त्यांतली पहिली गोष्ट, पहिलें पथ्य असें आहे की, आपण संशयानें एकमेकांकडे पाहावयाचें नाहीं, संशय निर्माण करावयाचा नाहीं. संशयाचें वातावरण निर्माण झालें तर तें आपल्या हातानें आपण दूर केलें पाहिजे. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती गुणांची पूजा, 'मेरिट'चें महत्त्व. निवडणुकांत, राज्यकारभारांत आणि अनेक सामाजिक महत्त्वाच्या कामांत गुणांना महत्त्व दिलें पाहिजे. गुणांची पूजा होणें अत्यंत जरूर आहे आणि याच भावनेचा पाठपुरावा आपणांकडून झाला पाहिजे. भंगलेलें मन सांधण्याचे माझ्या मतानें हेच दोन उपाय आहेत. ह्या दोन गोष्टी जर आपण स्वीकारल्या तर हें भंगलेलें मन जोडण्याच्या दृष्टीनें आम्हांला पुष्कळच प्रगति करतां येईल.
या भंगलेल्या मनाचा दुसरा एक परिणाम महाराष्ट्राच्या जीवनांवर झालेला आहे, तो म्हणजे नवबौद्धांचा प्रश्न होय. त्याला महार समाजाचा प्रश्न म्हणून आपण सामान्यतः म्हणतों. परंतु निव्वळ महार जातीचा तो प्रश्न आहे या दृष्टिकोनातून मी त्याकडे पाहात नाहीं. डॉक्टर आंबेडकरांनीं त्या समाजांत नवी जागृति निर्माण केली व अनेक बुद्धिमान, विचार करणा-या कर्तृत्ववान तरुणांचा एक नवा वर्ग त्यांनीं त्या समाजांतून निर्माण केला. एवढ्या मोठ्या संख्येनें तुमच्या आमच्या बरोबर जो समाज महाराष्ट्रांत वावरला आणि ज्याला आपण अस्पृश्य म्हणून बाजूला फेकून दिलें त्या समाजाचा स्वाभिमान आज जागृत झाला आहे. ह्या समाजांत जे कर्तृत्ववान आणि बुद्धिमान लोक आहेत त्यांना आपण आतां जवळ केलें पाहिजे, आपलेसें केलें पाहिजे. आम्हांला कुणाची सहानुभूति नको आहे, आमचा जो हक्क आहे तो आम्हांला मिळालाच पाहिजे आणि आम्ही तो मिळविणार आहोंत, या जिद्दीनें काम करण्याची कुवत त्यांच्यांत निर्माण झाली आहे. तिचें आम्हीं स्वागत केलें पाहिजे. नवीन महाराष्ट्र चांगल्या कर्तृत्ववान हातांनी घडवावयाचा असेल तर मनांत असलेले जुने राग व जुने द्वेष दूर केले पाहिजेत. त्यांचा तो रिपब्लिकन पक्ष असला तरी हरकत नाहीं. सामाजिक आणि बाकीच्या इतर क्षेत्रांत आम्हीं त्यांना जवळ केलें पाहिजे. तुमच्या शहरी जीवनांत ठीक आहे. पण महाराष्ट्र हा जास्तींत जास्त खेड्यांतच राहतो. आणि म्हणून खेड्यांत राहणारा जो बहुसंख्य हिंदू समाज आहे त्याच्या वागणुकीमध्यें, त्याच्या मनामध्यें, आपण या समाजासंबंधीं एक प्रकारची भागीदारीची भावना निर्माण केली पाहिजे, एक प्रकारची समरसता निर्माण केली पाहिजे आणि अशा रीतीनें खेड्यांत एकजिनसी समाजजीवन निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे शब्द जे मी वापरीत आहें त्यांची प्रक्रिया मोठी अवघड आणि लांबलचक आहे याची मला जाणीव आहे. परंतु मी नुसत्या शब्दानें खचून जाणारा माणूस नाहीं. ही एक गरज आहे आणि म्हणून गेल्या दोनतीन वर्षांचा माझा हा प्रयत्न आहे कीं, त्या समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न, नवबौद्ध म्हणतात म्हणून नव्हे, तर माझें कर्तव्य आहे म्हणून मी ते हाताळले पाहिजेत. माझें स्वतःचे असें मत आहे कीं, डॉक्टर आंबेडकरांच्या हयातीमध्यें महार वतनाचा प्रश्न अधिक उदारपणें, अधिक समजूतदारपणानें जर आम्ही त्यांच्याशीं बोलूं शकलों असतों तर त्यांच्या अनुयायांमध्ये आणि आमच्यामध्यें आज जो एक प्रकारचा मानसिक तुटकपणा निर्माण झाला आहे तो कदाचित् निर्माण झाला नसता. आणि म्हणून यापुढें जाणत्या बुद्धीनें, भागीदारीच्या भावनेंनें, महाराष्ट्रांतील या लोकांचा प्रश्न आपण सोडविला पाहिजे. महाराष्ट्राच्या समाजजीवनांतील एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणून आपण या प्रश्नाकडे पाहिलें पाहिजे.
महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनांतील जी तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे तिचें वर्णन 'महाराष्ट्राच्या जीवनांतील विविधतेची जाणीव' अशा शब्दांत आपणांस करतां येईल. The awareness of the varieties in the social life of Maharashtra असें नांव या जाणिवेला, तिच्यासंबंधानें प्रबंध लिहावयाचा प्रसंग आला तर मी देईन. परंतु तशी कांहीं आपत्ति माझ्यावर येणार नाहीं असें मी धरून चालतों. या विविधतेची उत्तम साक्ष म्हणजे महाराष्ट्रातील शेतक-यांचे जीवन. पण शेतकरी ज्या भागांत राहतो त्याच भागांतील शेतक-यांचे जीवन त्याला फार महत्त्वाचें वाटतें असें आपण पाहतों. कोल्हापूरच्या भागांतील शेतकरी त्या भागांतील उसाच्या शेतीचा, लिफ्ट इरिगेशनचा जो प्रश्न आहे तोच सर्व हिंदुस्थानातील शेतक-यांचा प्रश्न आहे असें समजतो.