मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण -२७

२७. अलौकिक प्रतिभावान – प्र. को. भापकर

यशवंतराव अगदी लहानपणापासून काँग्रेसनिष्ठ होते. यशवंतरावांनी काँग्रेसची धुरा सतत सांभाळून धरली. माझा त्यांचा प्रत्यक्ष परिचय फार उशिरा म्हणजे १९४५-४६ साली झाला. निवडणूक होण्यापूर्वी ते श्रीरामपूरला आले होते. आणि तेथे त्यांचे भाषण झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर ते आणि किसनवीर माझ्या घरी आले होते. निरोप घेऊन जावयास निघाले तर ‘‘थांबा थोडा वेळ’’. त्या दोघांना माझ्या पत्नी सौ. हिराबाई म्हणाल्या. मी हिराबार्इंकडे पाहातच राहिलो. ‘‘मुख्यमंर्त्याचा का असा वेळ घेतेस?’’ मी बुचकळ्यात पडून म्हटले तर तिने दोघांच्या हातात नारळ दिले, हार घातले, दोघांनाही गहिवरून आले. ‘‘तुम्ही झगडत आहात म्हणून मला हे पद मिळाले’’, यशवंतराव व किसनवीर दोघेही भारावले.

मी साता-यास हिंडलो होतो, तिकडची परिस्थिती चिंताजनक होती. माझे मित्र नि त्या वेळचे आमदार चंद्रोजी पाटील यांचा खून झाला होता. पुढे ४२ च्या चळवळीत डिक्टेटर असलेले आमदार के.डी.पाटील यांचाही खून झाला! सखाराम बारबटे यांस यशवंतराव भीत असत. केव्हा कुणाचा तो खून करेल याचा नेम नाही अशी त्यांना भीती वाटे! आणि म्हणून बरेच दिवस ते साता-यास जात नसत! परंतु पुढे कु-हाडीचे हे राजकारण यशवंतरावांनी बंद पाडले यातच त्यांचा मोठेपणा दिसून येतो. त्या वेळी त्यांनी मुत्सद्देगिरीने हा प्रकार थोपविला यात शंका नाही. त्यांच्या चेह-यावरील भाव, बोलण्याची हौस, माणसाला विश्वासात घेण्याची त्यांची हातोटी, माणसाची पारख, समयसूचकता, अचुकता, या सर्वांमुळे त्यांचा प्रभाव पडे. त्यामुळेच ‘यशवंत’ ‘जयवंत’ झाले.

वास्तविक मी त्यांचा टीकाकार. असेंब्लीत मी त्यांच्यावर तुटून पडत असे. परंतु केव्हाही भेटावयास गेलो की, ते हसून स्वागत करीत. मनमोकळेपणा हा त्यांचा गुण अलौकिक समजावयास हवा. एकदा मागे क-हाड कॉलेजात माझे भाषण झाले त्या वेळी माझ्या पत्नी हिराबाई माझेबरोबर होत्या. नेहमीप्रमाणे मी यशवंतरावांवर कडाडून टीका केली. पी.जी.पाटील, रामभाऊ नलावडे बरोबर होते. प्रा.सौ.सुमतीबाई विद्याथ्र्यांत बसल्या होत्या. चहा पिताना हिराबार्इंना राहवले नाही. मला त्या रागावल्या. ‘‘एवढी टीका करावयाची काही जरूरी होती का?’’ पण संयुक्त महाराष्ट्र एकसारखा माझ्या डोक्यात होता! आणि त्या ओघात ती टीका केली गेली! आज मला वाटू लागले आहे की, केवळ भाषेवर भर असू नये! यशवंतराव जरी गेले असले तरी त्यांनी केलेल्या भारताच्या सेवेमागे त्यांची निष्ठा होती. त्या निष्ठेपासून ते ढळले नाहीत. भारताच्या सेवेचे उदाहरण त्यांनी भारतीयांच्या समोर घालून दिले. त्यांच्या मातेने अपार कष्ट करून त्यांना घडविले. त्यांच्या पत्नीने त्यांना विचारीपणे, संयमाने साथ दिली.

मुख्यमंर्त्याची बायको म्हणून त्या कधीच मिरविल्या नाहीत. आज ते दोघेही नाहीत. त्या दोघांनी आपल्या नि:स्वार्थी जीवनाचा व देशभक्तीचा आदर्श व वारसा आपल्यासाठी राखून ठेवला आहे. तो आपण जतन करावयास हवा.