शैलीकार यशवंतराव ३६

यशवंतरावजी ज्या पद्धतीने व ज्या द्रष्टेपणाने हे लोकसंग्रहाचे कार्य त्या काळात करत होते त्याचा निश्चितच उपयोग त्यांच्या नेतृत्वास व जडणघडणीस झाला.  त्यांचा संपर्क बहुजन समाजाबरोबर अन्य धर्मीयांशीही होता.  ब्राह्मण, मुस्लिम, जैन, दलित आदी समाजातील विविध व्यक्तींना जवळ करण्यात ते यशस्वी ठरले.  त्यांच्या घरचे नोकरही विविध धर्मीय आणि प्रांतीय होते आणि ते सर्वजण या दांपत्याबरोबर एकाच कुटुंबातल्यासारखे राहात असत.  हिंदू धर्माप्रमाणेच इतर धर्मांवरही त्यांची श्रद्धा होती.  सर्वांच्या सुखदुःखात ते समरस होत.  सर्वांना समजून घेत.  आपण कोठे आहोत याचाही शोध घेत.  सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये काम करताना ते अनेक सहकार्‍यांच्या सहवासात गेले.  त्या सहकार्‍यांच्या, कार्यकर्त्यांच्या, साहित्यिकांच्या सांनिध्यामुळे ते प्रभावित झाले.  त्यांच्या विचारांनी व कार्याने ते कार्यप्रवण झाले.  त्यांनी कधी मार्गदर्शन केले तर कधी त्यांचे सहकारी बनून त्यांना मदत करत राहिले.  यशवंतरावांच्या जीवनप्रवाहात या सर्वांना फार मोलाचे महत्त्वाचे स्थान आहे.  साने गुरुजी, ना. सी. फडके, आनंदराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, डॉ. देशपांडे, यशवंतराव पार्लेकर, राजाजी, के. डी. पाटील, भुस्कुटे, विठ्ठलराव पागे, व्यंकटराव ओगले, सदाशिव पेंढारकर, अशा काही लोकांचा उल्लेख करता येईल.  या लोकांचे विचार समजून घेऊन सुरुवातीच्या काळात ते जीवनाची वाटचाल करत राहिले.  तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या व्याख्यानातून ओसंडणारे बुद्धिमत्तेचे प्रखर तेज तर काकासाहेब गाडगीळ यांनी टेबलावर चढून केलेले भाषण हे सारे सारे महत्त्वाचे होते.  यशवंतरावांच्या दृष्टीने अविस्मरणीय होते.  यातील काही मंडळी वयाने वडील तर काही समकालीन होती.  यशवंतराव मोठ्यांच्या वडिलकीचा वसा जपत, त्यांचे प्रेमसंबंध कायम टिकवत, त्यांचे श्रेष्ठत्व न विसरता मराठी मनावर आपला पगडा बसवू शकले.  माणंस जोडणं, माणसांचा संग्रह करणं आणि प्रत्येकातील दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून त्याच्यातील सदगुणांचा उपयोग करून घेणं हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य बनले.  त्यामुळे ते अनेक लोकांच्या संपर्कात राहू शकले.  जननिष्ठा आणि पक्षनिष्ठा या दोन संज्ञा चव्हाणांसाठी समानार्थीच होत्या.  जनसामान्यांची नाडी त्यांना अचूक सापडली होती.  त्यामुळेच राष्ट्रसभेच्या स्वतंत्र आंदोलनापासून त्यांच्या नेतृत्वाची पायाभरणी झाली होती.  १९४१ च्या लोकल बोर्डाच्या निवडणुकीच्या वेळी तरुण माणसे जोडून जनमानसा आपल्या कार्याचा पाया अधिक खोल व मजबूत केला होता.  येथूनच खर्‍या अर्थाने त्यांनी सक्रीय राजकारणास प्रारंभ केला.  या जनसंपर्कामुळे समतोल विचारवंत आणि व्यवहारी प्रज्ञावंत, सुसंस्कृत राजनीतिज्ञ आणि वैचारिक वसा जपणारा रसिक राजकारणी म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली.

अभिजात रसिक

यशवंतरावांच्यात अनेक गुण एकवटलेले होते.  प्रत्येक गुण जोपासणारा लोकसंग्रहही होता.  यशवंतराव नाट्यवेडे होते म्हणून नाट्यक्षेत्रातील लोकांशी त्यांचा संबंध होता.  साहित्यिक होते म्हणून लेखक आणि कवींच्यातही त्यांचे मन रमून जाई.  संगीतक्षेत्राची त्यांना जाण होती म्हणून पं. भीमसेन जोशींसारख्या जाणकारांशी संबंध तर होतेच पण उदयोन्मुख कलाकारांशीही त्यांचे संबंध होते.  त्यांना ते प्रोत्साहन देत.  एखाद्या राज्यकर्त्याच्या ठायी जे गुण असावयास पाहिजेत ते सर्व त्यांच्यात होते.  त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अभ्यासताना 'झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु यासम हा' असे म्हणावेसे वाटते.  त्यांच्या आठवणी सांगताना सर्व क्षेत्रांतील माणसांनी मनापासून त्यांच्या सहवासातील क्षण टिपले आहेत व वर्णन केले आहेत.  ते सर्व पाहता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अथांगपणा लक्षात येतो.

यशवंतरावांचे चारित्र्य स्वच्छ होते.  तळागाळातील समाजाविषयी त्यांना आत्मीयता होती.  त्यांच्यावर झालेले संस्कार आणि त्यांनी केलेले अभिरुचीसंपन्न वाचन याचा हा परिणाम असावा असे वाटते.  यशवंतराव केवळ राजकारणी कधीच नव्हते.  त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते.  बालपणापासून त्यांनी अनेक छंद जोपासले.  नाटके पाहण्याचा, पुस्तके वाचण्याचा छंद त्यांना होता.  तसेच कोयनेत डुंबण्याचा आणि कुस्ती पाहण्याचाही छंद त्यांना होता.  नंतर धकाधकीच्या राजकारणातही त्यांचे हे छंद सुटले नाहीत.  ते प्रतिभावंत लेखक होते.  साहित्य विश्वात त्यांना मानाचे स्थान होते.  त्यांच्या वाणीने साहित्याची सेवा केली.  हेच त्यांचे वेगळेपण आहे.  त्यात त्यांनी आपल्यातील रसिक व साहित्यिकही जपला,  जोपासला.  राजकारणात असे व्यक्तिमत्त्व अभावानेच आढळून येते.