सह्याद्रीचे वारे - १०४

माझ्या सत्कारसंबंधानें मी काय बोलूं? आतांच माझे मित्र लक्ष्मणशास्त्री जोशी यांनीं माझ्या सत्काराबद्दल चार विचार मांडले. न्यायमूर्ति नियोगींसारख्या एका वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध पुरुषानें आशीर्वाद दिले. आबासाहेब खेडकर आणि कन्नमवारजी हे माझे बंधु व स्नेही आहेत, वडीलधारे माझे सहकारी आहेत. त्यांनीं म्हटलें तर आशीर्वाद, म्हटलें तर एक प्रकारची शुभेच्छा व्यक्त करून अभीष्टचिंतन केलें. आपल्यापैकीं अनेकांनीं पुष्पहार दिले, अनेकांनी लेख दिले. या सर्वांचे मी मनापासून आभार मानतों. मघाशीं कुणीं तरी मुर्दाबाद म्हटलें त्यांचेहि मी आभार मानतों. या सगळ्या प्रेमानें मी भारावून गेलों आहें. काय बोलावें तें कळत नाहीं, शब्द सुचत नाहींत. गेल्या दीड-दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील जनतेनें अगदीं पावसासारखा माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. मला जनतेचें असें हें प्रेम मिळालें हें मी माझें भाग्य समजतों. महाराष्ट्रांचा पहिला मुख्यमंत्री होण्याचें भाग्यहि मला मिळाले. ईश्वरानें मला हें सर्व दिलें, त्याबद्दल कृतज्ञतापूर्वक मी त्याचे आभार मानतों. पण या सगळ्यामध्यें, ज्यांच्यासाठीं आपण थोडीफार चाकरी करण्याचा प्रयत्न करतों त्या जनतेचें जें प्रेम आहे तीच माझी सर्वांत मोठी शक्ति आहे. ही शक्ति दुस-या कोठल्याहि गोष्टीनें मिळत नाहीं. या आपल्या प्रेमाच्या वर्षावानें माझें मन संपूर्ण तृप्त आहे. व्यक्ति म्हणून मला मागण्यासारखें कांहीं राहिलेलें नाहीं.

पण हे सर्व झाल्यानंतर मला एक विचार आपणांला सांगावयाचा आहे आणि तो विचार व्यक्तिपूजेचा नाहीं. कारण माझ्या जीवनाकडे थोड्याशा ति-हाईत दृष्टीनें पाहण्याचा जेव्हां मी प्रयत्न करतों तेव्हां माझ्या मनांत एक विचार चमकून जातो. तो विचार असा कीं एखाद्या कालखंडामध्यें अशी कांहीं जबरदस्त शक्ति निर्माण होते कीं त्या शक्तीमुळें कांहीं कांहीं माणसांना मोठेपण मिळून जातें. तशीच गोष्ट माझ्या बाबतींत घडली. हिंदुस्तानच्या इतिहासांत, हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा म्हणून एक नवा खंड निर्माण झाला. आमच्या देशांतील नेत्यांच्या कर्तृत्वानें आणि पुण्याईनें, टिळक-गांधींच्या युगांत या देशामध्यें अशी एक परिस्थिति निर्माण झाली, असें एक वातावरण निर्माण झालें कीं त्या वातावरणामध्यें जो जो पुढें गेला तो तो या महाभागांच्या आशीर्वादानें आणि पुण्याईनें मोठा झाला. माझ्यासारखा एक मनुष्य; देश म्हणजे काय, सरकार म्हणजे काय तें कळत नव्हतें अशा वयांत, मनाच्या उमेदीनें मी राष्ट्रीय झेंडा राष्ट्रीय तिरंगा -खांद्यावर घेतला आणि खेड्यांतलें हें एक मूल या चळवळीमध्यें स्वांतत्र्याच्या या यात्रेमध्यें सामील झाले. आणि त्यांत सामील झाल्यामुळेंच मी आज या परिस्थितीला पोहोंचलों अशी माझी भावना आहे. कारण, ती चळवळ म्हणजे त्या युगाची प्रेरणा होती. एक प्रकारच्या जनस्वातंत्र्याची आणि एक प्रकारच्या जनकल्याणाची ती प्रेरणा होती. एक प्रकारच्या समतेची आणि एक प्रकारच्या लोकांच्या सामर्थ्याची ती प्रेरणा होती. त्या प्रेरणेशीं मी समरस झालों, एकरूप झालों. आणि आजहि त्या प्रेरणेंचेंच मी प्रतिनिधित्व करतों आहें. तेव्हां आम्हांला कशाचें स्वागत करायचें असेल, कशाचें अभीष्टचिंतन करायचें असेल तर तें या प्रेरणेचें केलें पाहिजे. ती प्रेरणा गांधीजी गेले पण थांबली नाहीं; ती वाढतच गेली. त्या प्रेरणेनें आमचीं मनें जागृत झालीं व त्या प्रेरणेंतूनच आम्हांला आमचें स्वातंत्र्य मिळालें. तेव्हां ही जी प्रेरणा आमच्या जीवनामध्यें निर्माण झाली आहे, त्या प्रेरणेंतून एक नवी शक्ति वाढीस लावून एका आर्थिक व सामाजिक समतेची आपणांस स्थापना करावयाची आहे. इतिहासानें आपणांवर टाकलेली ही जबाबदारी असून इतिहासाच्या सामर्थ्यांतून ती निर्माण झाली आहे. इतिहासाचें हें जें सामर्थ्य आहे तें समजावून घेऊन प्रामाणिकपणानें आणि बुद्धीच्या व भावनेच्या निष्ठेनें त्या सामर्थ्याशी आपण एकरूप झालें पाहिजे. हेंच काम आज आपल्या देशामध्यें चाललें आहे.

परंतु आज सबंध दुनियेमध्ये मनाचा थरकांप उडावा अशी परिस्थिति आहे. प्रामाणिकपणानें कष्ट करून शांततेनें विकास करूं इच्छिणा-या मानवतेला भीति वाटावी अशी ही परिस्थिति आहे. परंतु मानवता हें आज एक सामर्थ्य आहे, ती एक दृष्टि आहे. ही दृष्टि दुनियेमध्यें कशी यशस्वी होईल, कशी आरोग्यशाली बनेल, कशी सामर्थ्यशाली बनेल, ती कशी पुढें पुढें जात राहील याचा विचार आज आपण सर्वांनी करावयास पाहिजे. मग तुम्ही महाराष्ट्रांत असा किंवा गुजराथमध्यें असा; लाओसमध्यें असा किंवा अमेरिकेमध्यें असा; किंवा तिकडे रशियामध्यें कुठें असा. आज हा मानवजातीचा खरा प्रश्न आहे. तुमचा माझा कोणताहि पक्ष असूं द्या; तुमची माझी कोणतीहि भाषा असूं द्या; आज हा मूळ विचार मनामध्यें ठेवून त्या मूळ विचाराशीं आमचें वागणें, आमचे बोलणे व आमचें आचरण सुसंगत आहे कीं नाहीं याचा विचार करूनच आम्हांला आमचीं पावलें टाकलीं पाहिजेत. ही महत्त्वाची गोष्ट आमच्या देशामध्यें, आमच्या कामामध्यें आम्हांला पाहिली पाहिजे.