मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १४३

१४३.  मला भेटलेले गुणग्राही यशवंतराव  - मुकुंद शं. किर्लोस्कर

राजकारणात विरोधकाला नामोहरम करण्याचे किंवा जिंकण्याचे अनेक मार्ग असतात. त्यापैकी एक प्रभावी मार्ग म्हणजे विरोधकाचीही अचूकवेळी गुणग्राहकता प्रकट करणे. आपल्याबद्दल अनपेक्षितपणे प्रकट झालेल्या या गुणग्राहकतेने, विरोधकाची अस्मिताही क्षणभर सुखावते व विरोधातला कडवटपणा किंवा धार आपोआप बोथट होते.

श्री. यशवंतरावजी चव्हाण गुणग्राहकतेचा या प्रकारे वापर करण्यात मोठे प्रवीण होते, हे मी अनेकांकडून ऐकले होते. परंतु याचा अनुभव मला एका अनपेक्षित प्रसंगाने आला.

प्रसंग होता निवडणूक प्रचाराच्या धामधुमीचा!

संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी त्यावेळी महाराष्ट्रभर जोरदार आंदोलन चालू होते. वास्तविक, ख-याखु-या मराठी जनतेच्या या चळवळीचे नेतृत्व श्री. यशवंतरावजींसारख्या महाराष्ट्राच्या उमद्या, तरुण नेत्याकडेच असावयाचे. परंतु, ‘‘महाराष्ट्रापेक्षा पंडीत जवाहरलाल नेहरु हे अधिक थोर’’ असल्याचा साक्षात्कार श्री. यशवंतरावजींना त्या सुमारास झाला; व त्यांनी विशाल द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास मान्यता दिली.

माझे स्वत:चे मत संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचे बाजूने होते. स्वाभाविकच, माझ्या संपादकत्वाखाली निघणा-या ‘‘किर्लोस्कर’’ मासिकातून मी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा जोरदार पुरस्कार करीत होतो. श्री. यशवंतरावजी हे ‘किर्लोस्कर’ मासिकाचे एक नियमित वाचक. एरवी मी श्री. यशवंतरावजींच्या चहात्यांपैकी एक असलो, तरी संयुक्त महाराष्ट्र चळवळीने आम्हा दोघांना परस्पर विरोधी गटात नेऊन दाखल केले होते. माझ्या संपादकीय स्फुटांतून श्री. यशवंतरावजींच्या द्विभाषिक राज्याच्या भूमिकेवर मी घणाघाती हल्ला चढवीत होतो. माझ्यामधील चाहत्याचे रूपांतर श्री. यशवंतरावजींच्या विरोधकात झाले होते. म्हणून, आमची कधी धावती गाठभेट झाली, तरी श्री. यशवंतरावी पद्धतीने माझ्या पाठीवर मित्रत्वाची थाप मारीत श्री. यशवंतरावजी विचारीत, ‘‘हं मुकुंदराव! काय म्हणतो आहे तुमचा संयुक्त महाराष्ट्र!’’ — आणि मीही तेवढ्याच मिष्किलपणे प्रत्युत्तर देई, ‘‘मिळवू! मिळवू! एक दिवस संयुक्त महाराष्ट्र आम्ही मिळवूच!’’

याच सुमारास द्विभाषिक राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका उद्भवल्या. निवडणुका म्हणजे चुरस आलीच! या वेळी तर चुरशीला विलक्षण धार चढली होती. कारण, सत्ता काँग्रेस पक्षाकडे, पण मराठी जनता मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीमागे! त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचे भवितव्य मोठ्या धोक्यात आले होते. स्वत: श्री. यशवंतरावांची निवडणूकही याला अपवाद नव्हती.

त्या वेळी ‘किर्लोस्कर’ च्या निवडणूक विशेषांकासाठी माझे लेखक मित्र प्रा. प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांचे समवेत मी श्री. यशवंतरावजींची खास मुलाखत घेतली होती.

निवडणुकीनिमित्त घेतलेल्या अशा खास मुलाखतीवरील लेख संबंधित मुलाखतदाराकडून संमत करून घेतल्याखेरीज मी तो ‘किर्लोस्कर’ मधून प्रसिद्ध करीत नसे.

स्वत:च्या निवडणुकीनिमित्त श्री. यशवंतरावजी त्या वेळी कराड मतदारसंघात प्रचार दौ-यावर होते. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी, त्यात काँग्रेस पक्षाचे पुढारी म्हणून महाराष्ट्रातल्या निवडणुकांची जबाबदारी, श्री. यशवंतरावजींच्या शिरावर! त्यामुळे अहोरात्र त्यांची धावपळ चालू होती. मिनिटाची फुरसत मिळणेही कठीण!

पण माझे ओगलेवाडीचे मित्र श्री. भैय्यासाहेब पाध्ये यांनी मोठ्या प्रयासाने श्री. यशवंतरावजींशी माझी मुलाखत ठरविली. किर्लोस्करवाडीस मला श्री.भैय्यासाहेबांचा फोन आला ‘‘उद्या सकाळी सहा वाजता तुम्हाला श्री. यशवंतरावांची भेट घ्यावयाची आहे!’’

‘‘ही कसली वेळ?’’ असे मी मनाशी म्हणालो खरा. परंतु दुसरे दिवशी किर्लोस्करवाडीहून कराडला जाऊन कोयनेकाठच्या सरकारी डाकबंगल्यावर वेळेवर दाखल झालो. माझ्यासमवेत प्रा. ऊर्ध्वरेषे व श्री. पाध्येही होतेच.

आम्ही गेलो तेव्हा श्री. यशवंतरावजी झोपलेले होते. आपल्या मतदारसंघातील निवडणूक प्रचार सभा आटोपून ते पहाटे दोन तीन वाजता डाक बंगल्यावर परतले होते. तथापि, आम्ही येताच आपणास उठविण्याबद्दल त्यांनी नोकरमंडळींजवळ आठवणीने निरोप दिला होता. पण त्यांना विश्रांती मिळावी म्हणुन आम्ही वाट पाहणेच पत्करले.