मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ८२

८२. यशवंतराव, आम्हा कार्यकर्त्यांचे एक प्रेरणास्थान! - बंडोपंत सरपोतदार

यशवंतरावांबरोबर माझा प्रथम परिचय १९४६ साली ते त्या वेळच्या मुंबई प्रांतिक कायदेमंडळावर (लजिस्लेटीव्ह असेंब्ली) निवडून आले तेव्हापासूनचा ! त्या वेळी आमच्या पूना गेस्टहाऊसकडे असेंब्लीचे पावसाळी अधिवेशनाचे पुण्याचे काम होते. कै. यशवंतराव त्या वेळी पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून काम पाहात असत. त्यांच्याकडे गृहखाते असल्यामुळे त्यांना भोजन—चहा—फराळ यासाठी वेळच मिळत नव्हता. अशा वेळी आम्ही दोघांचे एक परिचित व त्या काळी आमदार झालेले कै. वसंतराव नाईक (नाशिक) ह्यांनी हा परिचय करून दिला व ही अडचण मला सांगितली. अर्थात मी त्याच्यासाठी भोजन—चहा—फराळ यासाठी एका नोकराची खास नेमणूक करून ही अडचण निवारली, पण त्या काळी यशवंतराव प्रतिदिनी जवळजवळ १६ ते १८ तास सतत कार्यमग्न असत. त्यात पुन्हा श्री. मा. मोरारजी भाई देसाई यांचे संसदीय सचीव असल्यामुळे सारखे दौरेही करावे लागत असत, परंतु यशवंतराव कधीही दमले भागलेले वगैरे वाटत नसत. वास्तविक त्याआधी त्यांनी १९४२ च्या लढ्यात भाग घेऊन ‘भूमिगत’ राहून जवळजवळ चार वर्षे वनवास, उपास, पळापळ असे कष्टाचे आयुष्य काढले होते. त्यांना शासकीय कामाची माहितीही नव्हती, पण जिद्दीने त्यांनी त्या कामाचा अभ्यास व्हावा, अनुभव मिळावा याच उद्देशाने हे काम स्वीकारले होते. त्यानंतर ते १९५० साली प्रथम मंत्री झाले. पुढे १९५२ साली प्रांताचे मुख्यमंत्रीही झाले.

पुढे १९६२ साली ते भारताचे संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीस आल्यावर मग माझा त्यांचेशी पुन्हा संबंध आला.

पहिली काही वर्षे ते खूप कामात असल्यामुळे आमच्या गाठीभेटी फारशा होत नसत. पण १९६४ नंतर मात्र त्यांच्याकडे सल्ल्यासाठी विचारविनिमयासाठी मी सतत जात असे. दरवेळी ते मला दिल्लीतील मराठी मंडळींच्या कार्यक्रमांविषयी माहिती विचारत असत. तसेच घरी आलेल्या मराठी मंडळींचा माझा परिचय करून देत असत. याच वेळी एकदा महाराष्ट्राला दिल्लीविषयी निरनिराळी माहिती करून देण्यासाठी एखाद्या वृत्तपत्राची कल्पना निघाली. मी त्यांना एका मासिक पत्रिकेची माझी कल्पना सांगितली. त्यांनी त्वरित ती काढण्याबद्दल मला सर्व बाबतीत मदत देऊ केली आणि त्यातूनच आमची ‘दिल्ली दरवाजा’ मासिकपत्रिकेचा जन्म झाला.

पुढे १९६८ साली आम्ही ‘श्रीगणपती महोत्सव’ दिल्लीत अभिनव पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले व तसाच मोठ्या धडाक्याने साजराही केला. त्याबाबतचे प्रमुख पाठबळ यशवंतराव यांच्या आश्वासक साहाय्याचे असे.

माझ्या दिल्लीतील सर्व कार्याचे (सिनेमा महोत्सव, संगीत—नाटक महोत्सव) प्रमुख—केंद्र यशवंतरावांचे वडिलधारे प्रेरक—आशास्थान असे.त्यांनी एकदा आपली कल्पना व कार्यक्रम मान्य केला की निश्चित तो यशस्वी होणार याची आम्हाला खात्री असे. त्याबाबत आमच्याशी ते इतक्या सूक्ष्म चर्चा करीत की त्यातून जो कार्यक्रम ठरे तो यशस्वी होईलच असे त्यांनाही वाटत असणारच.

१९८३ साली सौ. वेणूतार्इंच्या निधनानंतर मात्र ते अत्यंत दु:खी, उदास झाले. त्यानंतरच्या त्यांच्या भेटी अत्यंत उदासवाण्या भासू लागल्या. शेवटी दिनांक २८ नोव्हेंबर १९८४ रोजी त्यांच्या अकस्मित मृत्यूने आमचा हा दीर्घ सहवास संपला. यशवंतराव हे आम्हा कार्यकर्त्याना नेहमीच एक वडिलधारे आशास्थान वाटत आहे.

यशवंतराव चव्हाण केवळ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकारच नव्हते तर त्यांनी लोकशाही समाजवादाने भारताला लोकशाही व समाजवादाचा योग्य मार्ग दाखविला. माक्र्स, लेनिन, मानवेंद्रनाथ रॉय, बार ट्रॅन्ड रसेल, महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांचे विचार, व्यक्तिमत्त्व व कार्य यातून यशवंतरावांच्या विचारांना दिशा मिळाली. परंतु त्यांचा समाजवाद भारताचा ग्रामीण भागातील लाखो लोकांच्या दारिद्र्य व दु:खातून उदयास आला आणि ते स्वत:ही अशाच सामान्य कुटुंबात जन्मले व वाढले.