पुढे दोन तासांनी, अन्य ठिकाणे पाहत-पाहत आम्ही, उत्तरेला असलेल्या फामागुस्ता या ठिकाणी पोहोचलो. फामागुस्ता हे बंदर असून, तिथे ग्रीक व टर्किश असे दोन्ही जमातींचे स्वतंत्र भाग आहेत. आम्ही टर्किश वस्तीत एक मशीद पाहण्यास गेलो. या मशिदीचे शिल्प मला चर्चसारखे दिसले. बाकी सर्व भाग चर्चसारखा आणि मध्येच एक मिनार अशी ही इमारत पाहून बरोबरीच्या स्त्रीकडे चौकशी केली, तेव्हा तिने जे सांगितले, त्याने मला आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. ती म्हणाली, ‘पूर्वी हे चर्च होते. इस्लाम धर्म येथे आला, तेव्हा त्यांनी चर्चची मशीद बनविली. इमारत तीच, फक्त एक मिनार उभारला. बस्स ! चर्चची मशीद बनली!’
या सर्व प्रकारावर आमची चर्चा सुरू असताना त्या स्त्रीने जे उद्गार काढले, ते मी माझ्याजवळ नोंद करून ठेवले आहेत.
‘धर्माच्या नावाखाली मानव किती शतकांपासून हा अन्याय सहन करीत आहे!’ असा तिचा सवाल होता आणि ‘मानवाचे ते दुःख अजूनही संपलेलं नाही.’ असा उत्तरार्ध तिने केला.
माझ्या मनात तिचे शब्द कोरले गेले. सगळ्याच धर्मांचे हे असे आहे का? असा प्रश्न मी मग माझ्याच मनाला विचारला. सायप्रसमध्ये धार्मिक निष्ठेतून करण्यात आलेला विध्वंस मी नव्याने पाहत होतो; परंतु भारतात घडून गेलेले असे कितीतरी विध्वंस मी त्याअगोदर पाहिले होते. अशा स्थितीत त्या स्त्रीच्या सवालाला मी काय उत्तर देणार ! ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम जेथून निघाला, तेथून त्यांनी आपल्या बरोबर आपली राज्येही जगभर नेली आणि जेथे गेले, तेथील पूर्वीच्या राज्यांचा, त्यांच्या धार्मिक प्रतीकांचा उच्छेद केला, हा इतिहास आहे. युरोपात तर धर्माच्या नावाखाली अनन्वित अत्याचार झाल्याच्या साक्षी आहेत.
फामागुस्ता (Famagusta) या बंदराची आणखी एक निशाणी माझ्या मनात राहिली. या बंदराला तटबंदी आहे आणि तटबंदीवर ‘ऑथेल्लो टॉवर’ या नावाचा टॉवर आहे. शेक्सपिअरच्या ‘ऑथेल्लो’ या प्रसिद्ध नाटकाची पार्श्वभूमी म्हणजे हा टॉवर होय. शेक्सपिअरच्या ‘ऑथेल्लो’ मधील तो कृष्णवर्णी सरदार की, ज्याला त्याची गोरी प्रियकरीण, पत्नी डेस्डिमोनाबद्दल संशय आला आणि म्हणून त्याने या टॉवरवर तिचा गळा दाबून खून केला ! त्या घटनेची आठवण करून देणारा हा टॉवर तिथे उभा आहे. ‘ऑथेल्लो टॉवर’ हे त्याचे नाव.
टॉवरच्या समोर प्रचंड सागर आहे. पर्वतप्राय लाटा सागरात उसळत असतात. तो सारखा खळाळत असतो. टॉवरवर डेस्डिमोनाचा गळा दाबून तिच्याच प्रियकराने केलेल्या खुनाचे प्रतीक अणि तो खळाळणारा सागर यांचे तेथील चमत्कारिक मिश्रण काही वेगळेच सांगून जाते. सायप्रसमधील धर्माची संकटे, चर्च, मशिदी येतील-जातील; पण प्रीती आणि असूया या मानवी चिंरतन भावनांचा संघर्ष पाहिलेला साक्षीदार हा टॉवर तेथे मुक्काम करूनच उभा आहे. येथील सागरही असूयेतून घडलेल्या अनेकानेक घटनांचा साक्षीदार आहे. धर्माची असूयाही त्याने पाहिली आणि डेस्डिमोनाचा गळा दाबून तिला निष्प्राण करणारी प्रीतीची असूयाही पाहिली. हा टॉवर आणि समोर खळाळणारा सागर यांच्याकडे आळीपाळीने पाहिले, तेव्हा ते दोघेही एकमेकांकडे पाहून असूयेने विकट हास्य करीत आहेत, असे मला भासले.
सायप्रसमध्ये असे काही गंभीर पाहिले; परंतु मनात निर्माण झालेले गांभीर्य बाजूला करणारे, आनंदाने, भरलेले एक दृश्यही याच दौर्यात मला पाहायला मिळाले. हजारो माणसे आनंदाने, मोकळ्या मनाने जल्लोश करीत आहेत. स्वानंदात मग्न आहेत, असे होते ते दृश्य.
सर्व ग्रीक लोक सप्टेंबरच्या १२ ते २० तारखांच्या आठ दिवसांत ‘वाईन फेस्टिव्हल’- मदिरोत्सव साजरा करतात. सायप्रसच्या दक्षिणेला ‘लिमासिल’ नावाचे एक प्रसिद्ध बंदर आहे, ते पाहायला गेलो होतो, तेव्हा मदिरोत्सव सुरू झाला होता. तरुण स्त्री-पुरुष, मध्यम वयाची माणसे उत्तम पोशाख करून या उत्सवासाठी आलेली असतात. हे सर्वजण मनमुराद मदिरापान करतात. नाचतात, बागडतात, हसतात. मोकळेपणाने आनंदीआनंद करतात. पण तिथे कसला बीभत्सपणा आढळत नाही. हे सारे जण आपल्याच नशेत काहीसे रममाण झालेले मला दिसले. समाजाने कधी तरी एकदा मोकळे बनून सामुदायिक आनंदोत्सव साजरा करण्याचा, खळखळून हसण्याचा हा उत्सव वर्षांतून आठ दिवस होत असतो. सायप्रसमधील ग्रीक लोकांची ही जत्रा मला काहीशी वेगळीच वाटली. भारतातील अनेक जत्रा मी पाहिल्या आहेत, तरुण वयात या जत्रेत हिंडलोही आहे; पण हा मदिरोत्सव आणि तोही सामुदायिक, शेकडो, हजारो लोक एकत्र येऊन यथेच्छ मदिरापान करीत आहेत, मोकळेपणाने हसत आहेत, आनंद करीत आहेत, हे दृश्य मला नवीन होते.