सह्याद्रीचे वारे -८०

ग्रामीण शिक्षणाची माझी कल्पना

ग्रामीण शिक्षणाची माझी कल्पना मीं आज आपणांपुढें सांगावी अशी अपेक्षा आहे. परंतु ग्रामीण शिक्षणासंबंधींची माझी कल्पना सांगण्यापूर्वी, शिक्षण म्हणजे काय याची थोडीफार कल्पना आपण समजावून घेऊं या. पुस्तक वाचून येणारें ज्ञान तें शिक्षण असें समजण्याची एक मोठी प्रथा आहे. आणि ती कांही अंशीं बरोबरहि आहे. परंतु खरें शिक्षण म्हणजे काय याचा अर्थ आपण सगळ्यांनीं आपल्या मनाशीं समजावून घेतला पाहिजे. मीं माझ्या उपयोगासाठीं शिक्षणाची एक सरळ आणि साधी व्याख्या करून ठेवली आहे. शिक्षित व्यक्तीला स्वतःच्या भोवतीं घडणा-या गोष्टी आणि जगामध्यें घडणा-या इतर गोष्टी यांची ज्यामुळें कांहीं संगति लावतां येते, त्यांचा योग्य अर्थ समजावून घेतां येतो, आणि त्यांचा परिणाम आपल्या जीवनावर काय घडतो, आपल्या व्यक्तिमत्त्वावर काय घडतो हें समजावून घेतां येतें आणि समजावून देतां येतें, त्याला मी शिक्षण मानत आलों आहें. ही एक महत्त्वाची गोष्ट ग्रामीण शिक्षणाची कल्पना सांगण्यापूर्वी मला स्पष्ट केली पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला आपल्या नजरेला आणावयाला पाहिजे ती अशी कीं जेव्हां ग्रामीण शिक्षण असा शब्द आम्ही उच्चारतों तेव्हां ग्रामीण आणि नागरी शिक्षण, खेड्यांतल्या लोकांच्यासाठीं शिक्षण आणि शहरांतल्या लोकांच्यासाठीं शिक्षण असे शिक्षणाचे दोन वेगवेगळे प्रकार असावेत असा विचार साहजिकच मनाशीं येतो. तेव्हां या बाबतींत वस्तुस्थिति काय आहे याची अगदी स्पष्ट कल्पना आपल्याला असली पाहिजे.

माझें असें स्पष्ट आणि स्वच्छ मत आहे कीं शिक्षणाचे असे दोन मूलभूत वेगवेगळे प्रकार असूंच शकणार नाहींत. आजच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितींत खेड्यांतला माणूस आणि शहरांतला माणूस यांच्यामध्यें एक प्रकारचें जें कृत्रिम अंतर वाढत चाललें आहे तें वाढतें अंतर कमी करून त्यांच्यामध्यें एक प्रकारचा तोल निर्माण करणें, जवळचा संबंध निर्माण करणें, जिव्हाळा निर्माण करणें हा माझ्या दृष्टीनें आपल्या देशांतील आजचा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रमुख असा प्रश्न आहे. आणि म्हणून ग्रामीण शिक्षण हा कांहीं वेगळा प्रकार आहे अशा समजुतीनें जर आम्ही ग्रामीण शिक्षणाकडे पाहत असलों, तर ती एक आपली मोठी चूक होईल असें मला सांगावेसें वाटतें. आज ज्या त-हेचें शिक्षण आपल्या आवतीभोंवतीं दिलें जातें त्याचा ग्रामीण जीवनावर काय परिणाम होतो ? नमुन्यासाठीं खेडेगावांतला एक मुलगा बाहेरगांवीं शिक्षणासाठीं गेला आहे अशी आपण कल्पना करूं या. त्या शिक्षणाचा त्याच्यावर काय परिणाम घडला, आणि तो ज्या खेड्यांतून आला त्या खेड्यासाठीं त्याचा काय उपयोग झाला याचा आपण विचार केला तर मात्र मनामध्यें एक प्रकारची खिन्नता आल्याशिवाय राहत नाहीं. खेडूत बाप आणि आई यांनीं कष्ट सहन करून शिक्षणासाठीं बाहेर पाठविलेला मुलगा पदवी घेऊन जेव्हां शहाणा होतो तेव्हां तें त्याचें शहाणपण खेड्यामध्यें राहून शेती करणा-या किंवा दुसरा कांहीं उद्योग करणा-या त्याच्या मातापित्यांचें आर्थिक जीवन सुधारण्यास उपयोगी पडत नाहीं. तो शहरामध्यें एखादी सोईची, सुखाची नोकरी मिळावी या भावनेनें खटपट करीत असतो. पुष्कळ वेळां तो यशस्वीहि होतो आणि मग एका अर्थानें, आपले आईबाप आणि ज्या भूमींत, ज्या गांवांत तो वाढला तो गांव व ती भूमि, या सर्वांनाच तो मुकतो. अशा प्रकारचीं कित्येक उदाहरणें मला माहीत आहेत, आपणांसहि माहीत असतील. माझ्या मतानें खरोखरी हें मोठें करुण असें चित्र आहे.

शिक्षणाच्या वाढीबरोबर अशा त-हेचे प्रश्न जर घरोघरीं निर्माण होणार असतील तर मात्र या शिक्षणासंबंधानें तुम्हां-आम्हांला विचार केला पाहिजे. आणि म्हणून गांवांतून शिक्षण घेऊन तयार झालेला तरुण हा गांवांतील शेतीच्या विकासाच्या, ग्रामीण जीवनाच्या विकासाच्या उपयोगी पडण्याइतका सकस नागरिक बनावा या दृष्टीनें जें शिक्षण द्यावयाचें, त्यालाच जर ग्रामीण शिक्षण आपण म्हणणार असलों तर या त-हेच्या ग्रामीण शिक्षणाचा विचार करण्याची आज जरुरी आहे यांत शंका नाहीं.