सह्याद्रीचे वारे - १४२

परंतु डोळ्यांपुढें जें ठेविलें तें संपूर्णपणें पदरांत पडलें आणि त्यांतलें जें काय वैयक्तिक सुख असेल तें मिळालें, अशी गोष्ट कांहीं लोकमान्यांच्या जीवनामध्यें शेवटपर्यंत घडली नाहीं. मानसिक वेदनांमध्यें त्यांच्या जीवनाचा शेवटीं अंत झाला. त्यांनीं डोळ्यापुढें ठेविलेलें स्वप्न पुरें झालेलें नव्हतें. खटपटी चालू होत्या, उद्योग चालू होते, प्रयत्न चालू होते; त्यामध्यें कधीं यश येत होतें, कधी अपयश येत होतें. आणि हे सगळे प्रयत्न करीत असतांनाच स्वतःच्या वैयक्तिक जीवनांतून त्यांना जावें लागलें. त्यांच्या सबंध जीवनाकडे वैयक्तिक दृष्टीनें जर आपण पाहिलें तर तें अत्यंत बिकट संकटांनी भरलेलें, अत्यंत खडतरपणानें चाललेलें असें जीवन होतें असेंच आपणांला  आढळून येईल. त्यांची जी प्रसिद्ध झालेली पत्रें आहेत ती पाहात असतांना आजहि पुष्कळ वेळां आपलें मन अगदीं गहिंवरून येतें. त्यांचीं तीं मंडालेचीं पत्रें आपण पाहिलीं म्हणजे आपणांस याची कल्पना येईल. काळाशीं एवढ्या कठोरपणानें झगडणारा हा पुरुष कौटुंबिक बाबतींत, विशेषतः आपल्या पत्नीच्या प्रकृतीसंबंधानें, ज्या त-हेनें विव्हळ होऊन लिहितो, तें सर्व वाचीत असतांना, कोणत्याहि सहृदय मनुष्याच्या डोळ्यांत अश्रु आल्याशिवाय राहणार नाहींत. हीं वैयक्तिक संकटें, हीं दुःखें त्यांना सोसावीं लागत. ''माझी प्रकृति खरोखरच बरी आहे. त्यांना बरें वाटावें म्हणून उगाच कांहीं तरी लिहितों असें नाहीं,'' असे आपल्या पत्नीला व मुलांना सांगावें म्हणून पत्रांतून ते निक्षून निक्षून लिहीत होते. त्यांतली त्यांची दृष्टि, त्यांतला त्यांचा विचार, आणि संकटांची सगळी परंपरा आली असतांना त्यांनीं वैयक्तिक जीवनामध्यें दाखविलेले गुण या सर्वांचा तुम्हीं-आम्हीं विचार केला पाहिजे. स्वातंत्र्याच्या संग्रामामध्यें झगडणारा एक शूर सेनापति या नात्यानें त्यांना राष्ट्रीय महत्त्व प्राप्त होत असलें, तरी वैयक्तिक जीवनामध्यें माणसानें कसें वागावें, कुठल्याहि संकटाशीं माणसानें जिद्दीनें कसें लढावें याचें, त्यांचें सर्वच जीवन एक अखंड मार्गदर्शन आहे असें मला वाटतें.

