सह्याद्रीचे वारे - ७०

तेव्हां, प्रत्येक माणसास योग्य व पूर्ण वेळ रोजगार मिळेल अशी परिस्थिति निर्माण होण्यास अद्याप बराच कालावधि जावा लागेल. तथापि, मध्यंतरींच्या संक्रमणकाळांत आधुनिक उद्योगधंद्याची वाढ करण्याचा कार्यक्रम नेटानें व कसोशीनें अंमलांत आणला पाहिजे व त्याबरोबर शेतीचाहि विकास झपाट्यानें केला पाहिजे. त्याचप्रमाणें उत्पादन किंवा उत्पादनाचा खर्च यांवर परिणाम होऊं न देतां जास्तींत जास्त मजुरांना ज्यामुळें काम मिळेल अशा प्रकारच्या उत्पादनपद्धतींचा आपण अवलंब केला पाहिजे. अर्थात् उत्पादनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांत जी तांत्रिक प्रगति होत असते तिचा आपण फायदा घेऊंच नये असें मला सुचवावयाचें नाहीं. तथापि सध्यांच्या परिस्थितींत रोजगार वाढविण्याचें आपलें उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनें या बाबतींत तोल सांभाळणें किती आवश्यक आहे याची तुम्हांला कल्पना आहेच. विजेवर चालणारे छोटे उद्योगधंदें सुरू करण्याकरितां ग्रामीण विद्युत्करणाच्या कार्यक्रमाचा पूर्ण उपयोग करून घेतला पाहिजे याचा उल्लेख मीं अगोदर केलाच आहे. उत्पादनाच्या नव्या नव्या पद्धतींचा व तंत्राचा अवलंब करून आणि अगदीं अद्ययावत् ज्ञान व कसब संपादन करून, उपलब्ध स्थानिक साधनसामुग्रीचा उद्योगधंद्यांसाठी उपयोग करून घेण्याचे नवे मार्ग जर आपण शोधून काढले, तर उद्योगधंद्यांच्या क्षेत्राचा आपण विस्तार करूं शकूं आणि बेकारीचें प्रमाणहि पुष्कळच कमी करूं शकूं, याबद्दल मला शंका नाहीं.

मोठ्या प्रमाणावर आर्थिक नियोजन करीत असतांना, औद्योगिक उत्पादनांतील सर्वांत महत्त्वाचा जो मानवी घटक आपल्याला केव्हांहि दुर्लक्ष करतां येणार नाहीं. मानवी घटक म्हणजे अर्थातच कामगार. आपल्या या प्रयत्नांत जर आपल्याला यश मिळवावयाचें असेल तर कामगारांना योग्य तो न्याय आपण दिलाच पाहिजे. उद्योगधंद्यांच्या कारभारांत कामगारांना भागीदार करून घ्यावें या कल्पनेनें आतां मूळ धरलें असून उत्पादनक्षमता वाढविण्याची नवी प्रेरणा तिनें कामगारांमध्यें निर्माण केली आहे. आपले ध्येय तरी काय हेंच आहे. म्हणून औद्योगिक संबंध आपण निकोप ठेवले पाहिजेत, आणि उत्पादनांतील नुकसान टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे. या गोष्टींची आज फार आवश्यकता आहे.

आर्थिक विकासाच्या बाबतींत सध्यां जें नवीन वातावरण निर्माण होत आहे तें लक्षांत घेऊन तुमचें कौन्सिल पंचवार्षिक योजनेचीं मुख्य उद्दिष्टें सतत आपल्या नजरेपुढें ठेवील, आणि राष्ट्रीय पुनर्रचनेंचें या योजनेंत अंगिकारलेलें ध्येय साध्य करण्याच्या कामीं सरकारशीं हार्दिक सहकार्य करील अशी आशा मी व्यक्त करतों, आणि या प्रसंगीं मला आमंत्रण दिल्याबद्दल मी तुमचे पुन्हा एकवार आभार मानतों.