प्रत्येक गावात जाताना तेथली माणसे त्यांच्या लक्षात असत, परिस्थितीचा संदर्भ माहीत असे. आपल्याबरोबरच्या कार्यकर्त्याची वास्तपुस्त ते सदैव ठेवत. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पिंगळीजवळच्या ओढ्यातून साहेबांची गाडी पुढे येताच लोकांनी त्यांच्यावर हारांचा वर्षाव केला, तेव्हा ते सांगू लागले, ‘‘मागे बापू (राजारमबापू पाटील) आहेत, त्यांनाही हार घाला, ’’ बापूंबद्दल म्हणजे आपल्या पाठीमागच्या गाडीतून येणा-या कार्यकर्त्याबद्दल अशी एक वेगळी जाणीव त्यांच्या वागण्यात, बोलण्यात आणि चालण्यात असे.
साहेबांबद्दल लिहिताना श्रीपाद डोंगरेंबद्दल बोललेच पाहिजे. रामाबद्दल लिहिताना हनुमानाची आठवण नेहमीच येते. साहेबांविषयी अजोड प्रेम असणारा हा असामान्य कौटुंबिक सेवक होता. त्यांच्याबद्दलही खूप लिहावे लागेल. ते डोंगरे गेले आणि साहेबांना एक धक्का बसला. ते डोंगरे कसे होते? साहेबांच्या बरोबर असणा-या जवळच्या माणसांना जेवण मिळाल्याशिवाय स्वत: जेवायला न बसणारे, साहेबांच्या कार्यक्रमांची नेहमीच गर्दी असे, लोकांचा गराडा असे, ते जेवायला बसले की, डोंगरे पत्रकार म्हणून आणि जवळचे म्हणून आम्हाला हुडकीत येत आणि आमची व्यवस्था झाल्यावर कडेच्या पानावर बसत. साहेबांकडे येणा-या लोकांच्या प्रश्नांची, त्यांच्या वृत्तींची, सा-यांची जाणीव असलेले ते एक खास सचिव होते.
साहेबांबरोबर असलेली ही माझी जवळीक त्यांनी आणखी एका गोष्टीतून वाढवीत नेली. ती गोष्ट म्हणजे माझी इच्छा नसताना त्यांनी मला त्यांच्या आवडत्या देवस्थानच्या जीर्णोद्धाराच्या प्रयत्नात सामावून घेतले. त्यासंबंधात त्यांनी लिहिलेले एक पत्र अत्यंत आपुलकीने ओथंबलेले आहे. ते वाचून ‘‘आपण म्हणता तर हे काम पुरे झाले असे समजावे.’’ या शब्दातच मी माझी मान्यता कळवून टाकली. ते काम पुरे झाले, उत्तम रीतीने पार पडले याबद्दल त्यांना झालेला आनंद त्यांनी अनेकदा व्यक्त केला.