सह्याद्रीचे वारे - ४

..... आणि आज ह्या नव्या महाराष्ट्राचें जीवन एका नवीन तऱ्हेनें घडावें, त्यांत एक प्रकारची नवी आशा निर्माण व्हावी, त्यांत एक प्रकारचें नवें सामर्थ्य निर्माण व्हावें आणि हें महाराष्ट्र राज्य त्याचें साधन व्हावें अशी जनतेची अपेक्षा आहे.....

महाराष्ट्राच्या भवितव्याची सफर

आज या सभेमध्यें बोलत असतांना दीड-दोन वर्षांपूर्वी मी सांगलीस आलों होतों, त्याची मला आठवण येते. त्या वेळीं अशाच एका प्रसंगीं आपल्याशीं माझ्या मनांतले कांहीं विचार मीं व्यक्त केले होते. त्याच्याहि अगोदर कांही वर्षांपूर्वी माझ्या मनांतील भावना आणि विचार याच सांगलीमध्यें आपल्यापुढें मांडण्याचा मीं प्रयत्न केला होता. हें सर्व पाहतां माझ्या आयुष्यांतील कांहीं महत्त्वाच्या प्रसंगीं माझें म्हणणें मीं सांगलीच्या भूमीवरच मांडावें असा योगायोग दिसतो. आज आपण माझ्या हस्तें भारताचे नेते आणि पंतप्रधान पंडित जवाहरलालजी यांच्या पुतळ्याचें अनावरण केलें. तुम्हां सर्वांच्या वतीनें मी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करतों आणि असें वचन देऊं इच्छितों कीं, भारताचे नेते ज्या तत्त्वासाठीं, ज्या विचारासाठीं, ज्या ध्येयासाठीं स्वतःचें जीवन जगत आहेत त्या तत्त्वासाठीं, त्या विचारासाठी आणि त्या ध्येयासाठी आपण या भागांतले सर्व लोक कटिबद्ध आहोंत. पंडितजींच्या समोर गांधीजींची प्रतिमा आहे आणि गांधीजींच्या समोर पंडितजींची प्रतिमा आहे. गुरू-शिष्य एकमेकांसमोर, तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर, साक्षी आहेत. त्यांना साक्षी ठेवून जें तत्त्व त्यांनी आपल्या जीवनात आम्हांला शिकविलें तें तत्त्व अखेरपर्यंत आम्ही आचरूं अशी शपथ आज आपण घेत आहोंत, हाच या पुतळ्याच्या अनावरण समारंभाचा खरा अर्थ आहे असें मी मानतों.

आज या औचित्यपूर्ण प्रसंगी मी माझे कांही महत्त्वाचे विचार आपल्यापुढें ठेवूं इच्छितो; ते विचार आतां लवकरच साकार होणा-या नवमहाराष्ट्रासंबंधीं आहेत. या नवमहाराष्ट्राचे प्रश्न जर आपणांस यशस्वी रीतीनें सोडवावयाचे असतील तर त्यांचे स्वरूप आपण नीट समजावून घेतलें पाहिजे. त्या दृष्टीनें महाराष्ट्रांतील बहुतेक विचारवंत आज या प्रश्नांची जी चर्चा करीत आहेत ती स्वागतार्हच आहे. कारण, विचारवंतांनी हें काम केलेंच पाहिजे. वेगवेगळ्या प्रश्नांचे पृथक्करण करून त्यांची उलटसुलट बाजू लोकांच्या पुढें त्यांनी मांडली पाहिजे आणि ते तशी मांडीतहि आहेत. आणि म्हणून यासंबंधींच्या चर्चेत आज जाहीरपणानें प्रवेश करण्याचें मी ठरविलें आहे. दुसरें असें की, कांहीं प्रश्नांसंबंधी माझी एक विशिष्ट दृष्टि आहे. तेव्हां महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे मी कोणत्या दृष्टीनें पाहतों हें महाराष्ट्राच्या जनतेपुढें विचारासाठीं मांडणें मी माझें कर्तव्य समजतों. लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणाचीं पहिलीं पावलें टाकलीं जाणार आहेत. अशा वेळी कोणत्या दिशेनें माझे मन काम करीत आहे, कोणते प्रश्न आम्हांला आमच्यासमोर ठेवावयाचे आहेत आणि त्या प्रश्नांची उकल आम्हांला कोणत्या पद्धतीनें करावयास पाहिजे याचा आराखडा जर आम्हीं विचारपूर्वक आमच्यापुढें ठेवला नाहीं तर आंधळ्यासारखा प्रवास करण्याचा प्रसंग आमच्यावर येईल. परंतु आम्हांला आंधळ्यासारखा प्रवास करावयाचा नाहीं, डोळसपणानें करावयाचा आहे. निश्चित ठिकाणीं जाण्यासाठीं आम्हांला हा प्रवास करावयाचा आहे, आणि एका निश्चित गतीनें तो पुरा करावयाचा आहे. अशा प्रकारची उमेद आणि ईर्षा आम्हालां आमच्या मनांत निर्माण करावयाची आहे. आणि म्हणून लक्षांत घेण्यासारखे आज आमच्या समोर कोणते प्रश्न आहेत याचा आपण विचार करावयास पाहिजे. माझ्या मतें हे प्रश्न तीन प्रकारचे आहेत. कांहीं राजकीय प्रश्न आहेत, कांहीं सामाजिक प्रश्न आहेत आणि कांहीं आर्थिक प्रश्न आहेत.