सह्याद्रीचे वारे - ९५

आजच्या या स्वातंत्र्याच्या काळांत राजकीय कीं सामाजिक हा प्रश्न आतां फारसा राहिलेला नाहीं. सामाजिक क्रांति हेंच आतां आपल्या सर्व सार्वजनिक जीवनाचें एकमेव उद्दिष्ट बनलें आहे. सुदैवानें या देशाचे राजकीय क्रांतीचे प्रयत्नहि केवळ परका इंग्रज जावा आणि स्वकीयांचें राज्य यावें या स्वरूपाचे नव्हते. तर या राजकीय क्रांतीवांचून सामाजिक प्रश्न सुटूं शकणार नाहींत अशी त्या प्रयत्नांमागील विचारांची दिशा होती. त्यामुळें समाजकल्याण हें साध्य व स्वराज्य हें साधन अशीच आमच्या राजकारणाची बैठक राहिली. आतां स्वराज्य मिळाल्यानें प्रत्येक कार्यकर्त्याला, मग तो राजकीय क्षेत्रांतील असो वा समाजिक क्षेत्रांतील असो, सामाजिक सुधारणेच्या व उन्नतीच्या दृष्टीनेंच काम करावें लागत आहे, असें म्हटलें तर वावगें होणार नाहीं. सामाजिक सुधारणांबद्दल कदाचित् कार्यकर्त्यांत मतभेद असतील, कदाचित त्या सुधारणा किती वेगानें व कोणत्या पद्धतीनें अंमलांत आणाव्यात याबद्दलहि मतभेद असतील. परंतु स्वराज्यप्राप्ती नंतरची कुठल्याहि क्षेत्रांतील वैचारिक वा सार्वजनिक हालचाल समाजकारणाच्या भूमिकेवरून चालू आहे व चालू असली पाहिजे याबद्दल दुमत होणार नाही. नवसमाजनिर्मिती हें आतां भारताचें एकमेव उद्दिष्ट असून लोकशाही स्वराज्य हें त्याचें साधन आहे. बहुतेक सर्व पक्षांतील वा पक्षातीत विचारवंतहि हा सिद्धांत मान्य करूं लागले आहेत. सारांश, राजकारण हें स्वराज्यप्राप्तीनंतर समाजकारण बनलें आहे. अशा या काळांत सामाजिक परिषदांसारख्या परिषदा कोणती कामगिरी बजावूं शकतील याबद्दलचे माझे विचार मी आपणांसमोर मांडूं इच्छितों.

मीं आतांच म्हटल्याप्रमाणें राजकारण जर समाजकारण बनलें असेल तर मग स्वतंत्र सामाजिक परिषदांची आवश्यकताच काय, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. परंतु राजकारण हें जरी आज समाजकारण बनलें असलें तरी सर्व समाजकारण म्हणजे राजकारण नव्हे हें आपण लक्षांत ठेवलें पाहिजे. राजकारण हा समाजकारणाचा एक भाग आहे. परंतु केवळ राजकारणाच्या आधारें समाजकारण यशस्वी होऊं शकणार नाहीं हें आम्हांला गांधीजींनी शिकविलें. समाजहितावर दृष्टि ठेवून ज्या सुधारणा आपण घडवून आणूं इच्छितों त्या सुधारणा जनतेच्या हृदयावर बिंबल्याशिवाय केवळ सत्तेच्या जोरावर आपल्याला अंमलांत आणतां येणार नाहींत. लोकाचाराला न मानवणारी सामाजिक सुधारणा समाजाच्या गळीं उतरविणें किती कठीण काम आहें हें आपण जाणतांच. म्हणून कुठल्याहि खस्ता खाऊन आणि कष्ट सोसून सामाजिक सुधारणा अंमलांत आणण्यासाठी जनतेंत निर्धारानें आणि सातत्यानें कार्य करणारे समाजसुधारक आपणांस हवे आहेत आणि अशा कार्याची आवश्यकता व महत्त्व सर्वांना पटवून देण्यासाठीं सामाजिक परिषदेची आवश्यकता आहे असें मला वाटतें. शिवाय ज्या समाजहितैषी लोकांना समाजहिताची कळकळ आहे त्यांच्यामध्यें सुद्धां समाजसुधारणेबद्दल एकमत असेलच असें नाहीं. हिंदुकोड बिलाच्या वेळीं या गोष्टीचें प्रत्यंतर आपणांस आलेंच आहे. तेव्हां सुधारणेची आस्था असलेल्या मंडळींना एकत्र जमून विचारविनिमय करतां यावा आणि आपापला दृष्टिकोन अधिक पुरोगामी बनवून संघटित रित्या सामाजिक सुधारणेच्या कार्यास धार आणण्याचा त्यांना खास प्रयत्न करतां यावा यासाठींहि परिषदेसारख्या संघटनेची आवश्यकता असून या कामीं आपल्या या परिषदेचा बराच उपयोग होऊं शकेल असा मला विश्वास वाटतो. शिवाय सामाजिक सुधारणेसाठीं जी हवा आपणांस पैदा करावयाची आहे त्यासाठीं सुद्धां सामाजिक परिषदेसारख्या संस्थेचें कार्य अधिक उपयुक्त होईल असें मला वाटतें.

सामाजिक समता ही सामाजिक सुधारणा ठरविण्याची मुख्य कसोटी आहे हें आपण जाणतांच. सामाजिक विषमतेनें जर्जर झालेल्या आपल्या समाजाला सामाजिक समतेची दीक्षा देणें हा सामाजिक परिषदेच्या कार्याचा प्रमुख उद्देश आहे याबद्दल मला समाधान वाटतें. परंपरागत रूढीनें चालत आलेला व माणसामाणसांना संघटितपणें एकमेकांविरुद्ध वागण्यास शिकविणारा जातिवाद हा भारताला शाप ठरला आहे.