११२ - वैचारिक जडणघडण – श्री. द्वा. भ. कर्णिक
यशवंतराव चव्हाण ज्या काळात उमेदीने पुढे आले त्या काळात विचारमंथनाने शीग गाठली होती आणि प्रत्यक्ष क्रांतिकार्यालाही उधाण आले होते. त्या काळाचा विचार मनात आला की, वाटते केवढे प्रबळ विचारस्त्रोत तरूण मनाला मोहिनी घालण्यासाठी उगम पावले होते. गांधीवादी सत्याग्रह हा राष्ट्रवादी उद्रेकातील एक अभूतपूर्व पवित्रा होता. त्याच्या पूर्वीच १९१७ साली रशियन राज्यक्रांतीने सा-या जगाला हादरवून सोडले होते. त्या क्रांतीची परिणती म्हणून समाजवादी विचारसरणीचे एक नवे दालन जवाहरलाल नेहरू यांनी खुले केले होते. त्या तत्त्वप्रणालीचा विकास होत असतानाच स्वातंत्र्ययुद्धात प्रत्यक्षपणे पदार्पण करण्यासाठी एम. एन. रॉय यांनी भारतात अनपेक्षितपणे प्रवेश करून कम्युनिझमचा व्यवहार्य मार्ग दाखवून आणि त्यातून ब्रिटिश राज्यसत्तेला कसा शह देता येईल याचे बौद्धिक आपल्या अनुयायांना शिकविण्याचा पवित्रा टाकला. संस्कारक्षम यशवंतरावांना त्यातून क्रांतिकारक चळवळीबद्दलची एक नवी दिशा मिळाली. पुढील काळात यशवंतराव चव्हाण हे रॉयवाद्यांचे सहयात्रिक राहिले नाहीत, पण रॉय यांच्या ऋणाचा त्यांना कधीही विसर पडला नाही हे लक्षात ठेवण्यासारखे आहे.
यशवंतराव चव्हाण यांनी जे जे विचार ग्रहण केले ते ते प्रत्यक्ष कार्यातून जनतेच्या कसे उपयोगी पडेल या दृष्टीने त्यांनी आपल्या ध्येयधोरणाची आखणी केली. त्यांचे विचारग्रहण परांङ्पंडितांचे नव्हते. ते क्रियावान कर्तृत्वपूर्ण जसे आंदोलक तसेच आंदोलकाचे नेतेही होते. शिवाय जन्मजात दारिद्र्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असल्यामुळे समाजातील दुर्बल घटकांकडे साहजिकच त्यांचा कल झुकलेला असे. गांधीजींनी दरिद्रीनारायणाची सेवा करण्याचे जे व्रत अंगीकारले होते तिला नेहरूंनी समाजवादी निष्ठेची धार दिली. यशवंतरावजींनी त्यात आणखी भर टाकली ती ही की जोतिबा फुले व शाहू महाराज, विठ्ठलरामजी शिंदे आणि भाऊराव पाटील यांच्यापासून स्पूâर्ती घेऊन पददलित जनतेच्या शिक्षणासाठी व संवर्धनासाठी प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत सर्व प्रकारच्या शिक्षणाचे लोण खेड्यातील सामान्य आणि दरिद्री जनतेपर्यंत पोचविले. विशिष्ट किमान उत्पन्न असणा-या कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्याचा पायंडा पाडण्यात यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यच आघाडीवर राहिले, हे कोणालाही विसरून चालणार नाही. त्यांच्याच प्रेरणेने सहकारी साखर व इतर कारखाने जसे उभे राहिले त्याचप्रमाणे जिल्हा परिषदांच्यातर्फे विकेंद्रीकरणाची योजनाही साकार झाली. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या वैचारिक प्रज्ञेचा जो तेजस्वी साक्षात्कार प्रगट केला तो नवबौद्धांना, अस्पृश्य समाजाला मिळणा-या सा-या सवलतींची व अधिकारांची ग्वाही देण्यात सा-या देशात अग्रस्थान पटकावून होय. चव्हाण यांचे असामान्य वैशिष्ट्य होते ते हे की, दलितांच्या भावभावनांशी ते परिपूर्णपणे समरस झाले होते. त्याबद्दलचे एक उदाहरण देता येईल. ते असे की काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र टाईम्सच्या रविवारच्या आवृत्तीत श्री.शंकर सारडा यांनी परिश्रमपूर्वक नवोदित दलित कवींच्या कविता जमा करून त्यांना डोळे दिपवून टाकणारी प्रसिद्धी दिली व त्यावर साधकबाधक दोन लेखही छापले. यशवंतराव चव्हाण यांना ती कल्पना इतकी आवडली की, संरक्षणमंत्रीपदाची बोजड जबाबदारी सांभाळीत असतानाही त्यांनी दिल्लीहून पत्र पाठवून या उपक्रमाचे कौतुक केले आणि दलित कवींच्या भावना याच वेळी प्रथम आपल्या निदर्शनास आणण्यात आल्या अशीही कबुली दिली.
यशवंतराव चव्हाण यांच्या वैचारिक जडणघडणीत डॉ.आंबेडकर यांनाही महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले असले तर त्यात नवल नाही. आंबेडकर हे घटनाकार तर खरेच, पण एका पददलित आणि छळवाद सोसणा-या समाजात स्वाभिमानाची ज्योत पेटविण्यात आणि त्याला माणुसकीचे हक्क संपादन करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आंबेडकर यांनी जी कामगिरी बजाविली तिच्याबद्दल चव्हाण यांच्या मनात नितांत आदर आणि कौतुक असे. त्या आदराच्या पोटीच नवबौद्धांना न्याय देण्यासाठी ते प्रवृत्त झाले आणि खुद्द केंद्रीय सरकार वा इतर प्रदेश राज्ये यांची तमा न बाळगता त्यांनी एकट्याने नवबौद्धांचे जन्मजात हक्क त्यांच्यापासून हिरावून घेतले जाणार नाहीत याबद्दल खबरदारी घेतली. अस्पृश्य समाजाला, दलितांना आणि दलित पँथर्सना सुद्धा यशवंतरावांच्याबद्दल आपुलकीची भावना वाटते. त्याच्या मुळाशी त्यांची मानवताप्रेरित वैचारिक जडणघडणच आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्या वैचारिक जडणघडणीचा विचार करताना एक गोष्ट ठामपणे दिसून येते आणि ती ही की, नेहरूंच्याप्रमाणेच समाजवादाकडे कल असूनही चव्हाण हे राष्ट्रवादी प्रवाहापासून कधीही दूर झाले नाहीत. रॉय यांच्याशी त्यांची जी फारकत झाली ती याच कारणामुळे होय. कारण दुस-या महायुद्धाच्या बाबतीत रॉय यांनी जो पवित्रा घेतला तो यशवंतरावांना राष्ट्रवादी प्रवाहाशी विसंगत असा वाटला आणि म्हणूनच युद्धसहकार्याच्या रॉय यांच्या भूमिकेला जाहीरपणे विरोध करून त्यांनी गांधीजींच्या ‘‘चलेजाव’’ आंदोलनात हिरीरीने उडी घेतली. नेहरू व चव्हाण यांच्यामध्ये जी वैचारिक समरसता दिसून आली ती ही की, समाजवादाबद्दलचा आग्रह धरताना दोघांनीही गांधीजींचे नेतृत्व कधीही अमान्य केले नाही. सत्याग्रही समाजवादी आणि प्रगतशील लोकशाहीवादी असे चव्हाण यांच्या वैचारिक जडणघडणीचे यथार्थ वर्णन करता येईल.