१४६. एक जागते रसिको – सौ. शैलजा राजे
मला वाटतं ते ६५-६६ साल असावं. मी त्या वेळी केसरी-मराठा संस्थेनं पुन्हा सुरू केलेल्या ‘सह्याद्री’ मासिकाचा बालविभाग सांभाळीत होते. श्री. भा. द. खेर यांनी भाषांतरित केलेल्या ‘‘दि प्रिन्सेस’’ या श्री. मनोहर माळगावकरांच्या कादंबरीचा प्रकाशन सोहळा होता. त्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे यशवंतराव चव्हाण होते. प्रकाशन त्यांच्या शुभहस्ते होणार होते. त्या समारंभाची बहुतेक सर्व तयारी मी केली होती. स्त्रीच्या प्रवृत्तीनुसार!
यशवंतराव आले. त्यांनी ते सर्व पाहिलं न् सहज चौकशी केली. माझी ओळख करून दिली गेली. आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्या वेळी माझं एकुलतं एक पुस्तक ‘खणानारळाची ओटी’ हे नुकतंच प्रसिद्ध झालं होतं. माझी ओळख करून देताच यशवंतराव म्हणाले, ‘‘व्वा! तुमचं ते खणानारळाची ओटी पुस्तक आम्ही वाचलंय बरं का! आमच्या घरात ते सर्वांना आवडलं!’’
क्षणभर काय बोलावं मला कळेना! या एवढ्या मोठ्या माणसानं असं बोलावं हा आपला केवढा सन्मान ही भावना मनात जागी झाल्याशिवाय राहिली नाही.
त्याच दिवशी चहापानाच्या वेळी श्री. बाळ ज. पंडित यांच्या घरी श्री. भा. द. खेरांनी माझ्या लहान मुलीशी यशवंतरावांशी ओळख करून दिली. (ती त्या वेळी छोट्या छोट्या कविता करीत होती.) तिनं वाकून नमस्कार केला आणि यशवंतरावांनी चटकन तिला उचलून मांडीवर बसवली. तिची चौकशी केली.
पुढे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माधुरीनं (माझी मुलगी) त्यांच्यावर कविता केली न् पाठवली. लगेच त्याची पोच तिच्या नावावर आली. पत्र टाइप केलेलं होतं, पण सही त्यांची होती. ते पत्र आता कदाचित तिच्या संग्रही तिच्या सासरी असेल. फारच छान कौतुकाचं पत्र होतं ते!
पुढे यशवंतराव संरक्षण मंत्री असताना त्यांच्या मिनिस्ट्रीनं माझ्या ‘तुळशीपत्र’ या कादंबरीच्या एकदम ७५० प्रति खेरदी केल्या. सोमय्या प्रकाशनानं ती कादंबरी प्रकाशीत केली होती. वर्षाच्या आत ऑफसेटवर दुसरी आवृत्ती निघण्याची ही अपूर्व संधी त्यामुळेच मिळाली. यामागे कुणाची प्रेरणा असावी याचा विचार मनात आला की एकच नाव ओठावर येतं. यशवंतराव चव्हाण ! सर्वच दृष्टीनं एक जाणते रसिक नेते !