मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण २४-१

खरे म्हणजे आम्ही यशवंतराव यांचे नेतृत्व नेहमीच मानले होते. आम्हाला त्यांचे आकर्षण होते. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर जनमताची चाहूल, पक्ष कार्यकर्त्याच्या विचारातून घडवावी एवढा माफक विचार घेऊनच उंब्रज येथे कार्यकर्त्याची बैठक आम्ही बोलावली होती. परंतु बैठकीच्या उद्देशाचा विपर्यास झाल्यानेच यशवंतराव चव्हाणांची व आमची आव्हाने-प्रतिआव्हाने होण्यापर्यंत मजल गेली. ते गैरसमजुतीचे फळ होते.
 
यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व व त्यांची वैचारिक उंची आणि राजकीय स्थान आम्ही जाणून होतो. त्यांच्या राजकीय विचाराला आव्हान देण्याएवढे आम्ही मोठे नव्हतो, आणि तसा इरादाही नव्हता. परंतु भावनेच्या भरात शब्दांनी शब्द वाढला, ही गोष्ट मात्र खरी !

आम्ही त्यांच्या घरी परत येताच श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा ढळलेला समतोल काहीसा सावरला गेला असल्याचे बैठकीच्या खोलीत पाय ठेवताच दिसले. आम्हाला बघून ते म्हणाले, ‘‘संभाजीराव उंब्रजची बैठक रहित नाही का करता येणार?’’ मी उद्गारलो, ‘‘काय अशक्य आहे? मूळ विचारांचे सूत्र एकच असल्यामुळे ठरलेली उंब्रज मीटिंग रहित केल्याचे पत्रक आम्ही प्रसिद्धीस दिले आणि आम्ही सर्व मित्रमंडळी आपआपल्या घरी विचारमग्न अवस्थेत परत गेलो. आमच्या सर्व मित्रांनी दोघांमधील वादविवाद शांत झाल्याचे पाहून आनंदाचा नि:श्वास टाकला.

त्यानंतर आम्ही सर्व मित्रमंडळी काही काळ संयुक्त महाराष्ट्राच्या ऐन चळवळीत शांतपणे परिस्थितीचे अवलोकन करीत होतो.

सर्व महाराष्ट्रभर त्या संदर्भातील मागणीसाठी चळवळीचा आगडोंब उसळला होता. यशवंतराव यांचे जवळचे रथी-महारथी मित्रसुद्धा द्विधा मन:स्थितीत वावरत होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षातील मतभेद पराकोटीचे वाढले होते. रोज एक नवा पर्याय दिल्लीहून यावयाचा, व महाराष्ट्रात त्याच्या प्रतिक्रिया उलटसुलट उठावयाच्या. जणू, महाराष्ट्रात एक प्रकारचे कुरूक्षेत्रच घडत होते. मोर्चे प्रतिमोर्चे, निषेध, निदर्शने, जाळपोळ, गोळीबार असा धुमधडाका चालला होता.
 
अशी महाराष्ट्रातील आंदोलनाची संघर्षमय अवस्था चालू असतानाच श्री. यशवंतराव चव्हाण यांचे मुंबईहून आम्हा मित्रांसाठी मला उद्देशून एक पत्र आले.

त्यातील मजकूर असा-

मुंबई

प्रिय संभाजीराव यांना,

परवा क-हाड येथील माझ्या घरी आपली भेट झाली. खूप गरमागरम चर्चा होऊन, आव्हाने-प्रतिआव्हानेही झाली. आपणास व मलाही या गोष्टीचा मनस्ताप झाला आहे, असे मी मानतो.

या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षात खूप वैचारिक गोंधळ आहे. महाराष्ट्रात तर सं.म.मागणीच्या चळवळीने उग्र रूप धारण केले आहे. मला एका बाजूला खवळलेला अरबी समुद्र दिसतो आहे तर दुस-या बाजूला पेटलेली मुंबई दिसते आहे. मला आज तरी समजत नाही की या वादळी वातावरणात माझी राजकीय जीवननौका कोठे जाईल, काय होईल. अशा  अनिश्चित अवस्थेत मी उभा आहे. आपल्या क-हाड भेटीत या माझ्या मानसिक अवस्थेचा परिणामही झाला असेल. मला आपणा सर्वांचे प्रेमच या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी उपयोगी पडेल. पुन्हा भेटू या.

आपला,
यशवंतराव चव्हाण

हे पत्र आजच मी जाहिरपणे उद्धृत करीत आहे. यापूर्वी हे पत्र फक्त माझ्या मित्रांनाच वाचून दाखविले होते. पुढे काही काळ लोटल्यावर यशवंतराव चव्हाण विशाल द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि थोड्या दिवसांतच विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या. १९५७ च्या निवडणुका म्हणजे एक प्रकारचे अग्निदिव्यच होते.

आमची मित्रमंडळी राजकीय हालचालीमध्ये काहीसा थंड पवित्रा घ्यावा या विचारात होती. परंतु यशवंतरावांनी माझ्यासह काही निवडक मित्रमंडळींना मुंबईस बोलावून विश्वासात घेऊन महाराष्ट्राच्या भावी भवितव्यासंबंधी अचूक दूरदृष्टीने मार्गदर्शन केले.