सह्याद्रीचे वारे - ३३

सोनियाचा दिवस

आपल्या पंतप्रधानांच्या शुभहस्तें आज पहाटे नवराज्याचें उद्घाटन झालें व त्यानंतर आतां हा नुकताच समारंभ पार पडला. अशा रीतीनें एकभाषी महाराष्ट्र राज्य व त्याचें पहिलें सरकार अस्तित्वांत आलें.

सर्व मराठी बांधव एका राज्यांत यावेत अशी मराठी जनतेची फार दिवसांपासूनची इच्छा होती. कांहीं ऐतिहासिक घटनांमुळें मराठी लोक कित्येक शतकें निरनिराळ्या राज्यांत विभागले गेले होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनें मराठी लोकांचें एकभाषी राज्याचें स्वप्न आज साकार होत आहे. ज्ञानेश्वरांनी एका वेगळ्या संदर्भांत म्हटल्याप्रमाणें हा खरोखरच ''सोनियाचा दिवस'' होय. अशा वेळीं मराठी लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाहीं यांत कांहींच आश्चर्य नाहीं. गेल्या काहीं वर्षांत महाराष्ट्रांतील जनतेची जी विचलित अशी अवस्था झाली होती ती आतां संपून महाराष्ट्राला यापुढें स्थैर्याचे दिवस येतील अशी आशा करण्यास मुळींच हरकत नाहीं. त्यायोगें लोकांना आतां आपल्या विकासाच्या प्रश्नांकडे कटाक्षानें लक्ष देतां येईल व विकासकार्याच्या बाबतींत येणा-या निरनिराळ्या अडचणींना ते अधिक परिणामकारकपणें तोंड देऊं शकतील. त्याचबरोबर ज्या द्विभाषिक राज्याची आतांच समाप्ति झाली त्याच्या सुनियंत्रित राज्यकारभाराची परंपरा यापुढेंहि चालविण्याची दक्षता आपण घेतली पाहिजे व त्याची कीर्ति अबाधित राखली पाहिजे. तेव्हां या प्रसंगीं यापुढें आपल्याला कोणकोणतीं कामें करावयाचीं आहेत व त्यासाठीं आपण आपली मानसिक व इतर सर्व दृष्ट्या कशी तयारी करावयास हवी या गोष्टीची मनाशीं नीट उजळणी केली पाहिजे. आपण आज एका नव्या कालखंडांत प्रवेश करीत आहोंत व आपल्या आशाआकांक्षांचीं पूर्तता करून घेण्याचा क्षण आतां आला अशी जनतेची भावना आहे. नव्या महाराष्ट्र राज्याच्या जन्मानें आपल्याला भरभराटीचे व सुखाचे दिवस येतील ही सामान्य जनतेची अपेक्षा योग्य अशीच आहे. हा जनतेच्या अपेक्षापूर्तीचा क्षण जवळ आणणें हा महाराष्ट्र राज्याचा मी मानबिंदु मानतों. त्याचबरोबर नव्या राज्यांत शासनाच्या द्वारें लोकांची अधिक कार्यक्षम रीतीनें सेवा घडेल अशा प्रकारें शासनयंत्रणेची पुनर्घटना व सुधारणा करण्यासहि आतांच चालना मिळाली पाहिजे.

आपल्यापुढें जे मूलभूत, आर्थिक व सामाजिक प्रश्न आहेत त्यांची योग्य ती उकल करावयाची असेल तर त्या प्रश्नांचा अखिल भारतीय संदर्भ आम्हांस विसरतां येत नाहीं, आणि म्हणून महाराष्ट्राचे नागरिक हे प्रथम भारताचे नागरिक आहेत व नंतर ते महाराष्ट्रीय आहेत याची जाणीव आम्ही सतत ठेवूं.

आतां महाराष्ट्र राज्यापुरतें बोलावयाचें म्हणजे महाराष्ट्रांतील लोकांनी त्यांचा धर्म, जात अगर पक्ष कोणता कां असेना, आपण सर्व एकच बांधव आहोंत असें मानलें पाहिजे. नवा महाराष्ट्रीय हा केवळ मराठी भाषा बोलणारा नव्हे, तर तो महाराष्ट्रात राहतो व आपल्या शक्तीनुसार त्याचें जीवन समृद्ध करतो असा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रीयच होय.