मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ११४-१

आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचे शिल्पकार म्हणून यशवंतरावजींनी मुख्यमंत्री असताना फार मोलाचे कार्य केले आहे. बहुजन समाजाला एक नवा आत्मविश्वास त्यांनी दिला. ग्रामीण नेतृत्वाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मानाचे स्थान देण्याचा यशवंतरावजींचा प्रयत्न हा तर महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहावा असा क्षण आहे. पु-या भारताला ललामभूत ठरणा-या सहकारी क्षेत्राला यशवंतरावजींनी एक प्रकारची संजीवनीच दिली. ग्रामीण क्षेत्रातील संघटनाकुशल आणि विधायक कर्तृत्वामागे यशवंतराव दीपस्तंभासारखे उभे राहिले आणि परिणामी सहकारी चळवळ फोफावण्यास हातभार लागला. सहकाराबरोबर महाराष्ट्राच्या शेतीच्या प्रश्नाकडेही यशवंतरावजींनी आपुलकीने लक्ष दिले आणि महाराष्ट्राला या क्षेत्रातही अग्रेसरत्व प्राप्त झाले.

ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसारही यशवंतरावजींनी एका सुस्पष्ट भावनेने केलेला दिसेल. शिक्षणावाचून पिढ्यानपिढ्या वंचित राहिलेल्या शेतकरी समाजातील एका पिढीला उच्च शिक्षणाची संधी मिळवून देऊन सांस्कृतिक जीवनातील दरी कमी करण्याच्या उद्देशाने यशवंतरावजींनी वास्तववादी भूमिका स्वीकारली, त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक जीवनाला एक वेगळीच कलाटणी लागलेली आपणास दिसून येईल. यशवंतरावांच्या रूपाने हिमालयाच्या संरक्षणासाठी १९६२ च्या सुमारास तो सह्याद्री धावून गेला नसता आणि पंडित नेहरूंनी आणखी पाच वर्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी यशवंतरावजींना ठेवले असते तर महाराष्ट्राचे आज हे चित्र दिसते त्याहून निराळे दिसते.

यशवंतराव हे महाराष्ट्राने या थोर देशाला अर्पण केलेले एक थोर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. राजकारणाबरोबरच साहित्य आणि कला या प्रांतातील यशवंतरावजींचा स्वैर संचार कुणीही हेवा करावा इतक्या मोलाचा होता. लोकोत्तर राजकारणी म्हणून त्यांनी दिगंत कीर्ती मिळविली. त्याला त्यांच्यातील गुणग्राहकता आणि कलात्मकता यांनी विशेष हातभार लावला आहे.

सदैव प्रसन्न चेहरा, कोणाचाही द्वेष न करता वागण्याची पद्धत. होईल तितके आपल्या शक्तीप्रमाणे दुस-यांच्या उपयोगी पडावे, काव्य, शास्त्र, विनोद, साहित्य या गुणांची केलेली जोपासना, कोणी एखादा माणूस एखादे काम घेऊन आलाच तर आणि ते काम ऐकून घेतल्यावर, करणे शक्य असले तर काम घेऊन येणा-या त्या व्यक्तीशी आपुलकीने व प्रसन्नपणे बोलण्याची आणि तो इसम खोलीबाहेर पडताना त्याच्या ओठावर स्मित झळकत असलेले पाहणे ही किमया यशवंतरावजीच करू शकत होते. दुस-याच्या मनाला यातना होतील असे बोलणे त्यांच्या स्वभावातच नव्हते. एखाद्याची फसवणूक करणे, थापेबाजी करणे; यशवंतरावजींच्या स्वभावाशी जुळणारे नव्हते. यशवंतरावजी जी उत्तरे देत त्यांचा आशय स्पष्ट आणि नि:संशय असे. उद्धटपणाचा, तिरसटपणाचा अथवा तुच्छतेचा दुर्गंधही त्याला नसायचा. स्वत:च्या सामथ्र्याची बरोबर जाण असणारी, स्वाभिमानी पण स्वभावत:च नम्र असणा-या अशा व्यक्ती या जगात फारच विरळा. यशवंतरावजी यांचे स्थान या विरळा व्यक्तींत होते.