मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ३४

३४. जीवननिष्ठ यशवंतराव – एस. एम. जोशी

यशवंतरावांचे आतापर्यंतचे जीवन सफल राहिले आहे. जीवनात चढउतार हे येतातच. राजकीय जीवनात तर विशेषच. यशवंतरावांच्या वाट्याला देखील ते आले आहेत. कित्येक वर्षे सत्तास्थानावर राहिल्यानंतर सध्या ते विरोधी पक्षात आहेत. त्यामुळे पूर्वी त्यांचा जसा बोलबाला होई तसा आज होत नाही, परंतु त्यातच माणसाची कसोटी होत असते. लोक आपल्याला किती चाहतात हेच काही जीवनाच्या यशस्वितेचे माप नव्हे.

जीवनाची यशस्विता अथवा अयशस्विता कशात आहे? अंतरात्म्याने ब-या-वाईटाबद्दल दिलेला कौल आपण मानतो की नाही यावर माणसाच्या जीवनाचे मूल्यमापन मुख्यत: अवलंबून असते.
जीवननिष्ठेशी प्रतारणा नाही- सर्व जीवन आणि विशेषत: मानवी जीवन हे प्रत्येकाच्या ठिकाणी वास करीत असलेल्या आत्मतत्त्वाचा आविष्कार आहे. ही भारतीय तत्त्वज्ञानाची बैठक आहे. म्हणूनच आम्ही महात्मा गांधींच्या शिकवणुकीनुसार आपली जीवने घडविण्याचा प्रयत्न करीत आहोत. मानव समाज एकसंध आहे, जे काही बरे वाईट घडते त्याच्याशी माझा यत्विंâचितही संबंध नाही असे म्हणू शकत नाही. मानवी जीवनाच्या एकसंधतेवरच आमची जीवननिष्ठा आधारलेली असावयास पाहिजे.

या दृष्टीने पाहता यशवंतरावांनी आपल्या जीवननिष्ठेशी कधी प्रतारणा केली नाही. मतभेद असू शकतात. कित्येक वेळी भल्याबु-यासंबंधीचे चुकीचेही ते होऊ शकतात. कालांतराने तसे सिद्ध होऊन जाते. परंतु जो निर्णय घेतला तो अंतरात्म्याशी साक्षी ठेवून घेतलेला असला पाहिजे. म्हणूनच त्यांच्या माझ्यामध्ये सतत सामंजस्य राहिलेले आहे.

जुळलेली वेव्हलेंग्थ

निराळ्या शब्दात सांगायचे तर आमच्यामधील वेव्हलेंग्थ कधीच मोडलेली नाही. त्यांनी दिलेला शब्द कधी मोडल्याचे मला स्मरत नाही. त्यांच्याबद्दलचा माझा हा विश्वास माझ्या काही मित्रांना पसंत पडत नसे, परंतु त्यांची चूक मागाहून त्यांना कबूल करावी लागे.

त्यांच्यासंबंधी प्रेमादराची भावना जीवननिष्ठेमुळेच पोसली जाते. त्यांचे व माझे अनेकवेळा मतभेद झालेले आहेत. जनतापक्ष त्यांच्या अविश्वासाच्या ठरावामुळे जेव्हा फुटू लागला तेव्हा त्यांनी आमच्याशी सहकार्य करावे अशी आमची खटपट होती. त्यांना तसे करणे बरोबर वाटले नाही. आम्हाला त्यांच्या निर्णयामुळे वाईट वाटले. परंतु तदनंतर ज्या घटना घडल्या त्यावरून आमची विनंती त्यांनी का अमान्य केली याचा उलगडा होऊ शकतो.

पारिवारिक सौहार्द

स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या आम्हा स्वातंत्र्य सैनिकांच्यामध्ये आपुलकीचे विशेष संबंध निर्माण झाले आहेत. एका परिवारातील माणसे जशी नाजूक प्रेमभावनेने जशी बांधली जातात तसाच काहीसा हा प्रकार आहे. त्यामुळे एकमेकांचे दोष माहीत असूनही आमच्यामध्ये पारिवारिक सौहार्द आहे. परस्परांच्या सुखदु:खात आम्ही सहभागी होतो, अडीअडचणींच्या वेळी साहाय्य देण्यास, मागण्यास, मनाला संकोच वाटत नाही. नव्या पिढीच्या लोकांना आमच्या या पारिवारिक संबंधाचे आकलन होऊ शकत नाही आणि त्याचे महत्त्वही समजत नाही. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्यांना हा अमूल्य वारसा मिळालेला आहे. या मार्गाने जाण्यातच जीवनाचे साफल्य आहे असे आम्ही मानतो व त्यामुळे आमच्या जीवनात वैफल्याचे सावट येऊ शकत नाही.