शब्दाचे सामर्थ्य १६६

वरील विवेचनात 'प्रेरणा' (urges) हा शब्द मी हेतुतः वापरीत आहे. 'भावना' असा शब्द मी येथे योजीत नाही. 'भावना' ही महत्त्वाची गोष्ट आहे. मानवी स्वास्थ्य, संरक्षण व विकास यांच्याशी भावनांचा संबंध निकटचा आहे. परंतु 'प्रेरणा' हा शब्द त्यापेक्षा वेगळा आहे. जगण्याशी, जीवनाशी, कृतीशी, कृतीच्या उद्दिष्टांशी व ध्येयपूर्ततेशी, त्याच्या ब-या - वाईट परिणामांशी 'प्रेरणा' चा संबंध पोचतो, असे मला वाटते; आणि त्या तशा विशिष्ट अर्थाने या ठिकाणी 'प्रेरणा' हा शब्द मी योजीत आहे. असो.

मला भेटणा-या मंडळींच्या मनोरचनेत सध्या मला जो फरक जाणवत आहे. त्याबद्दल मी सांगत होतो. भारतात व महाराष्ट्रात सध्या ज्या नव्या प्रेरणा निर्माण झाल्या आहेत, त्यांच्याशी समरस होणारी व त्या प्रेरणांना प्रतिसाद देण्यासाठी उत्सुक असणारी माणसे वाढत्या संख्येने मला भेटत आहेत. आणि त्या वेळी मजजवळ बोलताना ते जी भाषा वापरत आहेत, तीही पूर्वीपेक्षा कितीतरी वेगळी असते, असा माझा अनुभव आहे.

महाराष्ट्रात आपण यंदापासून पंचायत-राज्याचा प्रयोग सुरू केला असल्याने ग्रामीण भागातही वेगळी अस्मिता निर्माण झाली आहे. नव्या जबाबदारीची जाणीवही तेथे निर्माण झाली आहे. ही जबाबदारी किती अवघड व सर्वगामी आहे, हे वारंवार समजून देण्यासंबंधी मी व माझे सहकारी जास्तीत जास्त प्रयत्‍न करीत आहोत. अनेक पत्रकारांनी, समाजातील विचारवंतांनी व जबाबदार नागरिकांनी याबद्दल योग्य शब्दांत आपले विचार मांडले आहेत. परंतु हे करीत असताना ग्रामीण भागातील नवनिर्मित आकांक्षांना, उमाअना किंवा प्रेरणांना धक्का लागता कामा नये, अशी सावधगिरी बाळगली पाहिजे. 'तुम्हांला पेलण्यासारखे नाही, इतके हे जबाबदारीचे ओझे फार मोठे आहे', असे प्रत्येकजण जर सांगायला लागला, तर ग्रामीण विभागातील आपले बांधव खचून जाण्यास उशीर लागणार नाही.

म्हणून जपायचे आहे, ते प्रेरणांना - महाराष्ट्राच्या सर्व थरांत निर्माण झालेल्या विकासाच्या व नवनिर्मितीच्या नाजूक प्रेरणांना. या नव्या प्रेरणा हेच महाराष्ट्राचे आजचे बल आहे; आजची धनदौलत आहे. समाजमानसात निर्माण होणा-या या प्रेरणा नाजूक असतात; त्यामुळे त्यांची प्रसन्नता व शुद्धता प्रयत्‍नपूर्वक मुद्दाम टिकवावी लागते. कारण शुद्ध प्रेरणांची शक्तीही अफाट असते. तळहातावर शिर घेऊन या प्रेरणाच निधड्या छातीने शत्रूशी लढतात; साधनांच्या अपुरेपणाची तमा न बाळगता या प्रेरणाच रात्रंदिन काबाडकष्ट करू शकतात. संशोधकांच्या प्रयोगशाळेत या प्रेरणाच त्याची साथ करतात अन् त्याला अवचितपणे नवा शोध हस्तगत करून देतात. प्रतिभाशाली साहित्यिकांच्या व कलावंतांच्या हृदयांत या प्रेरणा, स्फूर्तीचा दीप केव्हा प्रज्वलित करतात, याचा तर नेमच नसतो.

या प्रेरणा कुठे नसतात ? सर्वत्र असतात. जेथे जेथे ईर्ष्या आहे, भावना आहे, श्रद्धा आहे, आनंद आहे, तेथे तेथे या प्रेरणा नवे व अद्‍भुत सामर्थ्य निर्माण करतात. मानवाच्या पुरुषार्थाला चालना देतात, नवनिर्मितीला बहर आणतात.