मला झालेलें लोकमान्यांचें दर्शन
आजच्या या लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या निमित्तानें मी येथें येऊन बोलावें असें मला जवळजवळ एक महिन्यापूर्वी सुचविलें गेलें आणि एक प्रकारचा सन्मान म्हणून मीं हें निमंत्रण स्वीकारलें. परंतु हें निमंत्रण स्वीकारतांना जें बोलावें असें माझ्या मनामध्यें होतें तें सर्व मी बोलूं शकेन अशी आज तुमच्याप्रमाणेंच माझीहि मनःस्थिति नाहीं. कारण दरम्यानच्या काळांत पुणें शहरावर जी मोठी आपत्ति आलेली आहे त्या आपत्तीच्या मनःस्थितींत आपण सर्वजण आहांत आणि मीहि थोडाफार तशाच मनःस्थितींत आहें असें जर मीं म्हटलें, तर तें आपण स्वीकाराल अशी मला आशा आहे.
लोकमान्य टिळकांच्या जीवनावर बोलण्याचा तसा माझा अधिकार नाहीं. कारण मीं लोकमान्यांना स्वतः नजरेनें पाहिलेलें नाहीं, किंवा त्यांच्या पुण्यामध्यें मी लहानाचा मोठा झालेलों नाहीं. पण माझा तसा एक छोटासा अधिकार आहे असें मी आपल्याला सांगूं इच्छितों. ज्या गावांमध्यें मी लहानाचा मोठा झालों त्या गांवामध्यें लोकमान्यांच्या नांवानें चालणारी शाळा आहे, आणि त्या शाळेचा मी विद्यार्थी आहें. त्या शाळेंत लोकमान्य टिळकांचें होत असलेलें गुणगान लहानपणापासून मीं माझ्या कानांनी ऐकलेलें आहे आणि त्यामध्यें मी भागीदारहि झालेलों आहें. लोकमान्यांच्या जीवनाचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी कांहीं निबंध लिहावेत, कांहीं वक्तृत्व स्पर्धा कराव्यात, अशी आमच्या शाळेची जुनी प्रथा असे. त्यामध्यें भाग घेण्यासाठीं लोकमान्यांच्या वाङ्मयाचा थोडाफार अभ्यास मीं त्या वेळीं केला. आणि फार मोठी फुशारकी मारतों अशांतली गोष्ट नाहीं पण 'लोकमान्य आणि कायदेमंडळ' या विषयावर निबंध लिहून मीं पहिलें पारितोषिकहि मिळविलेलें आहे. त्या गोष्टीची आज येथें येतांना मला आठवण झाली. कायदेमंडळांसंबंधानें आणि लोकमान्यांसंबंधानें मला जेव्हां कांही फारशी माहिती नव्हती तेव्हां मीं हा निबंध लिहिला, आणि मला असें वाटतें कीं माझ्या त्या वेळच्या निरागस मनावर झालेले परिणाम आज सुद्धां कांहींहि बदललेले नाहींत. लोकमान्य टिळकांच्या मोठेपणाचें हें लक्षण आहे, हें मी आपणांला सांगूं इच्छितों.
लोकमान्यांच्या जीवनाकडे पाहतांना कोणत्या दृष्टीनें पाहावें हा ज्याच्या त्याच्या विचाराचा, ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न राहील. कांही वर्षांपूर्वी 'लोकमान्य हयात असते तर ?' असा विषय घेऊन अनेकांनी अनेक दृष्टिकोन मांडल्याचें माझ्या स्मरणांत आहे. असा प्रयत्न करावा कीं करूं नये ही वेगळी गोष्ट आहे. पण लोकमान्यांसारख्या प्रचंड विशाल व्यक्तिमत्त्व असणा-या पुरुषाच्या जीवनाकडे निव्वळ एखाद्या वस्तुसंग्रहालयामध्यें पाहण्याकरितां ठेवलेली वस्तु म्हणून आपण पाहत नसतों, तर तें जीवन आजच्याहि क्षणीं आजचे आणि उद्याचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीनें काय मार्गदर्शन करील या दृष्टीनें आपण त्या जीवनाकडे पाहत असतों, त्या दृष्टीनें आपण त्याकडे पाहिलें पाहिजे.
ज्या एका विशिष्ट कालखंडांत भारतामध्यें लोकमान्यांचें व्यक्तिमत्त्व निर्माण झालें, त्या कालखंडाचें मार्गदर्शन करून व आपलें अवतारकार्य संपवून लोकमान्य निघून गेले एवढाच इतिहासाचा आणि त्यांचा संबंध आहे, असें मी मानीत नाहीं. त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाच्या माणसाचें तेवढेंच काम असत नाहीं. मोठ्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची कसोटी-किंबहुना जगांतील कोणत्याहि चांगल्या वस्तूची कसोटी, ती व्यक्ति किंवा ती वस्तु ज्या ठिकाणीं असते त्या ठिकाणापासून ती दूर गेल्यानंतर आणि ज्या कालखंडांत ती व्यक्ति किंवा ती वस्तु निर्माण होते तो कालखंड संपून गेल्यानंतरच खरी दिसून येते. त्या व्यक्तीचें व्यक्तिमत्त्व किंवा त्या वस्तूचें महत्त्व जितकें जास्त टिकून राहील तितकी ती व्यक्ति मोठी किंवा ती वस्तु चांगली असें मानले जातें. कलेच्या क्षेत्रांतहि हाच नियम आहे. एखादी सुंदर कलाकृति पाहण्यासाठी कलावंतानें एखाद्या माणसाला बोलावलें आणि तो माणूस धसमुसळेपणा करून त्या कलावस्तूच्या अगदी जवळ जाऊन डोळे फाडून पाहावयास लागला, तर तो कलावंत त्याला आपल्या मनांतल्या मनांत हसेल. एखाद्या कलावस्तूचें निरीक्षण, थोडेंसें बाजूला जाऊन, एका विशिष्ट दृष्टिकोनांतून आपण केलें म्हणजे ती कलावस्तु आपणांस अधिक चांगली दिसते. थोडक्यांत म्हणजे कलावस्तु ही एका विशिष्ट पर्स्पेक्टिव्हमधूनच - दृष्टिकोनामधूनच पाहावी लागते. तीच गोष्ट कमीअधिक प्रमाणांत मोठ्या माणसांच्याहि बाबतींत खरी आहे. त्यांच्या कालखंडापासून दूर गेल्यानंतर ज्या प्रमाणांत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचें विशालत्व, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मार्गदर्शनक्षमता हीं आपल्या मनाला पटत राहतील, समजत राहतील आणि भासत राहतील त्या प्रमाणांत तें व्यक्तिमत्त्व जास्त मोठें असें आपण मानलें पाहिजे.