ते मंत्रिमंडळात असताना अनेक राजकीय घडामोडी होत होत्या, आणि काकासाहेब त्यांतील आपला योग्य हिस्सा हुशारीने पार पाडीत होते. त्यांच्याशी त्या काळात झालेल्या संभाषणावरून त्या वेळच्या परिस्थितीत त्यांच्या मनाचा व वैयक्तिक संबंधांचा झुकता कल सरदार पटेलांकडे होता. परंतु पं. जवाहरलाल नेहरूंचे व त्यांचे संबंध आपुलकीचे होते. संयुक्त महाराष्ट्राच्या संदर्भात घडलेल्या रामायणात काकासाहेबांचा म्हणून काही एक अध्याय आहेच. दिल्लीतील नेतृत्वापासून मानसिक अंतर होते आणि संघटनात्मकदृष्ट्या ते काहीसे एकाकी होते. तरी त्यांनी आपले विचार पार्लमेंटमध्ये व बाहेर अत्यंत स्वच्छपणे मांडण्यात कुचराई केली नाही. १९६० सालच्या संयुक्त महाराष्ट्राच्या रचनेच्या काळात काकासाहेबांशी झालेली मसलत माझ्या उपयोगी पडली. ही गोष्ट मी नमूद केली पाहिजे.
काकासाहेबांची माझी शेवटची भेट अलाहाबादच्या विमानतळावर झाल्याचे स्मरते. पाकिस्तानशी १९६५ साली झालेल्या युद्धानंतरचे दिवस होते. मी अलाहाबादला आलो होतो व काकासाहेब अलाहाबाद सोडत होते. मला पाहताच, विमान सुटण्याची घाई असतानाही, बाजूला जाऊन काही मिनिटे उभे राहिले. त्या वेळी घडत असलेल्या घडामोडी काहीशा मी त्यांना सांगितल्या. काकासाहेब आनंदात होते. हिंदुस्थानच्या जवानांनी केलेल्या पराक्रमाचा त्यांना अभिमान वाटत होता.
'... असेच होईल, असे मला वाटत होते. पण झाले नसते, तर...', त्यांच्या हातातील काठी दाखवीत ते म्हणाले, 'हे तुमच्यासाठी ठेवले होते.'
हे म्हणताना त्यांचे घारे डोळे हसत होते. खांद्याची एक वैशिष्ट्यपूर्ण हालचाल होत होती.
मी मनापासून हसलो आणि म्हटले,
'काका, तुमचा तो अधिकार आहे.'
'अच्छा, आशीर्वाद. पुन्हा भेटू..' असे म्हणाले व घाईघाईने विमानाकडे चालत गेले.
मी त्यांची पाठमोरी, पण वेगाने चालणारी आकृती पाहत किंचित काळ उभा राहिलो. त्या वेळी शंकाही आली नाही, की ही त्यांची- माझी शेवटचीच भेट आहे.
काही आठवड्यांनंतर ताश्कंदहून स्व. शास्त्रीजींचा देह घेऊन आम्ही परत आलो. देशात दुःखाची एकच लाट उसळली होती. त्याच दिवसांत पुण्याहून बातमी आली,
'काका आम्हांला कायमचे सोडून गेले.'