मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण -२८-१

साहेबांशी बोलणारी पुस्तके हा त्यांचा दुसरा विरंगुळा आहे. सामान्यपणे मंत्रिपदावर बसलेली माणसे वाचतात कमी, बोलतात जास्त, पण साहेब त्यांच्या ग्रंथालयात जेव्हा रंगतात तेव्हा त्यांना सोडून अकाली निघून गेलेल्या श्रीपाद डोंगरे यांनासुद्धा साहेबांच्या शेजारचा दिवा मालवणे अवघड जात असावे! अपवाद कधी असला तर तो सौ.वेणूतार्इंचाच! तेथे मात्र अपील नाही. राजकारणाच्या गुंतागुंतीत अत्यंत गुप्त असा एक सवाल खुद्द पंडित नेहरूंनी त्यांना एकदा टाकला आणि बजावले, ‘कुणाजवळ बोलू नका!’ यशवंतराव म्हणाले, ‘‘एका व्यक्तीजवळ बोलावे लागले.’’ पंडितजींचा स्वर चढला, ‘‘कोण अशी ती व्यक्ती?’’ यशवंतराव म्हणाले, ‘‘वेणूताई’’ आणि दिल्लीत खळखळून हसलेले पंडितजी जणू मुंबईत दिसले!

साहेब ग्रंथप्रिय, ग्रंथवेडे, आहेत. आणि तो त्यांचा एक विरंगुळा आहे. वृत्तपत्रातील ग्रंथपरीक्षणे वाचणारा राजकारणी मुत्सद्दी दाखवा म्हटले तर अनेक मंर्त्याचे चेहरे समोरून सरकवून खोडून काढावे लागतील. साहेब त्याला अपवाद आहेत. श्री. माळगावकर या प्रसिद्ध लेखकाची ‘प्रिन्सेस’ कादंबरी परदेशात गाजली म्हटल्याबरोबर साहेबांच्या संग्रहात तिची भर पडली आणि मी सहज विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘‘आमच्या संस्थानिकांच्या लीलांचे परदेशात कुतूहल असलेले आपल्याला माहीत नाही!’’

यशवंतराव ‘साहेब’ झाल्यावर मोठे मोठे लेखक, प्रकाशक त्यांची पुस्तके त्यांचा माग काढीत येत असतील पण त्यापूर्वी ते मरीन लाईन्सजवळच्या इमारतीत एका प्लॉटमध्ये राहात होते. पगार चार पाचशे रूपये असेल. त्या वेळीही सर विन्स्टन चर्चिलच्या युद्ध-आठवणीचे अठ्ठावीस खंड त्यांच्या संग्रहात चमकत होते. राजकारणी माणूस ग्रंथालयात कसा घडतो याची उदाहरणे मला माहीत अशी दोन तीनच. काकासाहेब गाडगीळ, आपले साहेब आणि रघुनाथराव खाडिलकर.

नाट्यकला, संगीत यांची आवड नसणे एवढेच नव्हे तर या क्षेत्राचा राग असणे म्हणजे ‘‘शुद्ध राजकारण’’ अशा लुंगी जमान्यात वाढलेले यशवंतराव कमालीचे रसिक आहेत. त्यांच्या एका वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना मानापमान, संशयकल्लोळ, स्वयंवर नाटकांची टेप्स पाठविली. वाढदिवस अभिनंदनाच्या पत्रांना छापील उत्तरे तर गेलीच पण साहेबांनी मला लिहिले, ‘‘अलीकडे अशी आवडती नाटके पाहावयास मिळत नाहीत. पण तू पाठविलेले टेप्स जुन्या स्मृती जागृत करतात. मोठा आनंद लुटत आहे.’’ पुण्यात भरत नाट्य संशोधन मंदिराला त्यांनी भेट दिली आणि दिल्लीच्या नाट्य संमेलनाचे वेळी भरत नाट्य संस्थेजवळ असलेले प्रदर्शनीय साहित्य आवर्जून पाहिले.

