मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण -२६

२६.  वैचारिक नेतृत्व आणि दूरदृष्टीचे कर्तृत्व – शांताराम गरूड

१९६० मध्ये जनतेच्या लोकशाही आंदोलनाच्या दबावातून संयुक्त महाराष्ट्राचे जे राज्य स्थापन झाले त्याचे मुख्यमंत्रिपद यशवंतरावांना लाभले. त्याचा उपयोग संयुक्त महाराष्ट्राच्या विकासाचा मजबूत व व्यापक पाया घालण्यासाठी करण्याची दूरदर्शी भूमिका घेऊन यशवंतरावांनी महाराष्ट्रात कृषि -औद्योगिक समाजाची उभारणी करण्याचे धोरण स्वीकारले आणि ते तत्परतेने व पूर्णांशाने राबविण्यासाठी केवळ शासकीय नोकरशाही यंत्रणेवर विसंबून न राहता आजवरच्या राष्ट्रीय आंदोलनातून व सहकारी चळवळीतून पुढे आलेल्या राजकीय सामाजिक कार्यकर्त्याच्या शक्तीला त्यांनी आवाहन केले. त्यांच्या हाती सहकाराचे आर्थिक साधन आणि पंचायत राज्याची राजकीय सत्ता दिली. महाराष्ट्रातील ज्या ज्या विभागांनी, जिल्ह्यांनी वा तालुक्यांनी या आवाहनास सक्रिय प्रतिसाद दिला; त्या विभागात, जिल्ह्यात व तालुक्यात गेल्या पंचवीस वर्षांत भोंड्या माळावरसुद्धा या हरितक्रांतीचे मळे फुलले. प्रक्रिया करणा-या आधुनिक उद्योगाची उभारणी झाली. यंत्र, तंत्र आणि विज्ञान यांच्या आधारे ग्रामीण मराठमोळी मने आणि माणसे औद्योगिक क्षेत्रात सदस्य बनली, संचालक बनून नवनिर्मितीच्या पताका फडकवू लागली आणि महाराष्ट्राच्या या कायापालटात द्रष्टा म्हणून, प्रेरक म्हणून आणि कुशल प्रशासक म्हणून यशवंतरावांनी सिंहाचा वाटा उचलला. ही कृषि-औद्योगिक समाजाची उभारणी अथवा हरितक्रांती अर्थातच आजच्या भारतीय घटनेच्या व केंद्रीय नियोजनाच्या चौकटीत असल्याने आणि मिश्र अर्थव्यवस्थेच्या असमान पायावरच ती साकार होत असल्याने तिला विलक्षण मर्यादा आहेत. तिची परिणामकारकताही एकीकडे मर्यादित व दुसरीकडे विषमता निर्माण करणारी  अशीच आहे, हेही आता पंचवीस वर्षांनी स्पष्ट झाले आहे. परंतु आहे या चौकटीचे, मर्यादांचे भान ठेवून या मिश्र अर्थव्यवस्थेत ग्रामीण समाजाचा आणि शेती विभागाचा वाटा वाढवून घेऊन तिचा कल इकडे झुकवण्यात महाराष्ट्रातील कृषि-औद्योगिक समाजाच्या उभारणीचा प्रकल्प ब-याच अंशी यशस्वी झाला आहे. आणि त्याचे श्रेय यशवंतरावांना खास आहे आणि त्याच अर्थाने ते नवमहाराष्ट्राचे शिल्पकार आहेत.

ही एकच कामगिरी यशवंतरावांचे नाव महाराष्ट्रात व भारतात दीर्घकाळ कोरून ठेवायला पुरेशी असणारी अशी आहे. मात्र यशवंतरावांचे गेल्या अर्धशतकातील समर्पित जीवन याहूनही इतर अनेक गुणवत्तेने व कर्तृत्वाने समृद्ध असे आहे.
 