वयाच्या एकेचाळिसाव्या वर्षी त्यांना तुरुंगाची पहिली मोठी यात्रा करावी लागली. आज सकाळींच आम्हीं त्यांनीं या यात्रेची जेथें सुरुवात केली त्या जेलखान्यामध्यें गेलों होतों. आणि त्या वेळच्या तेथील प्रमुख अधिका-यांनी ते तुरुंगांत आल्यानंतर पहिल्याच दिवशीं त्यांच्यासंबंधीं घेतलेली माहिती - त्यांचें वय, त्यांची उंची, त्यांच्याजवळ असलेले पैसे, त्यांचे कपडे वगैरे माहिती - त्या तुरुंगाच्या सध्याच्या अधिका-यांनीं आम्हांला वाचून दाखविली. एकेचाळिसाव्या वर्षी याप्रमाणें जेव्हां ते जेलमध्यें गेले तेव्हां त्यांच्याजवळ फक्त एक अंगरखा, एक पगडी, एक धोतर आणि एक पैरण हे कपडे, खिशामध्यें नऊ रुपये चार आणे तीन पै इतके पैसे आणि शिवाय पंचावन्न पुस्तकें होतीं. हा सगळा हिशोब मीं त्यांच्याकडून ऐकला. पंचावन्न पुस्तकांची संपत्ति घेऊन ते त्या जेलमध्यें गेले होते. परंतु जेलमध्यें गेल्यानंतर सगळीं संकटें बाहेर ठेवावीं आणि आपल्या विद्याभ्यासामध्यें मग्न होऊन जावें ही कांहीं साधी गोष्ट नाहीं. विदेही मनुष्य कसा असावा यासंबंधीं जुन्या काळच्या थोर माणसांचें वर्णन आपण वाचतों. एका बाजूनें पायाला कोणी तरी तूप लावीत होतें आणि दुस-या बाजूनें पाय अग्नींत पडला होता अशी विदेही जनकाची कथा आम्ही ऐकतों. पुराणांतल्या या सगळ्या कहाण्या आम्ही ऐकतों. पण दुःख व कष्ट यांनीं पेटलेलें सबंध कौटुंबिक जीवन, मंडालेच्या तुरुंगामध्यें प्रवेश केल्यानंतर टाकून देऊन, तें सगळें जिथल्या तिथें विसरून जाऊन, आपल्या तत्त्वचिंतनामध्यें मग्न होणारा माणूस आम्हीं आमच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. आणि हें सर्व तो विदेही असल्याशिवाय शक्य नाहीं. कारण सहज म्हणून असें कांहीं कोणाला होतां येणार नाहीं. मी ब-याच वेळां तुरुंगामध्यें जाऊन आलेला माणूस आहें; मीहि थोडेंफार गंभीर वाचण्याचा प्रयत्न केला आहे, नाहीं असें नाहीं. परंतु तुरुंगांत गंभीरपणानें तत्त्वज्ञाच्या वृत्तीनें आपल्या कार्यांत सदैव मग्न होणारे असे एक लोकमान्यच होते.

आणि त्यांनीं जेलमध्यें जें लिहिलें त्यासंबंधींचा त्यांचा विश्वास केवढा जबर होता. हल्ली पाश्चात्य देशांत ग्रंथ लिहिणा-यांना पुष्कळशीं संशोधन करणारीं माणसें मदतीला लागतात असें म्हणतात. उलट जेलमध्यें गेल्यानंतर मिळालेली पुस्तकें हातांत घेऊन चार किंवा पांच महिन्यांमध्यें लोकमान्यांनीं तो ग्रंथराज - गीतारहस्य - लिहून पुरा केला. त्यासंबंधी मीं एक आख्यायिका ऐकली आहे. जेव्हां लोकमान्य परत आले तेव्हां त्यांचा तो ग्रंथ कांहीं परत आला नव्हता. सरकारी रीत्या मंजूर होऊन तो अद्यापि यावयाचा होता. तेव्हां कुणीं तरी, हा ग्रंथ त्या लोकांनीं परत केलाच नाहीं तर काय करावयाचें, अशी शंका त्यांच्याजवळ प्रदर्शित केली. तेव्हां लोकमान्य म्हणाले, ''सबंध ग्रंथ माझ्या डोक्यांत आहे. मी चार महिन्यांत तो परत लिहून काढीन. पुस्तकाची पानें फार तर त्यांच्याजवळ असतील. माझे विचार कांहीं कोणीं माझ्याकडून काढून घेतलेले नाहींत.'' असें सामर्थ्य असणारी त्यांची बुद्धि होती.