सह्याद्रीचे वारे -७

परंतु आज काय घडत आहे ? या बाबतींत मी नागपूरच्या माझ्या एका मित्राचा उल्लेख करणार आहें. तो म्हणजे श्री. माडखोलकरांचा. ते एक मोठे विचारवंत व थोर साहित्यिक असून त्यांचे माझ्याशीं मैत्रीचे संबंध आहेत. त्यांनी असा प्रश्न उभा केला आहे कीं, महाराष्ट्राच्या निमित्तानें निर्माण होणारे राज्य हें मराठा राज्य आहे कीं मराठी राज्य आहे ? असले प्रश्न उभे करणें ही भंगलेलें मन सांधण्याची प्रक्रिया नाहीं. परंतु अशा त-हेचा प्रश्न उभा करून जातीय आणि संशयाचें वातावरण निर्माण करण्याचा कुणी प्रयत्न केला तर मला त्यांना जरूर सांगावयाचे आहे कीं, हें मराठा राज्य मुळींच होणार नाहीं. जोपर्यंत माझ्या हातांत सत्तेचीं सूत्रें असतील तोपर्यंत निदान, मी हें राज्य एका जातीचें, मराठ्यांचे, किंवा आणखी एखाद्या जातीचें होऊं देणार नाहीं. तें तसें होत आहे असें वाटलें, तर महाराष्ट्राच्या कल्याणाकरितां, मराठा जातींत जन्माला आलो आहें म्हणून मला कदाचित् एका बाजूला हटावें लागलें तरी मी हटण्याचा प्रयत्न करीन, पण ही गोष्ट मी होऊं देणार नाहीं. आणि म्हणून साहित्यिकांना आणि विचारवंतांना मी विचारूं इच्छितो कीं, कशासाठी हा वाद आपण पुन्हा उभा करीत आहांत ? ते संशय, त्या शंका आणि त्या आशंका यांमुळें माझें मन भरून येतें. पुष्कळ वेळां मला बोलणें अवघड होतें. खरोखरच अशा त-हेचे संशयांत पाडणारे प्रश्न आपण कां निर्माण करीत आहांत ? मी नेहमीं सांगत आलों आहें कीं, 'मराठा' हा शब्द जातिवाचक नाहीं. आचार्य अत्र्यांनी आपल्या वर्तमानपत्राला 'मराठा' हें नांव दिलें तें काय तो शब्द जातिवाचक आहे म्हणून दिलें ? 'मराठा' शब्दामागें महाराष्ट्राच्या एकजिनसी जीवनाची भावना आहे. 'मराठा' शब्दाचा हाच अर्थ आम्हांला अभिप्रेत आहे आणि म्हणून मराठी राज्य हें कोणा एका जमातीचें राज्य मुळींच होतां कामा नये, या गोष्टींवर माझा जरूर विश्वास आहे. पण हा जातीयवादी विचार सर्व समाजामध्यें आहे. मी असें म्हणत नाहीं कीं, मराठा समाजांत जातीयवाद नाहीं, ब्राह्मण समाजांत नाहीं, माळी समाजांत नाहीं. सगळ्या समाजांत तो आहे. नाहीं कुठें ? परंतु आम्ही विचारपूर्वक पंचवीस-पंचवीस वर्षे, तीस-तीस वर्षे राष्ट्रीयवादी भावनेला वाहून घेतलेलीं माणसें आहोंत. त्यांच्या अंगीं उगीच कांहींतरी चिटकवून मनाला यातना देऊ नका, जसें मराठ्यांबद्दल इतरांनी बोलतां कामा नये तसें मराठ्यांनींहि इतरांबद्दल बोलतां कामा नये असें माझें मत आहे.

परंतु मराठा राज्य कीं मराठी राज्य हा जो प्रश्न उपस्थित करण्यांत आला आहे त्याच्याशी संबंधित असा एक दुसराहि प्रश्न आहे. तो प्रश्न आतां मी आपल्यासमोर मांडणार आहे. हा जो विचार येतो कीं, हें मराठा राज्य होईल कीं काय, त्याच्या पाठीमागें कांही कारणें आहेत. या कारणांचा आपण आपल्या मनाशी विचार केला पाहिजे. या कारणांपैकीं मुख्य कारण असें आहे की, बुद्धीची, ज्ञानाची सेवा करण्याचें काम ज्या समाजांनीं आजपर्यंत केलें, हिंदुस्तानच्या अलीकडच्या इतिहासांतहि ज्यांनी वैचारिक नेतृत्व केलें त्यांच्या मनांत अशी शंका निर्माण होत आहे कीं, गेल्या दहाबारा वर्षांपासून, निवडणुकीचें राजकारण आल्यापासून संख्याबळावर कांहीं माणसें पुढें जात असतांना आपल्या गुणांची उपेक्षा आणि अवहेलना होणार आहे कीं काय ? अशा प्रकारची जी भावना कांहीं समाजांच्या मनांत निर्माण झाली आहे, तिचा आपण विचार केला पाहिजे. मी पुन्हा एकदां त्यांना सांगतो कीं, त्यांच्या मनांत निर्माण झालेल्या भावनेचा खरा अर्थ मी समजून घेऊं इच्छितो. निव्वळ कर्तृत्ववान, बुद्धिमान अशीं जीं माणसें आहेत त्यांना असें वाटावयाला लागलें कीं, हिंदुस्तान स्वतंत्र झाला आणि महाराष्ट्रहि मोठा झाला, पण ज्या महाराष्ट्राच्या निर्मितीकरितां आपण प्रयत्न केले त्या महाराष्ट्राची निर्मिति झाल्यानंतर आमची जागा पाठीमागच्या बाकांवर राहणार आहे कीं काय ? हा विचार त्यांच्या मनांत येणें स्वाभाविक आहे. आणि म्हणून मला आपल्याला सांगितलें पाहिजे कीं, हें 'भंगलेलें मन' जर आपल्याला एक करावयाचें असेल तर त्यासाठीं दोन गोष्टींची आवश्यकता आहे.