शाहीर, कवी, लेखक हे तर त्यांचे खास मित्र. राजकारणाच्या पहिल्या प्रहरात डफावर थाप टाकून स्वातंर्ताचा पुकार द-याखो-यात घुमवणारा सांगली भागातला शाहीर निकम किंवा शीघ्रकवी ग.दि.मा. अशी मंडळी साहेबांच्या मनातल्या एका खास दालनात स्थान मिळवून राहिलेली. रणजित देसाई, पु.ल.देशपांडे म्हणजे विरंगुळ्याचे साथी. साहेबांची नेहमी कुरकूर असते, ‘‘काय करावे, वेळ मिळता मिळत नाही’’ एखाद्या नाटकाला पूर्ण वेळ बसावं म्हणून सर्वांना चुकवून ते येतात नि पाठोपाठ कोणतातरी निरोप येतो, फोन खणखणतो, आणि मोठ्या नाखुषीने ते उठतात. राजकारणात शाहीर कवीचा उपयोगही त्यांना अचूक अंदाजता येतो. मला वाटते महाबळेश्वर शिबिराखालील गोष्ट असावी. स.म.समितीविरुद्ध काँग्रेस वाढत होती. समितीला काँग्रेसचे पाठबळ होते. एक लावणी पोवाडा प्रचाराला हवा होता. साहेबांनी माडगुळकरांकडे पाहिले आणि आण्णांनी सुरुवात केली.

‘‘आता ही पोरगी (समिती)
वाचत नाही
तिला डांग्या (भाई डांगे)
खोकला झाला ग बाई’’
लावणी तयारी झाली नि हा हशा पिकला.

साहेब जन्मले सातारा जिल्ह्यात पण शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूरात जावे लागले. बोर्डिंगचा आश्रय घ्यावा लागला. त्या कोल्हापूरच्या मातीपाण्याचे अनेक गुण त्यांना कायमचे चिकटलेले आहेत. कुस्ती हा त्यांचा आवडता छंद आहे. त्या दक्षिण महाराष्ट्रातले अनेक पैलवान साहेबांना मानतात आणि साहेब त्यांना मानतात. अशा विविध क्षेत्रांत रमणारे, विरंगुळा शोधणारे, काही दिवसांपूर्वी त्यांच्या विरंगुळा बंगल्यात भेटले तेव्हा त्यांच्या जीवनाचे हे छंद लक्षात आले. पस्तीस वर्षे राजकारण आणि मंत्रिपदाचा बंगला उपभोगलेल्या आणि मुंबईत फ्लॅट घेऊन राहिलेल्या साहेबांनी विरंगुळा बांधला कराडात! वीस वर्षांपूर्वी घेतलेल्या एका सोसायटीतल्या प्लॉटवर! बंगला कसला पूर्वीपेक्षा नव्या पद्धतीचे घरच दारातून आत शिरले की, बैठकीची खोली, दुस-या दालनात बेडरूम, तिसरे स्वयंपाकघर आणि व्हरांडा साजेल अशा जागेत डायनिंग टेबल. बस! झाला बंगला. मी विचारले, ‘‘माझ्यासारखा पाहुणा आला तर’’? साहेब म्हणाले, ‘‘माझे मित्र बाहेरच्या बैठकीच्या खोलीत कोचावरच झोपतील. आपल्याला हवा कशाला मोठा बंगला?’’

मला आठवण झाली तीस-चाळीस वर्षांपूर्वीच्या सोमवार पेठेतील घराची. त्या पडवीत जे मित्र येत जमत ते याच बैठकीच्या खोलीत आनंदाने झोपत असा हा राजकारणापेक्षा निराळा नेता कोणत्या वर्गात बसेल असा विचार येतो. त्यांना छंद आहेत, छंदात आनंद आहे, पण छंदाचा नाद आणि नादाचे व्यसन नाही. त्यांच्या जीवनावर सहकारसम्राटसारखे चित्रपट निघणार नाहीत तर ज्या सात्त्विकतेने त्यांनी राजकारणासह अनेक रसिक गुणांची जोपासना केली त्या जीवनावर सात्त्विक असाच चित्रपट निघे. मात्र त्या वेळी सर्वांगीण यशवंतराव समजले पाहिजेत.