शैलीकार यशवंतराव ४३

सौ. वेणूताई दोनचार दिवसांच्या आजारपणात जून १९८३ ला निवर्तल्या.  या काळात यशवंतरावांच्या मनावर चोहोबाजूंनी संकटांची मालिका सुरू होती.  या काळात कौटुंबिक संकटेही खूप आली.  त्यांचा डॉक्टर असलेला पुतण्या राजा (विक्रम) चव्हाण याचे अपघातात निधन झाले.  पत्‍नी वेणूताई यांचा मृत्यू.  स्वीय सचिव श्रीपाद डोंगरे यांचेही निधन झाले.  त्यामुळे ते मनाने खूप खचले.  पुढील वाक्यांवरून यशवंतरावांची त्यावेळची मनःस्थिती आपल्या लक्षात येईल.  त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलेल्या आठवणीतून ते स्पष्ट करता येईल.  ''उभ्या आयुष्यात कशाचीच मागणी न करणारी माझी पत्‍नी मला सोडून गेली.  मी पोरका झालो आहे.  आयुष्याच्या चढउतारावर तिने माझी फक्त सेवाच केली.  सावलीप्रमाणे माझ्यासमवेत ती नेहमी राहिली.  माझे आयुष्य तिनेच घडविले.  आपत्काली मला तिने सावरून धरले.  तिच्याविना माझी ही जीवननौका भरकटू लागलीय.  लवकरच ती काळाच्या भोवर्‍यात सापडणार अन् संपणार.''  आपले जीवन वेणूताईविना अपुरे आहे हे त्यांना कळून चुकले होते.  याबाबत ना. धों. महानोर यांच्या यशवंतराव चव्हाण या पुस्तकात पुढील संदर्भ सापडतो.  ''वेणूताई वारल्या.  यशवंतरावांचं त्यानंतरचं सगळंच जीवन पार बदलून गेलं.  त्यांचे कशातच लक्ष लागेना.  त्यांनी फार मनाला लावून घेतलं होतं आणि ते साहजिक, नैसर्गिक होते.  आयुष्यभर फार मोठमोठ्या जबाबदारीच्या ठिकाणी असताना सावलीसारख्या वेणूताई त्यांच्याबरोबर राहिल्या.''  या काळात यशवंतरावांच्या मनाची फारच द्विधा अवस्था झाली.  वेणूताईंनी यशवंतरावांसाठी केलेला त्याग, पाळलेली पथ्ये, त्यांना पुन्हा पुन्हा स्मरणात येत होती.  आता कुणाकरिता आणि कशाकरिता जगायचे असा विचार ते बोलून दाखवू लागले.  त्यामध्ये ऍड. ग. नी जोगळेकर, ना. धों. महानोर, रामभाऊ जोशी, रणजित देसाई, सौ. माधवी देसाई अशा कितीतरी जीवाभावाच्या माणसांच्या जवळ ते आपले मन मोकळे करत.  वेणूताईंच्या नंतरचे दिवस उदास, कंटाळवाणे जात होते, असेही ते सांगत.  त्यांना कशातच रस वाटत नव्हता.  वेणूताईंच्या मृत्यूनंतर सार्वजनिक समारंभासही यशवंतराव फारसे जात नव्हते.  नंतर पुढे हळूहळू त्यांनी स्वतःला सावरण्याचा प्रयत्‍न केला.  पण त्यातून मुळी ते सावरले नाहीत.  थोड्याच दिवसात त्यांच्या मृत्यूची बातमी आली.  २५ नोव्हेंबर १९८४ रोजी त्यांचा मृत्यू झाला.  देशवासियांना अतीव दुःख झाले.  पण जोपर्यंत जगण्यात काही आहे तोपर्यंतच मरण्यात मजा आहे, असे गडकर्‍यांच्या उक्तीप्रमाणे त्यांनी आपले जीवन संपविले असेच म्हणावे लागेल.

असे हे दांपत्य.  करता येईल तेवढे आपले जीवन मंगलमय करण्याचा प्रयत्‍न त्यांनी निश्चितच केला.  सभ्यपणे, माणुसकीने, एकमेकांना समजून घेऊन, नम्रपणे सुसंस्कृत जीवन जगले.  त्यांच्या सर्वज्ञपणाची, जाणतेपणाची, सूज्ञपणाने स्वीकारलेल्या त्यागाची, प्रचिती येते.  यशवंतरावांनी 'कृष्णाकाठ' या आत्मचरित्र ग्रंथांची अर्पणपत्रिका सौ. वेणूताई यांच्या स्मृतीस अर्पण करताना पुढील भावपूर्ण शब्द वापरलेले आहेत.  'आईच्या पाठोपाठ माझ्या जीवनाला आकार आणि आशय देणारी माझी प्रिय पत्‍नी' यशवंतराव चव्हाण व वेणूताई यांच्यामधील स्नेहाचा प्रीतीचा गोडवा कसा होता हे या अर्पणपत्रिकेवरून निश्चित लक्षात येते.

जीवनातील काही निवडक प्रसंग

यशवंतरावांच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा सुवर्ण क्षण आहे.  पण त्या सुवर्णाला अनेक दिव्यांना सामोरे जावे लागले आहे.  त्यांचे जीवन म्हणजे एक नवलकथा आहे.  त्यांचा हा जीवनप्रवास अद्‍भुत आहे.  या प्रवासात त्यांना अनेकजण भेटले.  त्यात कौटुंबिक लोकांचा जसा समावेश आहे तसाच अनेक राजकीय, सामाजिक, साहित्यिकांचा समावेश आहे.  त्यांना अनेकांचे प्रेम मिळाले.  कित्येकांनी त्यांच्यावर चिखलफेक केली.  आरोप प्रत्यारोप केले.  तरीही या अग्निदिव्यातून अध्ययनाच्या अलंकारांनी त्यांच्या बुद्धीला तेज आले.  त्यांची बुद्धी चिकित्सक बनली.  विचार वैभवाचा ठसा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर उमटत राहिला.  माणसातील माणूसपण शोधण्यासाठी ते वेडे बनले.  जीवनात काही महत्त्वपूर्ण, आशानिराशेचे, परीक्षेचे क्षण आले पण आपल्या मूलभूत विचारतत्त्वांचा तोल त्यांनी कधीच जाऊ दिला नाही.  जिद्द, संयम आणि आत्मविश्वास या बळावर त्यांनी संकटांशी सामना केला.