स्वातंत्र्यपूर्व काळात विशेषत: १९२०-३० या काळात कोरडवाहू शेतीवाडीच्या खेडुत महाराष्ट्रातील गरीब मराठा कुटुंबात शिक्षणाचा ध्यास घेणारी मुले मुळात दुर्मिळ होती. यशवंतराव अशाच एका कुटुंबात जन्मले आणि शिक्षणाचा ध्यास घेऊन त्यासाठी पडतील ते कष्ट घ्यायला पुढे सरसावले हे पहिले नवल. त्यातून अशी शिकलेली बहुजन समाजातील तरुण मंडळी उच्चभू्रंच्या वैभवी व प्रतिष्ठित जीवनाची हाव धरून त्यामागे धावण्यात दंग होती, अशा वेळी हा मुळातच फाटका असणारा तरुण आणखी फाटक्या जीवनाची वाट जाणिवेने व स्वखुषीने चालायला पुढे आला हे दुसरे नवल आणि यानंतर मग एकेका काडीने ही नवलांची साखळी साखळी वाढतच गेली.

सेवादलाचा व विद्यार्थी संघटनेचा कराडसारख्या तालुक्याच्या गावातील एक पोरसवदा तरुण आपल्या तालुक्यातील जनजागृतीच्या जनआंदोलनाची व अपवादात्मक असणारी र्यकर्त्याच्या मोठ्या संचांची सारी शक्ती तिच्याशी समरस होऊन आत्मसात करून घेऊन अल्पावधीत अभ्यासू व कृतिशील कार्यकर्ता बनला. कायदेभंग करून स्वत:चे पायाने तुरुंगात गेला. राजकीय कार्यकर्त्याना करावा लागतो तसा आणि तितका या तुरुंगवासाचा उपयोग आपले राजकीय आकलन समृद्ध बनवून पुढच्या राजकीय प्रवासासाठी चांगली भरघोस शिदोरी बरोबर घेण्यासाठी त्यांनी केला. तालुक्याच्या व जिल्ह्याच्या प्रौढ राजकीय वर्तुळात प्रौढत्व प्राप्त होण्याआधीच त्यांना स्थान मिळाले. पक्षसंघटना, निवडणूक, लढे आणि जनआंदोलने या तीनही आघाड्यांवर त्यांनी स्वत:च्या बुद्धिकौशल्याने, संघटनाचातुर्याने, मुत्सद्देगिरीने, आपली अपरिहार्यता प्रस्थापित केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अर्थातच ते सत्तेचे वाटेकरी बनले. वाढत्या श्रेणीने शासनाचे अधिकारी बनले.

ही सर्व राजकीय वाटचाल त्यांनी अत्यंत सावधचित्ताने स्वत:ला सावरत  सांभाळत केली. तीमधील त्यांची काही पावले चुकलीही. विशेषत: स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या त्यांच्या वाटचालीत त्यांच्या परीनेसुद्धा काही पावले फसली व त्यांचे परिणाम त्यांना भोगावे लागले. संघटनेलाही भोगावे लागले. अखेरीच्या काही वर्षांत राजकीयदृष्ट्या ते एकाकी पडले. अनेकांशी त्यांचे मतभेद झाले, अनेकजण त्यांना व ते अनेकांना दुरावले. पण सर्वांशी स्नेह, जिव्हाळा व आपुलकी ठेवण्याच्या व्यक्तिगत गुणवत्तेमुळे ते सर्वांची मैत्री, स्नेह व आपुलकी कायम राखू शकले, आणि म्हणूनच त्यांच्या निधनाने सर्वांची मने हेलावली, व्याकुळली. महाराष्ट्राच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शासकीय जीवनाला नवा आशय व आकार देणारा यशवंतरावांसारखा शिल्पकार गेल्याने पोकळी तर निर्माण झाली आहेच, पण ती भरून काढण्याचा मंत्र आणि तंत्र यांचीही ठेव मागे ठेवून जाण्यास ते विसरले नाहीत. यशवंतरावांचे खरे मोठेपण यातच आहे.