मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १४०

१४०. समय सूचक चतुर यशवंतराव –सौ. ताराबाई साठे

श्री. बाळासाहेब खेर मुंबईचे प्रधानमंत्री (मुख्यमंत्री) असताना त्यांच्या पाठीशी त्यांचे पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून असेंब्लीत बसलेले यशवंतराव पहिल्याने पाहिले. तेव्हापासून ते शेवटपर्यंत या ना त्या कारणाने ते महाराष्ट्राच्या पुढा-यात सदैव गणले जाऊ लागले. काही काळ तर यशवंतरावांचा शब्द म्हणजेच महाराष्ट्राचा शब्द झाला होता ! इतके यश फार थोड्या पुढा-यांच्या वाट्याला येत असेल.

महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसची सभा मुंबईस मला वाटतं पाटकर हॉलमध्ये भरली होती. बंगलोर अधिवेशनातील दुफळीमुळे काँग्रेसची दोन शकले नुकतीच झाली होती. यशवंतराव सिंडिकेट काँग्रेसमध्ये एक महत्त्वाचा घटक होते. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत महाराष्ट्र असेंब्लीने सर्वच्या सर्व २०३ सदस्यांची मते श्री. गिरींचे बाजूने न टाकता, श्री. संजीव रेड्डी यांच्या बाजूने टाकून ओ काँग्रेसमध्ये असण्याचा निर्वाळा अगोदरच दिलेला होता ! सभेचे वातावरण जरा गरमच होते. मा. इंदिराजींच्या बाजूने श्री. खाडिलकर, श्री. आनंदराव चव्हाण व श्री. तुळशीदास जाधव हे तिघे प्रामुख्याने होते. श्री. खाडिलकरांनी भाषण केले. सभेच्या ओरड्यास न जुमानता आपले मत स्पष्टपणे सांगितले. श्री. तुळशीदास जाधव बोलायला उभे राहिले. ते इंदिराजींचे बाजूने बोलू लागले मात्र आणि सभेत गलबला सुरू झाला! मा. वसंतदादा पाटील अध्यक्ष होते. त्यांच्या उजव्या बाजूस जराशी दूर स्टेजवरच मी बसलेली असल्याने कोण कोण पुढारी मंडळी उठत आहेत, ओरडत आहेत, सर्व मला स्पष्ट दिसत होते. श्री. तुळशीदासजींचे भाषण कोणासच नको होते! पण ते थांबण्याचे लक्षण दिसेना! सभागृहात उभे राहून, ओरडून, साहेब, यांचे बोलणे बंद करा असे सभासद म्हणू लागले होते. यशवंतराव चतुर व समयसूचक असल्याने ते चटकन उठून उभे राहिले. माईकला हातबीत लावण्याच्या भानगडीत न पडता त्यांनी तुळशीदास जाधवांच्या गळ्याला आपल्या उजव्या हाताने मिठी मारल्यासारखे करून हसत हसत अलगद माईकपासून दूर घेतले? टपलेल्या वर्तमानपत्रांच्या फोटोग्राफर्सनी चटकन फोटो घेतला. तो दुसरे दिवशी प्रसिद्धही झाला. तो पाहिला तर, जणू प्रेमानेच यशवंतराव तुळशीदासना मिठी मारताहेत असाच कोणालाही आभास होईल!

पंडित जवाहरलाल नेहरू कोथरूडच्या गांधीभवनाच्या उद्घाटनास मागे एकदा आले होते. समारंभ संपण्यापूर्वीच पावसाने झोड उठवली. जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. कोथरूड पुणे रस्त्यावरील सखल नाले असलेल्या जागी रस्त्यावरून गाडी जाणे शक्य नाही असा पोलिसांचा रिपोर्ट आला ! पंडितजींना तर लगेचच जायचे होते. पाणी केव्हा ओसरेल याचा नेम नव्हता. यशवंतराव स्वत: गांधीभवनाहून त्या सखल जागी गेले. स्वत: पाण्यात उतरून त्यांनी त्याचा अंदाज घेतला, व पंडितजींची गाडी यातून जाऊ शकेल असे सांगून गाडीस बोलावलेही ! गाडी पाण्यापार जाऊन पुढील कार्यक्रम वेळेवर झाला. अंग व धोतर भिजलेले मुख्यमंत्री यशवंतराव तसेच पंडितजींच्या बरोबर कार्यक्रमास गेले. सर्वांनी यशवंतरावांच्या या गुण वैशिष्ट्याचे कौतुक केले.

ता. १२ जुलै १९६१ रोजी पानशेत व खडकवासला या धरणांच्या फुटण्याने पुण्यनगरीचे सर्व स्वास्थ नाहीसे झाले. पुण्यावर महासंकट आलेले समजताच ताबडतोब यशवंतराव पुण्यास आले. डेक्कन जिमखान्याच्या कोप-यावर उभे राहून त्यांनी सर्व अवलोकन तर केलेच पण सर्व पुणेकरांना धीर दिला. श्री. धनंजयराव गाडगीळ व श्री. स.गो. बर्वे यांच्या साहाय्याने ताबडतोबीच्या सर्व इलाजाची व्यवस्था तर केलीच पण पुनर्वसनाचीही आखणी केली. अवघ्या दोन दिवसांत इंद्रायणीचे पाणी स्पेशल ट्यूबने पुण्यास पुरविणेची व्यवस्था केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या अमोल व तत्पर कामगिरीमुळे पुणेकरांना धीर आला. पण शासनाच्या तत्परतेचीही धन्यता जाणवली. पुणेकर यशवंतरावांची ही कामगिरी न विसरता त्यांचे सदैव कृतज्ञतेने स्मरण करतील...

साल होते १९६२. भारत चीनबरोबर निकराने लढत होता. श्री. कृष्ण मेनन संरक्षणमंत्री होते. ते बदलायचे होते; पण मग त्यांच्या जागी दुसरा योग्य कोण हा प्रश्न होता. पंडितजी मोठे गुणग्राही होते. त्यांना, अटकेवर झेंडा लावणा-या व मोगलांना सदैव त्राहि भगवान करून सोडणा-या दख्खनच्या शूर मराठ्यांचा नेता साहजिकच आठवला. संरक्षणमंत्री म्हणून यशवंतरावांची नेमणूक झाली. त्या वेळी आम्हा सर्व महाराष्ट्रीयन लोकांची मान अभिमानानं उंच झाली. विमान सायंकाळी यायचं होतं. अंधार झाला होता. आम्ही महाराष्ट्रातले सर्व संसद सदस्य व आणखी बरेच लोक विमानतळावर आमच्या महाराष्ट्राच्या नेत्याचे स्वागत करायला गेलो होतो. यशवंतराव यशवंत खरेच. ते आले आणि ‘सीज फायर’ झाला! युद्ध थांबले. यशवंतरावांना दिल्लीतील प्रथमपदीच यश मिळालं. यशवंतरावांना राज्यसभेचे सभासदस्यत्व दिले गेले. शपथ घ्यायला ते महाराष्ट्रीयन पोषाखातच आले होते. महाराष्ट्राचा त्यांना फार अभिमान होता.

त्यांचे भाषण ऐकायला सर्वांनाच आवडत असे. ते मोजके बोलत. योग्य ठिकाणी तोलून मापून योग्य शब्द घालण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांना वाचनाचाही खूप नाद होता.