सह्याद्रीचे वारे -७७

शासनाच्या कामामध्यें राहिल्यानंतर एक गोष्ट मला पटली आणि ती म्हणजे शेतीचा प्रश्न हा या देशांतील मूलभूत असा प्रश्न आहे. आणि तो केवळ हिंदुस्तानलाच नव्हे तर जगांतील सर्व पुढारलेल्या देशांनाहि आज भेडसावतो आहे. रशियासंबंधींची मी अगदी अलीकडची माहिती वाचीत होतों. एका बाजूला ऍटॉमिक सायन्सची, न्युक्लिअर सायन्सची प्रगति करणारा रशिया शेतीच्या उत्पादनाच्या आघाडीवर मार खात आहे असें कांहीं लोकांचे म्हणणें आहे. प्रगतीच्या खूप जाहिराती लावलेल्या चीनला वर्षा-दोन वर्षांमध्यें आपल्या सगळ्या प्रगतीच्या आंकड्यांत फेरबदल करावा लागला आणि आम्हीं पूर्वी म्हटल्याप्रमाणें आमचें उत्पादन वाढलेलें नाहीं असें त्याला जाहीर करावें लागलें. सांगायचा हेतु असा कीं इतर क्षेत्रांतील उत्पादन आणि शेतीमधील उत्पादन यांमध्यें मूलभूत फरक आहे. औद्योगिक क्षेत्रांतील उत्पादन हें केंद्रीभूत स्वरूपाचें उत्पादन असतें. आणि शेतीचा धंदा हा मूलतःच विकेंद्रित स्वरूपाचा असल्यामुळे त्याच्या उत्पादनाच्या आघाडीवर महाभयंकर लढाई अगदीं सतत चालू ठेवावी लागते. अगदीं कठीण असा हा शेतीचा प्रश्न आहे.

हा प्रश्न स्पष्ट करण्यासाठीं मी नेहमी सांगत असतों कीं शेतीचा प्रश्न हा रावणासारखा आहे. रामाच्या आणि रावणाच्या कथेंतील रावण हा दहा तोंडांचा होता असें आपण ऐकतों, तर आमच्या शेतीचा प्रश्न हा शंभर तोंडांचा प्रश्न आहे. जेथें पाहावें तेथें त्याला तोंड आहे. आणि त्याच्या प्रत्येक तोंडाशीं घास द्यावा लागतो इतका महत्त्वाचा हा प्रश्न आहे. शेतीची रचना कशी असावी, शेतीची धारणा कशी असावी, शेतीमध्यें ज्या अवजारांचा उपयोग करावयाचा त्यांचें स्वरूप काय असावें, शेतीला कामासाठीं जें जनावर वापरावयाचें त्याचें रूप काय असावें, शेतीला लागणारें भांडवल कोणत्या पद्धतीनें घ्यावें, शेतीचा उपयोग कोणत्या कामासाठीं करावा, शेतीवर आधारलेला धंद्यांचा उपयोग कसा करावा, त्याची बाजारपेठ कशी हस्तगत करावी असे शेतीसंबंधींचे हजारों प्रश्न आहेत. आणि यांपैकीं प्रत्येक प्रश्न वादग्रस्त स्वरूपाचा आहे.

