शब्दाचे सामर्थ्य १६७

मला भेटणारे मराठी बांधव प्रतिदिनी माझ्याकडे नवमहाराष्ट्राच्या या नव्या प्रेरणा घेऊन येत असतात. विजयादशमीच्या दिवशी जसे सोने घेऊन मंडळी येतात, तसे जणू दररोज घडत असते. मला वाटते, जसे ते मला थोडे देतात, तसे मी पण त्यांना देतो. ज्ञान जसे देऊन संपत नाही, तसे त्या प्रेरणांचे होते. एखादे सुंदर चित्र चुकीच्या पर्स्पेक्टिव्हमधून जो पाहतो, त्याच्या पदरी दुर्देवाने निराशा येते. 'हे कसले सुंदर चित्र? यामुळे तुम्हांला कसली स्फूर्ती मिळते ?' असे तो म्हणतो. याच न्यायाने आजही महाराष्ट्रात व देशात जे घडत आहे, त्याची वेगळी बाजूच जो पाहील, त्याच्या हृदयात कोठून नव्या प्रेरणांचा जन्म होणार ? तो म्हणणार की, भारतात व महाराष्ट्रात काहीच चांगले घडत नाही. परंतु आपल्या सुदैवाने असा निराशवादी दृष्टिकोन घेणारी माणसे आपल्या देशात फार कमी आहेत.

आपल्या महाराष्ट्रापुरतेच बोलायचे, तर गेल्या वर्षभरापासून सर्व पक्षांच्या व विचारसरणींच्या मंडळींनी महाराष्ट्रविकासाच्या नव्या प्रेरणांना साथ देण्यास सुरुवात केली आहे. पक्षीय दृष्टिकोन म्हणून काही वेगळेपणा किंवा अलगपणा क्वचित दिसतो; पण त्याबद्दल मी तक्रार करणार नाही. मुख्य प्रश्न आहे, तो समान प्रेरणांचे नेतृत्व मान्य करण्याचा; 'आपला महाराष्ट्र आपल्याला कोणत्या दिशेने न्यावयाचा आहे?' याबद्दलचा उत्साह, ईर्ष्या सर्वांजवळ असण्याचा. चळवळ करून एकसंध महाराष्ट्र निर्माण करण्यापाठीमागे काही प्रेरणा होत्या. त्या वेळी त्या काही प्रमाणात अस्पष्ट होत्या; परंतु महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर या प्रेरणा व काही इतर प्रेरणा प्रभावी व सुस्पष्ट झाल्या आहेत. या सर्व प्रेरणा लोकांच्या अंतःकरणांत व हृदयांत मूळ धरू लागल्या आहेत; शब्दांतून व्यक्त होऊ लागल्या आहेत; प्रयत्‍नांतून व धडपडीतून आकार धारण करू लागल्या आहेत.

भाग्याची गोष्ट अशी की, जी अनेक मंडळी मला भेटतात, त्यांच्या नजरेपुढे काही ना काही स्वप्ने तरळताना मला दिसतात. काहीतरी नवे करून दाखविण्याची त्यांची तळमळ हाच नवमहाराष्ट्राचा आधार आहे. सर्वांची सर्वच स्वप्ने साकार होण्याचा संभव नसतो; त्यांतील काही स्वप्ने आपल्या नव्या प्रेरणांशी सुसंवादी अशीही नसतात. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी की, त्यांच्या मनापुढे काही स्वप्ने उभी असतात. कोणी नोकरी सोडून देऊन आपल्या पायांवर नवा कारखाना काढण्याच्या उद्योगात आपण असल्याचे मला सांगतो. मागासलेल्या विभागात नवी शाळा काढण्याची योजना दुसरा समजावून देत असतो. शेतीच्या उत्पादनातील नवी पद्धती शोधून काढल्याचे तिसरा अभिमानपूर्वक सांगत असतो. परदेशी मालाच्या तोडीचा विशिष्ट माल येथे तयार करण्याची सर्व सिद्धता झाल्याचे चौथा सांगत असतो. अशा अनेकविध नवनव्या गोष्टी करण्यासाठी आतुर झालेली माणसे मला भेटतात, तेव्हा माझा उत्साह शतगुणित होतो, यात काय नवल?

अर्थात महाराष्ट्रापुढे आजही अडचणी उभ्या नाहीत, असे नाही. भारतापुढेही व प्रत्येक राज्यापुढेही अनेक अडचणी आहेत. पंरतु चढावाचा रस्ताच आपण सांप्रत चालत आहोत. मग हा रस्ता सोपा कसा असणार ? अडचणी, संकटे, निराशा यांना तोंड देऊनच हा रस्ता आक्रमावा लागणार आहे. देशाच्या सीमा आज धोक्यात आहेत; विविध भाषकांतील बंधुभाव वाढविण्याची तातडीची गरज आहे; जातीयवादासारख्या संकुचित प्रवृत्तींना मूठमाती द्यावयाची आहे; औद्योगिकीकरणाची व शेती - उत्पादनाची गती वाढवावयाची आहे. या अशा वेळी आपला उत्साह व आपली श्रद्धा जर कोणी टिकविणार असेल, तर त्या म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या हृदयातील नवनिर्मितीच्या मंगल प्रेरणाच होत. या मंगल प्रेरणाच नवनिर्मितीचा आपला ध्यास कायम राखतील. अडचणी किंवा मतभेद निर्माण झाले, तर त्या प्रसंगी, व्यापक संदर्भ न विसरता चातुर्याने व खेळीमेळीने कसे वागावयाचे, हे प्रेरणाच आपल्याला सांगतील. म्हणून मी सर्वांना एवढीच प्रार्थना करीन की, नवमहाराष्ट्र - निर्मितीमुळे निर्माण झालेल्या प्रेरणांचे मांगल्य असेच टिकवा व वाढवा.