मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ३०-१

मला यशवंतरावांच्या आखीव रेखीव धोरणाबद्दल फार समाधान वाटते. ते सर्वांना सांभाळून घेणारे आहेत. निभावून नेणारे आहेत. ते सर्वांना आपापले काम स्वतंत्रपणे, मोकळ्या मनाने करावयाला भरपूर वाव देतात. काम नीट चालताना कधीही कोणाच्या कामात ते हस्तक्षेप करीत नाहीत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्येकाला आपापले विचार निर्भयपणे खुल्या दिलाने मांडण्याची मोकळीक असते. आपसातील चर्चेनंतर जो निर्णय लागतो सर्वांनी प्रामाणिकपणे तो अंमलात आणावा, मग मात्र ‘‘पण’’ ‘‘परंतु’’ कोणी करावयाला नको, असा त्यांचा कटाक्ष असतो. कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत त्यांची एककल्ली वृत्ती नसते. तत्त्वाला व धोरणाला बाधा येऊ न देता सर्वांशी जुळवून मिळवून घेण्यात ते सदा तत्पर असतात. प्रत्येकाच्या चांगल्या कामाला त्यांचे प्रोत्साहन असते. त्यांच्या अशा स्थिर, गंभीर विचारप्रवण, कार्यप्रवण, कार्यप्रणालीने सर्वांचे एक हृदय, एक चित्त, झाले असून मंत्रिमंडळाचे रूपांतर जणू मित्रमंडळात झाले आहे. द्विभाषिक राज्य हे भारतातील पहिल्या प्रतीचे राज्य आहे अशी जी ख्याती झाली त्याला कारण यशवंतरावच होते. हे राज्य चालविण्याचे कार्य अती कठीण व किचकट होते. ती तारेवरची कसरत होती. या ‘द्विभाषिका’च्या मंत्रिमंडळात एकमेकांचे जमू शकले नाही. आपापसातील भांडणांमुळे हे राज्य अखेरीस मोडावे लागले, असा कोणाचाही ठपका यशवंतरावांनी येऊ दिला नाही.
 
माझी पत्नी नागपूर विभाग काँग्रेस कमिटीची अध्यक्ष व तिच्याकडे विदर्भाच्या प्रश्नांचे नेतृत्व आणि मी मंत्रिमंडळात. महाराष्ट्रातील ब-याचशा मंडळींनी आमच्याबाबत साशंक होणे स्वाभाविक  होते. हा केवळ दुटप्पीपणा आहे, असेही काही म्हणू लागले. मी माझी भूमिका स्पष्ट करण्याच्या दृष्टीने यशवंतरावांना एक सविस्तर पत्र लिहून कळविले होते की, माझ्या भूमिकेमुळे आपल्या अंगीकृत कार्याला अडथळा येत आहे असे आपल्याला वाटताक्षणी मला मंत्रिपदाच्या कामातून मुक्त करावे. मंत्रिपद सोडल्यावरही मी विदर्भाच्या प्रश्नांबाबत अखेरपर्यंत प्रयत्न करीन व काँग्रेसश्रेष्ठी जो अखेरचा निर्णय देतील तो मी प्रामाणिकपणे पाळीन, व त्याचा प्रचार करीन. यशवंतरावांनी त्यानंतर मला घरी बोलावून घेतले आणि म्हटले ‘‘माझे मन आपल्याविषयी मुळीच साशंकित नाही, कोणी काहीही म्हणोत, माझा आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास आहे.’’ चंदिगढ येथील ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनाच्या वेळी महाराष्ट्रातील काही मंडळींनी मजविषयी शंका प्रदर्शित करताच यशवंतरावांनी, ‘‘कन्नमवारांविषयी असा गैरसमज करून घेऊ नका.’’ असे स्पष्ट सांगितले. नऊ सदस्य कमिटीत मी एकटा आपला दृष्टिकोण स्पष्टपणे मांडीत होतो. तरी या बाबतीत यशवंतरावांनी मनाला कधीही लावून घेतले नाही. पंडित गोविंद वल्लभपंतांच्या निवासस्थानी ही चर्चा परस्परांच्या भावनांचा आदर ठेवून उच्च पातळीवरून व्हावयाची. नऊ जणांत मी एकटाच काय तो अलग विचारांचा होतो. तरी आमच्या परस्परांच्या प्रेमात मुळीच अंतर आले नाही व कसल्याही प्रकारची कटुता आली नाही. याला कारण यशवंतरावांचा दिलखुलास स्वभाव व त्यांचे विशाल अन्त:करण.

पोटात शिरून विश्वास संपादन करून, दुस-याकडून काम करवून घेण्याची कला फार कठीण असते. पण ते यशवंतरावांना साधले आहे. बाहेरची काही विघ्नसंतोषी मंडळीही कोणत्या तरी प्रश्नाबाबत मतभेदाच्या खडकांवर हे आपसातील वाटाघाटीचे तारू फुटावे आणि हा भाजनाचा प्रश्न १९६२ च्या आम निवडणूकीनंतर विचारात घेण्यात यावा, असेच इच्छिणारी होती. पण यशवंतरावांनी असा मोका येऊच दिला नाही. सा-या वाटाघाटी यशस्वी केल्या.

महाराष्ट्र राज्यनिर्मितीबाबत अनेक प्रक्षांचे प्रयत्न झाले आहेत. यात जनतेकडे विशेष श्रेय असले तरी यशवंतरावांसारखा कुशल, प्रसंगावधानी विचारवंत नेता नसता तर आजचे हे महाराष्ट्र राज्य एवढ्या लवकर पाहता आले असते की नाही याची मला शंका आहे.