शब्दाचे सामर्थ्य १६८

५७

आज आणि उद्या

आजचा दिवस हा हिंदुस्थानच्या स्मृतीत अमर होऊन इतिहासात सोन्याचा दिवस ठरला आहे. आजच्या या दिवसाला तसाच अभिमानास्पद इतिहासही आहे. हा दिवस उगीच एकाएकी आणि अकस्मात आलेला दिवस नाही. गेल्या काही दिवसांच्या अविश्रांत श्रमांचे, त्यागाचे आणि अढळ श्रद्धेचे मधुर असे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे आजचा दिवस आहे. या 'आज' चा भूतकाळ जितका तेजस्वी आहे, तसाच त्याचा भविष्यकाळही उज्ज्वल आहे. परंतु तो भविष्यकाळही आपोआप येणार नाही. ज्या निष्ठेने हा दिवस उजाडावा, म्हणून रखडावे-झगडावे लागले, त्याच निष्ठेने या देशाला अजून काही वर्षे विधायक स्वरूपाचे प्रयत्‍न करावे लागणार आहेत.

या विधायक प्रयत्‍नांचे स्वरूप कोणते राहील. असा स्वाभाविक प्रश्न पुढे उभा राहतो, अणि त्याचाच विचार आपणांस करावा लागणार आहे. या देशात परसत्तेचे साम्राज्यशाही स्वरूपाचे अधिराज्य होते, ते नाहीसे करून राष्ट्रवादी लोकसत्ता या देशात स्थापावी, या एकाच सूत्रावर भर देऊन गेल्या पासष्ट वर्षांत या देशाने विराट स्वरूपाचे जागतिक प्रयत्‍न केले. हे प्रयत्‍न करीत असता काही वैचारिक व भावनात्मक श्रद्धा आपण देशात निर्माण केल्या होत्या. अखंड भारताची श्रद्धा ही त्यापैकीच एक होती. देशाच्या फाळणीच्या योजनेने या श्रद्धेस धक्का दिल्यामुळे थोडासा गोंधळ व किंचितशी उदासीनता निर्माण झाली आहे. ही गोष्ट खरी. परंतु नवीन इतिहास निर्माण करण्यासाठी बाहेर पडलेल्या राष्ट्राने अशा धक्क्याने गोंधळून जाऊन किंवा उदास होऊन चालणार नाही. हे शोकपर्व केव्हातरी संपविलेच पाहिजे आणि बदलत्या कालानुसार नवीन श्रद्धा निर्माण करण्यासाठी प्रयत्‍नांची पराकाष्ठा केली पाहिजे.

राष्ट्रीय उत्थापनाच्या या इतिहासात आपण जशा काही श्रद्धा उत्पन्न केल्या, तशी काही अस्त्रेही निर्माण केली आहेत. 'काँग्रेस संघटना' हे जनतेचे असेच एक महान अस्त्र आहे. जनतेने आपले सर्वस्व वाहून या अस्त्राचे सामर्थ्य वाढविले व टिकविले आहे. राष्ट्रीय सरकार प्रस्थापित झाल्यानंतर या अस्त्राचे कार्य संपते, असा लोकभ्रम काही पंडित निर्माण करू पाहत आहेत. माझ्या मते ती एक भयंकर चूक किंवा लबाडी आहे. ब्रिटिश सत्ता या देशातून गेल्यानंतर ते स्वतंत्र सरकार या देशात स्थापन होत आहे, त्याचे स्वरूप काय आहे, ते आपण समजून घेतले पाहिजे. ब्रिटीश सत्ता येथे येण्यापूर्वी ज्या प्रकारची स्वतंत्रता या देशात होती, त्या प्रकारची स्वतंत्रता आता या देशात आलेली नाही किंवा आपणांस आणावयाचीही नाही.