जगांत एखाद्या राष्ट्रानें कितीहि प्रगति करण्याचा प्रयत्न केला तरी शेवटीं त्याचे पाय जमिनीवर असतात. चंद्रावर जाण्याचा प्रयत्न करावयाचा असला तरीहि त्याच्यासाठीं जमिनीवर जर पाय नसतील तर चंद्राकडे जाण्याचा विचार करणें सुचणारच नाहीं. चंद्रावर जाणारें रॉकेट कसें तयार करावें याचा विचार शास्त्रज्ञाच्या डोक्यांत चालावयाचा असेल तर त्याच्या पोटामध्यें प्रथम ज्वारीचा कण गेला पाहिजे. त्याशिवाय तें काम त्याला जमणार नाहीं. त्यामुळें कितीहि मोठे प्रयत्न करावयाचें एखाद्या देशानें ठरविलें तरी जमिनींतून निर्माण होणा-या उत्पादनावरच शेवटीं माणूस अवलंबून असतो, असा सध्यांचा अनुभव आहे. आणि म्हणून हिंदुस्तानच्या जीवनांतील ट्रॅजेडी किंवा हिंदुस्तानच्या जीवनांतील कारुण्य यांत आहे कीं शेती ही एवढी मोठी महत्त्वाची गोष्ट असतांना शेतीचा आणि शिक्षणाचा आम्ही अजिबात संबंध तोडून टाकलेला आहे. असें करून चालणार नाहीं. आपल्या दृष्टीनें महत्त्वाची अशी जी एक शास्त्रीय दृष्टि आहे ती शेतीच्या प्रश्नापासून आम्ही अलग मानतों. शेतक-याच्या घरांतील मुलगा शिकून शहाणा झाला तर तो सांगतो कीं मी मॅट्रिक झालों, मला कोठें तरी नोकरीला गेलें पाहिजे. शिकल्यानंतर शेतींत राहणें म्हणजे आपण कांहीं तरी चूक करीत आहोंत अशी आपली समजूत आहे. शेतींत राहावयाचें असेल तर न शिकतांच राहिलें पाहिजे, अडाणी म्हणूनच राहिलें पाहिजे अशी एक चुकीची समजूत आमच्या मनांत पक्की झाली आहे. आणि ही अत्यंत घातुक गोष्ट आहे असें मी मानतों.

मी हल्लींच्या शिक्षणाचा म्हणजे ज्याला ह्युमॅनिटीजचें शिक्षण म्हणतात त्याचा पुरस्कार करणारा आहें. पण मी ज्या देवाचा भुंज आहें त्याच देवाची स्तुति करणारा नाहीं. शेतीच्या शिक्षणाचीहि आवश्यकता आहे. शेतकरी आणि शेतीशीं संबंध असणारा मनुष्य हा शहाणा असल्याशिवाय शेती शहाणी होणार नाहीं यावर माझा विश्वास आहे. आज शेतकरी शहाणा करायचा आहे याचा अर्थ आधुनिक पद्धतीनें शेती करणे हा जर असेल तर शेतीचें म्हणून जें कांहीं शास्त्र आहे त्याचा अभ्यास व्हावयास पाहिजे. परंतु तें शास्त्र स्थिर असें शास्त्र नाहीं, तें वाढणारें शास्त्र आहे. १९४० सालचा शेती तज्ज्ञ आज अडाणी ठरण्याची शक्यता आहे, आणि आजचा शेती तज्ज्ञ हा १९७० सालीं कमी शहाणा ठरण्याची शक्यता आहे, आणि हिंदुस्तानांतील उद्याचा शेतीचा पी. एच. डी. १९८० सालीं तितकाच शहाणा ठरेल असें मानायला मी तयार नाहीं. जगांतील ज्ञान वाढतें आहे, त्या वाढत्या ज्ञानाचा परिणाम शेतीच्याहि ज्ञानावर आणि विज्ञानावर होत आहे. आणि म्हणून आज हिंदुस्तानांत सर्वच क्षेत्रांमध्यें सगळ्यांत जास्त कशाची जरुरी असेल तर ती ह्या शास्त्रीय ज्ञानाची आहे असें मी मानतों. शेतीच्या क्षेत्रांत तर ती विशेषच आहे. त्याचें कारण आजपर्यंत परंपरेनें आम्ही मानलें कीं शेती ही कांहीं शिकण्यासारखी गोष्ट नाहीं. दोन बैल घ्यायचे, गाडी-घोडा घ्यायचा आणि घरामध्यें जें बी-बीयाणे असेल तें जमिनींत नेऊन टाकायचें. परमेश्वरानें टाकलें पावसाचें पाणी तर उगवलें, नाहीं तर नशीब आपलें असें समजून गप्प बसायचें. असा हा शेतीचा व्यवसाय आम्हीं केला आहे. त्यामुळें आम्ही मुळांतच इतरांपेक्षां मागासलेले आहोंत. शिवाय, निव्वळ शेतीवर जें राष्ट्र अवलंबून राहतें तें मुळांतच अडाणी राहतें, मागासलेलें राहतें, हें सत्य नाकारण्यांत कांहीं फारसा अर्थ नाहीं. आर्थिक दृष्ट्या - मी सांस्कृतिक दृष्ट्या नाहीं म्हणत - मागासलेल्या शेतीचा देश हा अतिशय मागासलेला राहतो हें स्वीकृत तत्त्व आहे, स्वीकृत सत्य आहे.