मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ५२

५२.  रेसकोर्स नंबर एक – रणजित देसाई

मला जेव्हा साहित्य अकादमी अवार्ड मिळाले तेव्हा मी साहेबांना फोन केला. त्या वेळी ते गृहमंत्री होते. साहेबांचे खास सचिव डोंगरे यांनी कळविले, ‘‘तुम्ही सायंकाळी सात वाजता साहेबांना भेटायला या असं साहेबांनी सांगितलयं.’’

तस पाहिलं तर साहेब आणि मी अनेक वेळा एका व्यासपीठावर येऊन गेलेलो होतो. आमचा परिचय झाला होता. मी माझ्या आयुष्यात दोनच वक्त्यांची भीती बाळगलेली आहे. एक जगजीवनराम बाबू आणि दुसरे साहेब. व्यासपीठावर यांपैकी कोणी असत तेव्हा मी भाषणाची काळजीपूर्वक तयारी करीत असे. वाटत असे, की आज आपण हा गड जिंकावा. दोघे वयानं मोठे. मी तरुण. ही जिद्द माझ्या मनात असे. पण माझे भाषण संपताच जेव्हा साहेब असोत किंवा जगजीवनरामबाबू असोत, ते सा-या वातावरणाला असं वेगळं वळण लावत, की त्यामध्ये मी कुठे तरी पार कोप-यात पडलेला असे. भाषण करताना साहेबांचा समतोलपणा, संयम, त्या विषयाचा अभ्यास इतका गाढा असे की त्यामध्ये विचारवंतांनी हरवून जावं. हे साहेबांचं विचारसामर्थ्य होतं. शब्दसामर्थ्यहोतं.

तर मी सांगत होतो काय? मला अॅकॅडमी अॅवार्ड मिळालं आणि ठरल्या वेळी मी साहेबांच्या बंगल्यावर गेलो. पोर्चमध्ये माझी टॅक्सी उभी राहिली. उजव्या बाजूच्या इमारतीत श्री. डोंगरे उभे होते. आतल्या हॉलमध्ये कसली तरी मिटिंग चालू होती. डोगेरे मला म्हणाले, ‘‘तुम्ही आत बंगल्यात चला.’’ साहेबांच्या मुख्य बंगल्यात मी जाऊन बसलो. माझ्या हातात. ‘‘स्वामी’’ ची कॉपी होती. पाठोपाठ चहा घेऊन एक सेवक आला. त्यानं चहा माझ्यासमोर ठेवला. मी मनातून बेचैन झालो होतो. चहा घेत होतो आणि त्याच वेळेला साहेब आत आले. मी साहेबांना उठून वाकून नमस्कार केला. आपल्या हास्य वदनानं जणू काही जुना मित्र असावा, अशा थाटात त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि माझ्या हातातील ‘‘स्वामी’’ कादंबरी मी त्यांना दिली. त्यांनी ती घेतली. ते हसले. माझ्या समोरच ठेवलेल्या चहाच्या ट्रेजवळ त्यांनी ते पुस्तक ठेवलं आणि म्हणाले, ‘‘जरा थांबा हं, मी आलो’’ आणि आपल्या शय्यागृहात ते निघून गेले. मी त्यांची वाट पाहात होतो. काही क्षणात ते जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात स्वामीची दुसरी प्रत होती! ती प्रत माझ्या हाती देत ते म्हणाले, ‘‘देसाई, तुमची ‘‘स्वामी’’ मी वाचलेली आहे. आज तुम्हाला अॅकॅडमी अॅवॉर्ड मिळालेलं आहे याचा मला अत्यानंद आहे. या कामाच्या व्यापातून मी समारंभाला येऊ शकलो नाही. याबद्दल गैरसमज करून घेऊ नका.’’ साहेब शांतपणे आपल्या समोरच्या खुर्चीवर बसले. माझ्याकडे हसून पाहात म्हणाले, ‘‘देसाई, अॅकॅडमी अॅवॉर्ड मिळालं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं?’’ मी म्हणालो, ‘‘साहेब समाधान वाटलं, यशाचं नव्हे, पण घेतलेल्या कष्टाचं.’’ ते हसले. मला म्हणाले, ‘‘देसाई मी दिल्लीत असेन, माझं हृदय महाराष्ट्रात गुंतलेलं असतं. तुम्ही मिळविलेल्या यशाचं मला कौतुक आहे. पण त्या यशानं हुरळून जाऊ नका. एखादा मनुष्य टेकडी चढतो, डोंगर चढतो आणि त्याला वाटतं, की आपण हिमालयाचं शिखर गाठलं. ते खरं नसतं. तुम्ही केव्हाही या यशावर तृप्त राहू नका. तुम्ही यापेक्षाही मोठं कार्य करावं असं मला वाटतं. लहान वयात यश मिळालं की, कित्येक वेळेला माणूस वाया जातो हे मी पाहात आलेलो आहे. तुम्ही त्याला बळी पडू नका.’’ साहेब उठले. ‘‘गंगाऽऽ’’ म्हणून त्यांनी हाक मारली. साहेबांचा एक निष्ठावान सेवक गंगा एक तबक घेऊन पुढे आला त्यामध्ये एक हार, मला आजही आठवतो. तो मोगरीचा हार आणि एक पुष्पगुच्छ होता. तो पाहताच मी भारावून उठलो. साहेबांनी तो उचलला आणि माझ्या गळ्यात घालण्यासाठी हात पुढे केले. मी तो हार मध्येच पकडला आणि साहेबांचे चरणस्पर्श करीत मी म्हणालो, ‘‘साहेब, या औपचारासाठी मी इथे आलेलो नाही.’’ साहेब नेहमीच्या हास्यवदनानं म्हणाले, ‘‘देसाई, तुमचा जेव्हा फोन आला तेव्हा मी सातची वेळ दिली. याचं कारणं एकच आहे. माझ्या घरामध्ये तुम्हाला बोलवावं, तुमचं कौतुक करायला मिळावं असं मला वाटलं. पण या राज्यकारभारामध्ये सातपर्यंत मला उसंतच नव्हती.’’ साहेबांना वंदन करून मी तिथून निघून आलो.