मला जुना इतिहास आठवतो. गांधीजी आमच्या राष्ट्राचे सेनापति होते. आजहि प्रत्येक राष्ट्रांत सेनापति आहेत. परंतु गांधीजींचें सेनापत्य आणि आजच्या लष्करांतील सेनापतीचें सेनापत्य यांत फरक आहे. शत्रूंशी लढाई करतांना लष्कराचा सेनापति सैन्याच्या पुढें राहून हुकूम देत नाहीं. चाळीस, पन्नास, शंभर मैल मागें राहून शत्रूवर चालून जाण्याचा तो हुकूम देतो. गांधीजींचे सेनापत्य वेगळे होतें. १९३० सालीं मिठाचा सत्याग्रह झाला. त्या वेळी त्यांनीं कुणाला आदेश दिला नाहीं. तुम्ही या म्हणून त्यांनीं बिहारमध्यें राजेंद्रबाबूंना किंवा गुजरातमध्यें सरदार पटेलांना सत्याग्रह करण्याचा कधींच आदेश दिला नाहीं.