मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १४१-१

प्रबोधन आणि परिवर्तनाचा विचार करताना यशवंतरावांनी राज्याच्या अविकसित आणि उपेक्षित भागांना नेहमीच झुकते माप दिले. विदर्भातील जल, वन आणि खनिज संपत्तीचा उपयोग करून विदर्भाच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पारस वीज केंद्राची स्थापना, औद्योगिक वसाहतींची निर्मिती यातून त्यांच्या प्रयत्नांची दिशा आपल्याला दिसते.

यशवंतरावांनी नेहमीच बेरजेचे राजकारण व समाजकारण केले. जोडण्यावर, वाढविण्यावर त्यांचा नेहमी भर असायचा. एखादा चांगला कार्यकर्ता दिसला की, ते त्याला जवळ करीत, कामाला लावीत. याचा मी अनुभव घेतला आहे. विदर्भ युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी श्री. मधुसुदन वैराळे यांनी माझे नाव यशवंतरावांना सुचविताच त्यांनी त्याला लगेच संमती दिली.

त्यानंतरचा लक्षात राहण्याजोगा प्रसंग १९६६ साली विधान परिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून माझे नाव मा. यशवंतरावांनी बडोदा येथे भरलेल्या पार्लमेंटरी बोर्डात जाहीर केले. हा निर्णय मला कळताच धक्का बसला. त्याचे कारण त्या वेळी शिक्षण मतदारसंघात एकूण १३ जिल्हे होते. आठ जिल्हे विदर्भाचे व पाच जिल्हे मराठवाड्याचे हा अती विस्तारित मतदारसंघ मला पूर्णपणे अपरिचित होता. यामुळे मी यशवंतरावांना भेटून मला तिकिट देऊ नये अशी विनंती केली त्या वेळी यशवंतराव म्हणाले, ‘‘ही उमेदवारी तुम्हाला देऊन मी तुम्हाला विदर्भ व मराठवाड्याच्या जनतेसमोर प्रोजेक्ट करीत आहे. नव्या नव्या शिक्षण संस्था निघत आहेत. त्या संस्थांच्या प्रश्नांबाबत परिणामकारक व अर्थपूर्ण उकलीसाठी, त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी काँग्रेसने भरीव कार्य करण्याचे ठरविले. काँग्रेस संघटना मजबूत बांधावयाची आहे. निवडणुकीच्या पराजयामध्ये सुद्धा यश दडलेले असते.

त्यामुळे रामभाऊ तुम्ही लढले पाहिजे. यशवंतरावांच्या प्रेमाच्या सल्ल्याने मी निवडणुकीस तयार झालो. १३ जिल्ह्यांचा अहोरात्र दौरा करून आटोकाट प्रयत्न केले. दुर्दैवाने मला अपयश आले. मी निवडणूक हरलो पण खचलो नाही. कारण यशवंतरावजींची प्रेरणा मला कार्यप्रवण करीत होती. मी अधिक जोमाने कामाला लागलो.

यशवंतरावजी हे ख-याखु-या अर्थाने शिल्पकार होते. कलावंताची सर्जनशीलता, कारागिरीचे कसब आणि भविष्याची स्वप्ने पाहण्याची दृष्टी त्यांच्याजवळ होती आणि या सा-यांच्या जोडीला होते व्यावसायिक शहाणपण, विवेचक विचारशक्ती, आणि म्हणूनच आज जरी ते शरीराने आपल्यात नसले तरी विचाराने, आचाराने आणि आत्मिक शक्तीने सा-या महाराष्ट्राच्या मातीत, माणसात आणि मनात सामावले आहेत. एकरूप झाले आहेत. त्यांच्या स्मृतीला माझे विनम्र अभिवादन !