सह्याद्रीचे वारे -७९

मात्र त्याबरोबरच मी इतर शिक्षणाला कमी महत्त्व देतों असें नाहीं. कारण जें तत्त्वाचें असेल तें मला बोललें पाहिजे. मी आज दुपारीं वकीलवर्गाच्या परिषदेस गेलो होतों. मी तेथें त्यांना सांगितलें की वकीलवर्गाची देशाला जरूर आहे, आणि कायद्याचें ज्ञान हें विज्ञानाच्या ज्ञानाइतकें महत्त्वाचें आहे. कारण शेतकरी हा चांगला होऊनहि त्याला कायद्याचें ज्ञान नसेल तर तो फसतो असा आपला अनुभव आहे. मी सांगू इच्छितो कीं मी स्वतः वकील आहे आणि मला वकील असल्याचा अभिमान आहे. कारण कायद्याचें ज्ञान हें प्राणवायूसारखें आहे. एखाद्याला सगळ्या गोष्टींचे ज्ञान असूनही जर कायद्याचें ज्ञान नसेल तर तो अपुरा ठरतो. इंजिनिअर, डॉक्टर वगैरे सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या धंद्याला आवश्यक असें कायद्याचें ज्ञान असावें लागतें. लोकशाही हेंच मुळीं कायद्याचें राज्य आहे. तेव्हां कायद्याचें ज्ञान ही आज आवश्यक अशी गोष्ट आहे. आपण या कॉलेजचे विद्यार्थी आहांत आणि ज्ञानाच्या क्षेत्रांतील पाईक आहांत म्हणून आपणांस एक गोष्ट सांगितली पाहिजे. आज हिंदुस्तानमध्यें विशेषतः जे स्वतःला इंटलेकच्युअल्स - म्हणजे विचार करणारे मानतात किंवा नवीन शिक्षण घेणारे मानतात, त्यांच्या मनामध्यें एक प्रकारचा संतुलित दृष्टिकोन निर्माण करण्याची फार आवश्यकता आहे असें मी मानतों. आणि हाच खरा शास्त्रीय दृष्टिकोन शेवटीं उपयोगी पडेल. शेतीचा शहाणा हा फक्त शेतीचाच शहाणा झाला आणि इतर क्षेत्रांत अडाणी राहिला, तर तो शेतीचेंहि कल्याण करणार नाहीं आणि दुसरें कुठलेंहि कल्याण करणार नाहीं, करूं शकणार नाहीं. आणि म्हणून तुम्ही शेतीचे स्नातक म्हणून जेव्हां या महाविद्यालयांतून बाहेर पडाल तेव्हां या सर्व गोष्टींचा आपल्या मनावर योग्य तो संस्कार घेऊनच बाहेर पडलें पाहिजे. तरच तुम्ही परिपूर्ण नागरिक होऊं शकाल.

या विद्यालयाचें काम ज्यांनीं आपल्या अंगावर घेतलें आहे त्यांना मी धन्यवाद देतों. कृषि महाविद्यालयाचें हें जें काम येथें सुरू झालें आहे त्याचा अर्थ मी माझ्या मनाशीं असा करतों कीं मराठवाड्यामध्यें कृषीचें शास्त्रीय ज्ञान वाढीला लागणार आहे. परभणीचें हें महाविद्यालय म्हणजे कृषीचें ज्ञान पसरविण्यासाठीं मराठवाड्यामध्यें एक पाणपोई तयार झाली असें मानलें पाहिजे. त्याचा उपयोग करून घेण्यासाठी मराठवाड्यांतील सर्व क्षेत्रांतील विद्यार्थी येथें येवोत आणि हें शेतीचें ज्ञान घेऊन परत शेतीच्या सेवेसाठीं ते जावोत अशी इच्छा व्यक्त करून हें विद्यालय नांवारूपाला येऊन आपली कीर्ति ह्या मराठवाड्यामध्यें, मुंबई राज्यामध्ये आणि हिंदुस्तानमध्येंहि पसरवो अशी प्रार्थना करून मी आपली रजा घेतों.