शैलीकार यशवंतराव ४०

ते दिवस स्वातंत्र्य संग्रामाचे होते.  भूमिगत यंत्रणेच्या कामात ते सतत गुंतून राहिले होते.  कार्यकर्त्यांना भविष्यात कोणत्या पद्धतीने काम करायचे आहे त्याविषयी त्यांना माहिती व कल्पना देण्यासाठी यशवंतरावांना भूमिगत जीवन जगावे लागले.  अनेक ठिकाणी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, झेंडे लावणे असे प्रयत्‍न सुरू झाले आणि जनआंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले.  याचा परिणाम असा झाला, यशवंतरावांना पकडण्यासाठी इंग्रजांनी एक हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.  भूमिगत चळवळ चांगल्याप्रकारे कार्य करू लागली.  रोज कुठे ना कुठे धाडीसत्र सुरू झाले आणि त्यात सरकारचे लोक अयशस्वी झाल्यामुळे लोकांचा छळ करू लागले.  यशवंतराव चव्हाण सापडत नसल्यामुळे पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना अटक करण्यास सुरुवात केली.  १४ जानेवारी १९४२ लाच संक्रांतीच्या दिवशी कराड पोलिसांनी सौ. वेणूताईंना अटक केले.  त्यांना कराड जेलमध्ये ठेवले.  या घटनेमुळे यशवंतरावांना खूप वाईट वाटले.  या संदर्भात ते लिहितात, ''पोलिस येथपर्यंत जातील, अशी माझी अपेक्षा नव्हती.  आणि त्यातल्या त्यात तिच्या लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीच्या दिवशी माझ्या गैरहजेरीत तिला या प्रकारे जेलमध्ये जावे लागले, हे काही मला फारसे बरे वाटले नाही.''  अशा रीतीने जवळजवळ सहा आठवडे कराड आणि इस्लामपूर येथील जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आले.  पण त्या कोवळ्या वयात सौ. वेणूताईंनी कठीण प्रसंगाला धाडसाने तोंड दिले.  यशवंतराव हजर होत नाहीत म्हणून वारंवार त्यांचा पत्ता, ठावठिकाणा मागण्यासाठी सौ. वेणूताईंना पोलिसांच्या छळाला सामोरे जावे लागले.  मृदू मनाच्या वेणूताईंना ते सहन झाले नाही.  मानसिक ताण वाढल्याने त्यांना फिट्स येऊ लागल्या.  प्रकृती अशक्त बनली.  त्यामुळे थकलेल्या शरीरावर क्षयासारख्या रोगाने आक्रमण केले.  त्या टी.बी.ने आजारी पडल्या.  पुढे याचा परिणाम असा झाला की एका आठ दिवसाच्या संतती प्राप्‍तीनंतर सर्व आयुष्य संततिसुखाशिवाय काढावे लागले.  भूमिगत चळवळीचा आघात अशा प्रकारे यशवंतरावांच्या कुटुंबावर हळूहळू पडू लागला.  थोरले बंधू गणपतराव यांनाही पोलिसांनी अटक केली.  त्यांना विजापूरच्या जेलमध्ये ठेवण्यात आले.  या घटनेमुळे तर घरातील सर्वंच अस्वस्थ होते.  आवाळूच्या ऑपरेशनच्या निमित्ताने बंधूची सुटका केली.  पण जखमेत सेप्टिक होऊन त्यातच न्यूमोनियाचा ताप भरून त्यांचा अंत झाला.

यशवंतरावांच्या सुखी कौटुंबिक जीवनाचे श्रेय सौ. वेणूताईंना द्यावे लागेल.  त्यांच्या संदर्भात अनेकांनी श्रद्धाळू, पतिपरायण, आदर्श, कर्तव्यदक्ष गृहिणी असा उल्लेख केला आहे.  तो अगदी सार्थ आहे.  सौ. वेणूताईंच्या सोज्वळ, नम्र, सखोल आणि काहीशा करारी व्यक्तिमत्त्वाचे यशवंतरावांच्या समाजकारणात व राजकारणात नेहमीच सहकार्य मिळत गेले.  कराड, मुंबई, दिल्ली या ठिकाणी वास्तव्यास असताना त्यांच्या घरी माणसांचा राबता मोठा होता.  त्यांचे निवासस्थान नेहमी गजबजलेले असे.  एवढेच नव्हे तर वेणूताई आजारपणातून बर्‍या झाल्यानंतर साहेबांच्या दोन बंधूंच्या संसाराची जबाबदारी त्यांच्यावर पडली.  पुतणे लहान होते.  माहेरची भावंडे लहान होती.  सासर माहेर सांभाळत यशवंतरावांना संसाराच्या सुखदुःखाची जाणीव कधीच होऊ दिली नाही.  सौ. वेणूताई यशवंतरावांच्या जीवनात सखीच्या भूमिकेत वावरत होत्या.  या संदर्भात 'अबोलीचा यशवंत संसार' या लेखामध्ये सौ. वेणूताईंच्या आठवणींची नोंद अशी आहे, ''श्री. यशवंतराव हे सतत राजकारणाच्या आणि इतर सार्वजनिक कामात गढलेले असतात आणि मी संसाराच्या कामात.  मी माझ्या आणखी कामांचा ससेमिरा त्यांच्या मागे लावीत नाही.  त्यांना वेळ नसतो.  पण केव्हातरी कुठे जाऊ म्हटलं तर त्यांची तयारी असते.  नाटक, संगीत याची आम्हाला दोघांनाही आवड आहे.  एकदा एका दिवाळीला आम्ही खरेदीला जायचे ठरवले आणि प्रत्यक्षात गेलो सुद्धा.  खरेदी केली ती रविशंकर वगैरे कलावंतांच्या रेकॉर्डसची, संगीताची, बस्स तेवढीच.''  असे या दांपत्याचे जीवन सर्वस्पर्शी होते.  त्यांच्या सद्‍गुणालाही अनेक पैलू होते. ते अभिजात व शास्त्रीय संगीताचे जसे रसिक होते तसेच ते भावगीतांचे प्रेमी होते.  नाट्याचे तर त्यांना वेडच होते.

स्वातंत्र्यपूर्वकाळात यशवंतरावांची मनःस्थिती काही घरगुती प्रश्नांनी व्यापून गेलेली असे.  आणि याचा परिणाम कुटुंबातल्या लोकांच्या प्रकृतीवर होई.  सौ. वेणूताईंच्या बाबतीत तसेच घडले.  स्वतःचा तुरुंगवास, दीर गणपतरावांच्या स्थानबद्धतेचा धक्का व मोठे दीर ज्ञानोबांचा मृत्यू.  गणपतरावांची आजारपणात केलेली सेवा, अशातच यशवंतराव घरात नसायचे.  त्यावेळी जीवाला बेचैन करणार्‍या गोळीबाराच्या बातम्या रोज येत होत्या.  त्यामुळे मानसिक ताण वाढला.  स्वतःच्या प्रकृतीकडे वेणूताईंचे दुर्लक्ष झाले.  प्रकृती अधिकच ढासळत गेली.  वेणूताईंना माहेरी नेऊन औषधपाणी करण्याचे ठरले.  पण प्रकृती अधिकच ढासळत गेली अणि एक दिवस अतिशय गंभीर बनली.