मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ८४

८४.  पुणेकरांना हे आवडणार नाही – वसंत थोरात

१९७५ मध्ये टिळक पुण्यतिथीनिमित टिळक स्मारक मंदिरात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींचे व्याख्यान होते. अध्यक्ष होते यशवंतराव चव्हाण. मी त्या वर्षी महापौर होतो म्हणून माझी खुर्ची साहेबांच्या शेजारी मांडली होती. अध्यक्ष असूनही साहेबांनी आधी भाषण केले. ते म्हणाले, ‘‘आपण सर्वजण तर्कतीर्थांचे भाषण ऐकण्यासाठी जमलेलो आहोत. त्यांचा मोठेपणा लक्षात घेऊन मी माझे भाषण आधी करतो.’’ भाषण ऐकताना साहेबांनी आपले बूट काढून ठेवले होते. भाषण संपवून ते अनवाणीच खुर्चीपाशी आले. ही गोष्ट लक्षात येताच मी माईकजवळ जाऊन त्यांचे बूट आणून दिले. समारंभ संपवून गाडीत बसल्यावर ते मला म्हणाले, ‘‘वसंतराव, तुझे-माझे संबंध काहीही असले तरी बूट उचलायला नको होते. असे करता कामा नये.’’

मी म्हणालो, ‘‘साहेब तुमच्याबद्दल आम्हाला इतका आदर आहे की तुमचे बूट उचलण्यात मला कमीपणा वाटत नाही. उलट आदर वाटतो.’’

ते म्हणाले, ‘‘तरीही मला हे आवडलेले नाही. तू महापौर आहेस, लोकांच्या समोर असे वागायला नको होते. आपला महापौर मंत्र्यांचे बूट उचलतो हे पुणेकरांना मुळीच आवडणार नाही. सार्वजनिक जीवनात या गोष्टींचे भान राखत जा.’’