संपर्कातून उदयास आलेले व्यक्तिमत्त्व
यशवंतरावांच्या जडणघडणीमध्ये जसा थोरामोठ्यांचा आदर्श होता त्याचप्रमाणे त्यांच्या काही समकालीन मित्रांचा, काही राजकीय पुढार्यांचा, शिक्षक गुरुजनांचाही वाटा मोठा आहे असे त्यांनी नमूद केले आहे. अहमद कच्छी सारखा वर्गमित्र बुद्धिमान असून भोवतालची परिस्थिती जाणून घेण्यासाठी तो कसा उत्सुक असे, त्यातून त्यांचे सुसंस्कृत मनाचे प्रतिबिंब यशवंतरावांना पाहावयास मिळाले. उथळे, श्री. निकम, श्री. तांबवे यांची व्यक्तिमत्त्वेही त्यांच्या मनावर खोल ठसा उमटवून गेली. मसूरेच राघुअण्णा लिमये हे यशवंतरावांचे निकटचे मित्र होते. त्यांचे बोलणे अगरी मुद्देसूद व स्पष्ट विचार व्यक्त करणारे असे. त्यांच्या बोलण्यातून स्वातंत्र्याविषयीची तळमळ त्यांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होत असे. यशवंतराव अशा व्यक्तिमत्त्वामुळे प्रभावित झाले. स्वतः जाऊन त्यांनी त्यांची ओळख करून घेतली. राघुअण्णांमुळे यशवंतरावांना सावरकरांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांमध्ये रावसाहेब पटवर्धन आणि आचार्य भागवत या दोन महत्त्वाच्या व्यक्ती होत्या.
आचार्य भागवत हे गांधीवादी होते. शिवाय अनुभवी आणि विवेकसंपन्न होते. त्यामुळे त्यांचा संपर्क व सांनिध्य लाभणे हे यशवंतराव स्वतःचे भाग्यच समजत. रावसाहेब पटवर्धनांच्या उत्तम इंग्रजी ज्ञानाचा प्रभाव दीर्घकाल त्यांच्यावर राहिला.
डॉ. राम मनोहर लोहिया हेही यशवंतरावांच्या राजकीय जीवनातले एक महत्त्वाचे मार्गदर्शक होते. त्यांचे भाषण यशवंतरावांनी ऐकले होते. त्यामुळे त्यांना भेटण्याची व विचार ऐकण्याची उत्सुकता त्यांना होती. त्यांच्या भेटीमुळे 'लोकनेता' कसा असावा याचे मूर्तिमंत चित्रच त्यांच्या रूपाने त्यांनी पाहिले. पुढे अनेक चळवळींत त्यांचे यशवंतरावांना मार्गदर्शन लाभले. अशा व्यक्तींच्या संपर्कामुळेच यशवंतरावांमध्ये धैर्य व त्यागवृत्ती निर्माण झाली व ती पुढे वाढत गेली. त्यांच्यामुळे यशवंतरावांचे नेतृत्व व व्यक्तिमत्त्व सतत विकसित होत गेले.
माणसे जोडावी कशी आणि त्यांची मने सांधावी कशी याची कला यशवंतरावांना चांगलीच अवगत होती. खेळकरपणाने वागायचे व आपलेपणाने बोलायचे ही त्यांची वृत्ती होती. लोकांमध्ये राहण्याची त्यांना हौस असे. जनतेच्या उन्नतीकडे त्यांचे लक्ष असे. सामान्यांची सुखदुःखे, त्यांच्या अडचणी, त्यांच्या भावना याची त्यांना जाणीव होती. लोकांचे विचार व गार्हाणी ऐकण्याचा त्यांनी कधी कंटाळा केला नाही. गरिबांकडे अधिक लक्ष द्यायचं हा त्यांचा स्वभाव होता. निष्कपट प्रेम कसं करावं याचं दर्शन ते स्वतःच्या वागणुकीतून घडवित असत. त्यामुळे विविध क्षेत्रांतील मंडळींचा सहवास व संपर्क त्यांना लाभला. त्यामध्ये अडाणी शेतकरी, कामगार, विद्वान, शास्त्री पंडित, सनातनी, महिला, कलावंत, व्यापारी, नोकरदार, डॉक्टर, इंजिनीअर, राजकारणी, उद्योगपती, मुत्सद्दी, अर्थतञ्ज्ञ, समाजधुरीण, साहित्यिक, कवी यांचा समावेश होता. त्यांचं म्हणणं ते प्रसन्नपणाने ऐकत असत. मानवी मूल्यांवर, गूणांवर, माणसांच्या चांगुलपणावर, माणसांच्या चांगल्या विचारांवर, शब्दांवर आणि प्रत्यक्ष कृतीवर यशवंतरावांचा विश्वास होता. महाराष्ट्रात आणि देशात विविध क्षेत्रांतील लोकांचे विचार ऐकण्याची संधी यशवंतरावांना मिळाली. त्याचं मार्गदर्शन लाभलं. त्याचा उपयोग त्यांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये खूप झाला. आपले व्यक्तिमत्त्व सर्वांगाने समृद्ध व संपन्न करण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सार्थकी लावला. लोकांशी सतत ठेवत असलेला संपर्क, त्यांच्याविषयी असलेला जिव्हाळा व चौफेर अभ्यासाची सवय यामुळे लो. टिळकांनंतर महाराष्ट्रात उदयास आलेले यशवंतराव हे एकमेव नेतृत्व मानले जाते.