सह्याद्रीचे वारे -८९

आतां ही गोष्ट खरी आहे कीं हे प्रश्न सोडविण्यासाठीं आर्थिक मदत देण्याची जबाबदारी, अंशतः कां होईना, शासनांना उचलावी लागते. परंतु या बाबतींतील परिस्थिति कोणत्याहि दृष्टीनें निराशाजनक नाहीं. आपल्या आर्थिक विकासाची वाढती गति लक्षांत घेतां अधिक चांगल्या सुखसोयी पुरविण्याची आपली ताकद दिवसेंदिवस वाढणार आहे. आज विद्यापीठांतील गर्दीवर होणारी टीका ही ब-याच अंशीं, उपलब्ध साधनसामुग्री आणि शिक्षणाच्या वरच्या पातळीवरील त्यासंबंधींची गरज यांचा बरोबर मेळ घातला न गेल्यामुळेंच होत आहे. म्हणून केवळ तात्पुरत्या स्वरूपाचे हे दोष नाहींसे करण्यासाठीं विद्यापीठांतील प्रवेशावर निर्बंध लादण्याचे दीर्घकालीन धोरण अवलंबिणें योग्य होईल असें मला वाटत नाहीं.

विद्यापीठांतून वाढत्या प्रमाणावर होणा-या गर्दीचा हा जो प्रश्न आहे त्याची छाननी करणें कदाचित् उद्बोधक ठरेल. वैद्यकीय, तांत्रिक अथवा स्थापत्य विषयक शिक्षण देणा-या संस्थांत गर्दीचा प्रश्न फारसा गंभीर होण्याची शक्यता नाही. कारण या शिक्षणासाठीं लागणारी जागा व साधनें कांहीं विशिष्ट दर्जांचीं असावींच लागतात. शिवाय या शिक्षणाचें स्वरूपच असें आहे कीं, त्यासाठीं विद्यार्थ्यांकरितां वसतिगृहाची बरीच मोठी सोय करावी लागते. तसेंच या शिक्षणक्रमांत विद्यार्थी व शिक्षक यांचे अगदीं निकटचे संबंध येत असतात. परंतु साहित्य, कला व समाजशास्त्रें ह्या विषयांकडे जेव्हा आपण वळतों तेव्हां मात्र आपल्याला वेगळेंच चित्र दिसतें. याच शास्त्रांच्या बाबतींत सर्वांत जास्त गर्दी झालेली आपणांस पाहावयास मिळते. विज्ञान आणि कायदा या शास्त्रांतील शिक्षणासाठींहि अशीच कांहींशी गर्दी होत असल्याचें आपणांला दिसेल. विद्यापीठांतील गर्दीसंबंधीं ज्या अनेक प्रश्नांची चर्चा आपण पुष्कळ वेळां ऐकतों ते प्रश्न बहुतांशीं वरील शंकांच्या बाबतींतच आढळून येतात. विद्यार्थ्यांच्या गर्दीला येथेंच जमावाचें स्वरूप प्राप्त होतें आणि आपला मतलब साधण्यासाठीं कांहीं बाहेरची मंडळी या परिस्थितीचा, सहज फायदा उठवूं शकतात. याच विद्यार्थ्यांमध्यें आपणांला पुष्कळ वेळां बेफिकिरीची व आक्रमक प्रवृत्ति दिसून येते, आणि या प्रवृत्तींतूनच कधीं कधीं बेशिस्त आणि गैरवर्तनाचें प्रकार घडत असतात. विद्यार्थ्यांतील बेशिस्तीवर आज तुमच्यापुढें प्रवचन देण्याचा माझा उद्देश नाहीं. विद्यार्थ्यांतील बेशिस्तींतून निर्माण होणारे प्रश्न प्रायः विद्यापीठांनीच सोडविले पाहिजेत. परंतु विद्यापीठांतील ही परिस्थिति, देशाच्या आणि उच्च शिक्षणाच्या भवितव्याबद्दल काळजी वाहणा-या सर्वांनाच एक अतिशय चिंतेचा विषय होऊन बसली आहे, एवढेंच मी येथें सांगूं इच्छितों.

तुमच्या विद्यापीठाचें स्वरूप धार्मिक असूनहि त्याचीं द्वारें भौतिक ज्ञान आणि विज्ञान यासाठीं खुलीं करण्यांत आलीं असल्यामुळें आपल्या विद्यापीठीय जीवनांत निर्माण झालेली ही अस्थिरता दूर करण्याच्या दृष्टीनें तुमचें विद्यापीठ अधिक प्रभावी रीतीनें प्रयोग करूं शकेल असें मला वाटतें. तरुण स्त्री-पुरुषांत आज जी एक प्रकारची बेबंद वृत्ति वाढत आहे तिला तुमचें विद्यापीठ आळा घालूं शकेल आणि त्याचबरोबर अहंमन्यता, वृथाभिमान व असहिष्णुता या दोषांनाहि त्याला पायबंद घालतां येईल. तुमच्या या विद्यापीठाचें स्वरूप असें आहे कीं कोणत्याहि प्रकारच्या अलगपणाच्या भावनेला येथें वाव नाहीं व पुढेंहि तो राहतां कामा नये. ज्या थोर परंपरेचे तुम्ही प्रतिनिधि आहांत त्या परंपरेंतील लोकशाही प्रवृत्तींची जोपासना आणि विकास केल्यानें आपल्या देशांतील लोकशाहीपुढील प्रश्न सोडविण्यासाठींहि या प्रवृत्तींचा तुम्हांला उपयोग करून घेतां येईल आणि त्यायोगें ही परंपरा तुम्ही अधिक संपन्न करूं शकाल. सध्यांच्या जगांत विज्ञान आणि तंत्रशास्त्र यांना साहजिकच फार महत्त्व आहे.

तथापि सनातन अशा ज्ञानाचा व विद्येचा लाभ तुमचें हें विद्यापीठ नेहमींच देऊं शकेल. महत्त्वाची गोष्ट ही कीं तुमच्या विद्यापीठांतील विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित आहे; आणि ती तुमच्या फायद्याचीच आहे. कारण त्यायोगें लोकाशाहींतील नागरिकास आवश्यक असणारे गुण विद्यार्थ्यांच्या अंगीं बाणावेत, आणि स्वातंत्र्य व समता यांवर आधारलेला जो समाज निर्माण करण्याचा आज आपण प्रयत्न करीत आहोंत त्याचे ते जबाबदार घटक बनावेत म्हणून शैक्षणिक क्षेत्रांत तुम्हांला प्रयोग करणें केव्हांहि अधिक सुलभ जाईल.