शब्दाचे सामर्थ्य १३४

४४

विठ्ठलराव विखे पाटील

श्री. विठ्ठलराव विखे पाटील यांचे चरित्र म्हणजे ग्रामीण नेतृत्वाची जडण-घडण कशी व्हावी, याचे एक प्रात्यक्षिकच आहे, असे म्हटले, तरी चालेल. विखे पाटील यांच्या जीवनाची चार वेगवेगळी पर्वे आहेत, असे दिसते; व जशी ती कालदर्शक आहेत, तशीच ती विखे पाटील यांच्या कार्यप्रणालीच्या विकासाची द्योतक आहेत. पहिला सहकारी साखर कारखाना काढणारे म्हणून विखे पाटील यांचे कार्य मोठे, हे एका अर्थाने खरे असले, तरी त्यांच्या चरित्राचे सर्व वैशिष्ट्य यातच नाही. ग्रामीण नेतृत्वाचे एक प्रातिनिधिक व्यक्तिमत्त्व या दृष्टीने जर त्यांचे जीवनचरित्र समजावून घेण्याचा प्रयत्‍न केला, तर त्यात अनेकविध सूत्रे पाहण्यास मिळतील. पंडित नेहरूंच्या हजेरीत लोणी येथे १९६१ साली मी एक भाषण केलेले होते. त्या भाषणात जो विचार मी मांडला होता, तोच या लेखात उद्‍धृत करू इच्छितो.

'लहान लहान माणसे काय काम करतात, त्याकडे हिमालयाएवढे उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या थोर माणसांचेही लक्ष असते, ते आज आपणांस कळून आले असेलच आणि लोकशाहीत हाच खरा आनंद आहे. महाराष्ट्रात छोट्या नद्या, छोटी शेते, डोंगराळ जमीन व छोटी माणसे आहेत; पण ही माणसे प्रामाणिक व कष्टाळू आहेत. विशिष्ट क्षेत्रात आमचा छोटा शेतकरी संघटितपणे मोठी कामे करू शकतो, ही येथील परंपरा आहे.'

या भाषणातील विचाराचे सूत्र हेच या लेखाच्या विवेचनाचेही मुख्य सूत्र राहील.

एका लहानशा गावातील थोडी-फार शेती असलेल्या छोट्या शेतक-याचा हा मुलगा. १९२० ते ३० च्या दरम्यान महाराष्ट्रात व भारतात जी परिस्थिती होती व प्रेरणा काम करीत होत्या, त्या प्रेरणांशी समरस होण्याइतकी मानसिक शक्ती शिक्षणाशिवायही विखे पाटलांमध्ये पाहण्यास सापडते. ग्रामीण भागात, विशेषतः शेतीच्या धंद्यात, एक विलक्षण संकटाची स्थिती निर्माण झालेला तो काळ होता. कर्जबाजारीपणा व त्यातून निर्माण होणारी दैन्यदुर्दशा यांच्या कचाट्यात महाराष्ट्र किंबहुना भारताचा शेतकरी सापडला होता, असे म्हटले, तर ते चूक होणार नाही. अशा कठीण परिस्थितीचा गैरफायदा घेणारी सावकारशाही व नोकरशाही यांचा खेळ स्वाभाविकपणे अनिर्बन्धपणे चालू होता. अशा काळात व वातावरणात विखे पाटील वयात आले व त्यांच्या कुटुंबाचे कर्तेपणही त्यांच्याकडे आले. समाजाच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालण्यापूर्वी स्वतःच्या संसाराचे प्रश्न हाताळत असताना त्या तरुण वयातही त्यांनी भोवतालच्या परिस्थितीची जी समज दाखविली आणि अचूक निर्णय घेण्याची जी शक्ती दाखविली, ती तगाईच्या कर्जाची तहकुबी मिळण्याची शक्यता असतानाही आपला कर्जाचा हप्ता भरल्याशिवाय अन्न घेणार नाही, अशी प्रतिज्ञा करून ते काम त्यांनी पूर्ण केले, यात स्पष्ट होते.

या एका गोष्टीत विखे पाटील यांच्या पुढच्या कर्तृत्वाची बीजे दिसून येतात. अनुत्पादक कर्ज दुर्लक्ष करून वाढत ठेवण्याने शेती व शेतकरी - दोन्ही संकटात येतात. यासाठी त्याला शिस्तीने वागणा-या मनाची व निर्धारी स्वभावाची गरज असते, हे प्रथमतः यात दिसून येते. त्या सुमारास त्यांच्या गावी पहिली सहकारी सोसायटी सुरू झाली, तिचे श्रेयही त्यांच्या या जाणिवेत आहे, असे स्पष्ट होते.